ॲल्टो (संगीत)
पाश्चात्त्य संगीतातील मानवी आवाज-पल्ल्यांच्या केलेल्या चार प्रकारांपैकी एक. मूळ इटालियन शब्द ‘आल्तो’ (उंच). स्त्रियांच्या आवाजाचा मंद्र पंचमापासून ते मध्यसप्तकाच्या तारषड्जापर्यंतचा पल्ला (पाश्चात्त्य संगीतात मध्यसप्तकाचा आरंभस्वर ‘सी’ (षड्ज) हा प्रतिसेकंद २५६ आंदोलनांचाच असतो). लहान मुलांच्या याच पल्ल्याच्या आवाजासाठीही हा शब्द क्वचित वापरतात. चोरून लावलेल्या पुरुष-आवाजाचा अत्युच्च पल्ला. या पल्ल्यातील वाद्यांचे विशेषण. उदा., ॲल्टो-क्लॅरिनेट, ॲल्टो-सॅक्झफोन वगैरे.