ॲरिस्टॉटलचे परीक्षण
ॲरिस्टॉटल (इ.स.पू. ३८४ ते इ.स.पू. ३२२) ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटोचा शिष्य आणि अलेक्झांडर द ग्रेटचा गुरू होता.
ॲरिस्टॉटलचे तत्त्वज्ञान
ॲरिस्टॉटलची कारणमीमांसा (कॉजेशन)
ॲरिस्टॉटलच्या म्हणण्याप्रमाणे कशाचेही ज्ञान होणे म्हणजे त्याच्या कारणांचे ज्ञान होणे. बदलाच्या किंवा प्रक्रियेच्या स्वरूपाचा उलगडा करण्यासाठी ॲरिस्टॉटल चार प्रकारची कारणे मानतो :
उपादानकारण किंवा आशयकारण (मटेरिअल): मूर्ती जर संगमरवरापासून बनलेली असेल तर संगमरवर हे तिचे उपादानकारण.
आकारिक कारण (फॉर्मल): मूर्ती अखेर जो आकार घेणार आहे त्याची शिल्पकाराच्या मनात असलेली उपस्थिती हे आकारिक कारण.
हेतुकारण (फायनल): हेतू, प्राप्तव्य किंवा प्रयोजन.
कर्तृकारण (एफिशिएन्ट): शिल्पकाराकडून घडणारी क्रिया.
पूर्ण स्वरूपातील मूर्ती हाच हेतू असल्यामुळे प्रयोजन वा हेतू कारणाचा समावेश आकारिक कारणात होऊ शकतो. तसेच कोणत्याही पदार्थाचे आदर्श अथवा पूर्ण स्वरूप हे त्या पदार्थाला आपल्याकडे खेचून घेते व त्यामुळे विक्रिया अथवा गती निर्माण होते, असे ॲरिस्टॉटलचे मत असल्याने, कर्तृकारणसुद्धा आकारिक कारणात समाविष्ट होते. अशा रितीने शेवटी आशयात्मक वा उपादान आणि आकारिक असे कारणाचे दोन प्रकार उरतात.
ॲरिस्टॉटल दोन तत्त्वांच्या सहाय्याने निसर्गातील गतीचा उलगडा करतो :
स्वतः निश्चल व चिरंतन असलेला, इतरांच्या इच्छेचा विषय असलेला चालक आणि
ह्या निश्चल चालकाला आपल्या इच्छेचा विषय करण्याची व म्हणून त्याच्यासारखे बनण्याची निसर्गातील पदार्थात असलेली स्वाभाविक प्रवृत्ती. भौतिक घटनांना व प्रक्रियांना ॲरिस्टॉटल सहेतुक मानत असल्यामुळे त्याचा दृष्टिकोण आधुनिक भौतिकीतील प्रस्थापित दृष्टिकोणाहून वेगळा ठरतो.
पदार्थ
वाक्यांचा अथवा विधानांचा अनुबंध नसलेली पदे म्हणजे पदार्थविधा (कॅटेगरीज) होत अशी व्याख्या ॲरिस्टॉटलने केली आहे. तिचे सार असे की, पदांचे विशिष्ट संदर्भ काढून घेऊन त्यांच्या प्रकारांचा अभ्यास केला की, आपणास वास्तवतेचे मानचित्र मिळेल. हे मानचित्र उघड्या-बोडक्या वास्तवतेचे की ज्ञानावृत वास्तवतेचे? या प्रश्नाची कितीही चर्चा केली तरी त्याचा निर्णय लागणे अवघड आहे. असेच म्हणावे लागेल की, ज्ञानगत संबंध आणि वस्तुगत संबंध यांना विलग करता येणार नाही. ॲरिस्टॉटलच्या पदार्थावलीत पुढील दहा पदार्थ आहेत : द्रव्य, संख्या, गुण, संबंध, काल, स्थल, अवस्था (डिस्पोझिशन), धारित्व (ॲपरटेनन्स), कर्म आणि कृतत्त्व (सफरिंग किंवा पॅसिव्हिटी). या दहांपैकी द्रव्य, गुण आणि कर्म यांना पदार्थ म्हणून वैशेषिकांनीही मानलेले आहे. ‘संख्ये’चा समावेश वैशेषिकांनी गुणांतच केला आहे. उरलेल्या सहांचा समावेश संयोग या गुणांत अथवा समवाय या पदार्थांत यथासंभव करता येईल. तो करता येईल; पण करावाच असे नाही. कारण आपली यादी बनवताना ॲरिस्टॉटलने केवळ भाषेच्या उपयोजनाच्या विश्लेषणाचीच दृष्टी ठेवली होती; वैशेषिकांप्रमाणे सत्ताशास्त्रीय दृष्टिकोणाची त्यांत भेसळ केली नाही. त्यामुळे त्याच्या विभागणीत संकर (क्रॉस-डिव्हिजन) हा दोष नसून शिवाय ती अधिक व्यापक झाली आहे.
