ॲस्ट्रोसॅट
ॲस्ट्रोसॅट | |
---|---|
साधारण माहिती | |
संस्था | इस्रो |
सोडण्याची तारीख | १८ सप्टेंबर, २०१५[१] |
कुठुन सोडली | सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा |
सोडण्याचे वाहन | पी.एस.एल.व्ही. |
प्रकल्प कालावधी | ५ वर्षे |
वस्तुमान | १,६५० किलो (३,६०० पौंड) |
कक्षेचा प्रकार | जवळपास विषुववृत्तीय |
कक्षेची उंची | ६५० किमी (४०० मैल) |
कक्षेचा कालावधी | १ तास ३८ मिनिटे |
तरंगलांबी | अतिनील, क्ष-किरण (बहु-तरंगलांबी) |
उपकरणे | |
युव्हीआयटी | अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप |
एसएक्सटी | सॉफ्ट एक्स-रे टेलिस्कोप |
सीझेडटीआय | हार्ड एक्स-रे इमेजर |
लॅक्सपीसी | एक्स-रे टायमिंग्ज ॲन्ड लो रिझोल्यूशन स्पेक्ट्रल स्टडीज |
संकेतस्थळ astrosat |
ॲस्ट्रोसॅट हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रोने खगोलशास्त्रीय संशोधनासाठी सोडलेला पहिलाच उपग्रह आहे. तो दि. २८ सप्टेंबर २०१५ रोजी सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथून पी.एस.एल.व्ही. या रॉकेटच्या साहाय्याने, भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी १० वाजता अवकाशात सोडला.[१][२]
आढावा
'इंडियन एक्स-रे ॲस्टॉनॉमी एक्सपेरिमेन्ट'च्या यशानंतर, १९९६ साली प्रक्षेपित केलेल्या उपग्रहापेक्षा अधिक आधुनिक अशा ॲस्ट्रोसॅटसाठी २००४ साली इस्रोने मंजूरी दिली.
भारतातल्या इस्रो, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी ॲन्ड ॲस्ट्रोफिजिक्स (आयुका), टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई (टी.आय.एफ.आर), रामन संशोधन संस्था, भारतीय खगोलभौतिकी संस्था, भौतिकी संशोधन कार्यशाळा या प्रतिष्ठित संशोधन संस्थांनी आणि परदेशातील कॅनेडियन स्पेस एजन्सी, लंडनची युनिव्हर्सिटी ऑफ लिचेस्टर या ख्यातनाम संस्थांनी ह्या उपग्रहाच्या निर्मितीसाठी मदत केली आहे.
ॲट्रोसॅटच्या प्रक्षेपणानंतर भारत हा, ज्यांची अवकाशातही प्रयोगशाळा आहे, अशा अमेरिका, रशिया, युरोपीय अंतराळ संस्था आणि जपाननंतर जगातील पाचवा देश बनला आहे .[३]
ॲस्ट्रोसॅटचा हेतू
ॲस्ट्रोसॅट हा बहु-तरंगलांबीची सोय असलेला खगोलशास्त्र उपग्रह आहे. या उपग्रहावर ५ वैज्ञानिक उपकरणे असून ती खगोलीय घटकांचे विविध वारंवारतेच्या साहाय्याने निरीक्षण करू शकतात. या उपकरणामुळे दृश्यमान (३२०-५३० नॅनोमीटर) कव्हर, अतिनील (१८०-३०० नॅनोमीटर), अतिनील (१३०-१८० नॅनोमीटर), सॉफ्ट क्ष-किरण (०.३-८ keV आणि २-१० keV) आणि हार्ड क्ष-किरण (३-८० keV आणि १०-१५० keV) या विद्युतचुंबकीय वर्णपटाचा अभ्यास करता येतो.
ॲस्ट्रोसॅटचे मुख्य हेतू पुढीलप्रमाणे आहेत:
- अनेक तरंगलांबींच्या साहाय्याने अतिदूर अंतरावरील वैश्विक किरणांच्या स्रोतांचा व त्यांच्यामध्ये होणाऱ्या तीव्र चढ-उतारांचे एकाचवेळी निरीक्षण करणे
- हार्ड क्ष-किरण आणि अतिनील परिप्रेक्षामध्ये अवकाशाचे निरीक्षण करणे
- क्ष-किरण बायनरीचा, सक्रिय दीर्घिकीय केंद्रक, मृत ताऱ्यांचे अवशेष, ताऱ्यांचे प्रभामंडळ यांचे वेगवेगळ्या तरंगलांबीमध्ये निरीक्षण करणे
- नियमित, अनियमित व अल्पायुषी क्ष-किरण स्रोतांचा अभ्यास करणे
उपकरणांची माहिती
- अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (यू.व्ही.आय.टी) (अतिनील प्रतिमा दुर्बीण)- अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप हा १३०-१८० नॅनोमीटर (नॅमी), १८०-३०० नॅमी आणि ३२०-५३० नॅमी या तीन चॅनेलांमधून एकाचवेळी निरीक्षण करू शकतो. हे उपकरण संयुक्तरीत्या भारतीय खगोलभौतिकी संस्था, बंगलोर, आयुका, इस्रो आणि कॅनेडियन स्पेस एजन्सी यांच्या सहयोगाने बनवले आहे. अवकाशाच्या विद्युतचुंबकीय वर्णपटाचे दृश्यमान क्षेत्र, अदूर अतिनील क्षेत्र व सुदूर अतिनील क्षेत्र या तीन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये निरीक्षण करण्यास हे उपकरण सक्षम आहे.
- लार्ज एरिया झेनॉन प्रपोर्शनल काउंटर- हे दुसरे उपकरण आहे. ते क्ष-किरण बायनरी, सक्रिय दीर्घिकीय केंद्रक या क्ष-किरण स्रोतांतून होणाऱ्या क्ष-किरण उत्सर्जनाचे, व त्यात होणाऱ्या फेरफारांचे प्रमाण मोजण्यासाठी उपयोगी आहे. ते मुंबईच्या टाटा मूलभूत संशोधन संस्था व बंगलोरच्या रामन संशोधन संस्थेने तयार केले आहे. हे उपकरण सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही उपकरणापेक्षा पाच पट अधिक क्ष-किरण फोटॉन गोळा करू शकते. ही उर्जा २५ keV पेक्षा जास्त असते.
संदर्भ
- ^ a b परांजपे, अरविंद. "'स्वदेशी वेधशाळे'ची गगनभरारी(अरविंद परांजपे)".
- ^ जेसूदासन, डेनिस. "इस्रो लॉंचेस ॲस्ट्रोसॅट, फर्स्ट स्पेस ऑब्झर्व्हेटरी (ISRO launches ASTROSAT, first space observatory)" (इंग्रजी भाषेत).
- ^ सिन्हा, अमिताभ. "इस्रोज् ॲस्ट्रोसॅट लॉंच: इंडिया रिचेस फॉर द स्टार्स (ISRO's ASTROSAT launch: India reaches for the stars)" (इंग्रजी भाषेत).