ॲरिस्टॉटलचा जडद्रव्य व आकार-सिद्धान्त
ॲरिस्टॉटलच्या कारणकल्पनेतील आकारिक, निमित्त व अंतिम ही तिन्ही कारणे ‘आकार’ ह्या एका कल्पनेत गोवता येतात. आकार व द्रव्य (मॅटर) यांच्यामध्ये ॲरिस्टॉटलच्या मते पुढीलप्रमाणे संबंध आहेत :
द्रव्य व आकार हे प्रत्यक्षात अविभक्त असतात. विचारांत त्यांचे विभक्तीकरण करता येते. एरवी कोणताही पदार्थ म्हणजे या दोहोंनी युक्त अशी व्यक्ती असते. आकाररहित द्रव्य किंवा द्रव्यरहित आकार असूच शकत नाही. एक ईश्वर (केवळ आकार) याला अपवाद आहे.
१. आकार सामान्य असतो. द्रव्य विशिष्ट असते. आकार म्हणजे संकल्पना किंवा आयडिया. २. द्रव्य जड किंवा भौतिक नाही. ते सर्व वस्तूंचे अधिष्ठान आहे. ते निराकार, निर्गुण व निर्विशेष असते. त्याला आकार मिळतो, तो आदर्शामुळे, ध्येयामुळे. वस्तूवस्तूंमधील भेद द्रव्याचा नसून आकाराचा असतो. द्रव्यांत विशिष्ट आकार धारण करण्याची सुप्त शक्ती असते. जरी ते काहीही नसले, तरी सर्व होण्याची संभाव्यता असते. ३. द्रव्य व आकार ह्या दोन संज्ञा सापेक्ष आहेत. एकच गोष्ट एका दृष्टिकोणातून द्रव्य तर दुसऱ्या दृष्टिकोणातून आकार ठरते. जे बदलते ते द्रव्य. ज्याकडे ते धाव घेते तो आकार. तेव्हा आकार म्हणजे वस्तूची केवळ बाह्य रचना नव्हे. आकारांत संघटन, पूर्ण व अंश यांचा संबंध, वस्तूचे कार्य, तिचा हेतू ह्या सर्वांचा समावेश होतो. ४. द्रव्य म्हणजे अप्रकटता किंवा संभाव्यता तर आकार म्हणजे प्रकटता. गती किंवा बदल म्हणजे अप्रकटतेतून प्रकटतेकडे नेणारा मार्ग. ५ काळाच्या ओघात द्रव्य आधी येते; पण तार्किकदृष्ट्या आकार आधी असतो. झाड आधीच बीमध्ये उपस्थित असते, नाहीतर त्यातून ते निर्माण कसे होईल? सर्व बदल हा ध्येयप्रेरित असतो.
द्रव्य (मॅटर) हा शब्द ॲसरिस्टॉटलने मुख्यतः चार अर्थांनी वापरलेला आहे
१. परिवर्तनाचे अधिष्ठान किंवा उत्पत्ती व लय यांचा आधार. २. ज्याच्या ठिकाणी प्रकट होण्याची क्षमता आहे अशी सुप्तावस्था. ३. आकारहीन किंवा निराकार. ४. ज्याने अजून निश्चित आकार धारण केला नाही, असे जवळ-जवळ असत्.
प्रकटता व संभाव्यता
पदार्थ निर्माण होण्यापूर्वी ज्या द्रव्यात असतो, त्या द्रव्यात तो उत्पन्न होण्याचे क्षमत्व असते. पदार्थ पूर्णतेने तयार झाला म्हणजे तो प्रत्यक्षात येतो. पदार्थाचे दुसऱ्या पदार्थांत बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य आणि बदल घडवून घेणाऱ्या पदार्थाची बदल होण्याची शक्ती, ह्या दोन दृष्टिकोणांतून शक्तीकडे पाहता येते. ह्यांपैकी दुसऱ्या शक्तीला ॲरिस्टॉटल क्षमता किंवा संभाव्यता नाव देतो. (पुतळा प्रत्यक्षात येण्यापूर्वी दगडात सुप्त असतो.) संभाव्यता म्हणजे आकार धारण करण्याची शक्ती. काही टीकाकार म्हणतात, बदलाची ही कल्पना मूलभूत तादात्म्य-नियमांचे उल्लंघन करते; परंतु ही टीका योग्य नाही. त्यांत सातत्य असते. ॲरिस्टॉटल बदल खरा मानतो.
ॲरिस्टॉटलची तत्त्वमीमांसा
ॲरिस्टॉटलच्या पश्चात जेव्हा त्याचे लिखाण व्यवस्थित स्वरूपात प्रकाशित करण्यात आले, तेव्हा भौतिकीवरील ग्रंथाच्या ‘पुढचा’ क्रम ह्या ग्रंथाला देण्यात आला. म्हणून ह्या ग्रंथाचे नाव ‘मेटॅफिजिक्स पडले, असे मानण्यात येते. असे असले तरी ॲरिस्टॉटलच्या भाष्यकारांनी मेटॅफिजिक्स (भौतिकीच्या पलीकडचा अभ्यास) हा शब्द लाक्षणिक अर्थानेही घेतला आहे. द्रव्य ही ॲरिस्टॉटलच्या तत्त्वमीमांसेतील मध्यवर्ती संकल्पना आहे. ज्याला खरेखुरे अस्तित्व असू शकते, अन्य अस्तित्वाचा केवळ एक घटक असे दुय्यम, पराधीन असे ज्याचे अस्तित्व नसते, तर जे स्वतःच अस्तित्वात असते, ते म्हणजे द्रव्य. विवक्षित वस्तूंहून भिन्न आणि त्यांच्या पलीकडच्या अशा सामान्य म्हणजे प्लेटोप्रणीत ‘आयडियां’नाच खरेखुरे व परिपूर्ण असे अस्तित्व असते, ह्या प्लेटोच्या मताचे ॲरिस्टॉटल खंडन करतो. विवक्षित, मूर्त वस्तू (उदा. सॉक्रेटिस, हा घोडा, ताजमहाल इ.) म्हणजेच द्रव्य ही ॲरिस्टॉटलची ठाम भूमिका आहे. परंतु अशी स्वतः अस्तित्वात असलेली द्रव्यरूप मूर्त वस्तू नेहमी अमुक एका प्रकारची वस्तू असते. उदा. सॉक्रेटिस हा माणूस आहे. सॉक्रेटिससंबंधी जी विधाने आपण करू ती माणूस या नात्याने इतर सर्व माणसांविषयीही आपण करू शकू. ह्याचा अर्थ असा, की वस्तुप्रकारांचा, जाती-उपजातींचाही, द्रव्य ह्या पदावर काहीसा अधिकार पोचतो. म्हणून विवक्षित, मूर्त वस्तूंना ॲरिस्टॉटल प्राथमिक द्रव्ये म्हणतो आणि वस्तुप्रकारांना, जाती-उपजातींना, तो दुय्यम द्रव्ये म्हणतो. वस्तुप्रकार किंवा वस्तुरूपे दुय्यम असली तरी प्लेटो म्हणतो त्याप्रमाणे त्यांना विवक्षित वस्तूंहून पृथक, स्वतंत्र असे अस्तित्व नसते. विवक्षित वस्तूच्या अंगी जे गुण असतात, किंवा जे रूप असते, ते ॲरिस्टॉटलच्या मताप्रमाणे, एका आशयरूप अधिष्ठानाच्या ठिकाणी वसत असते. पण हे अधिष्ठान (म्हणजे आकार धारण करण्याची क्षमता) द्रव्य होऊ शकत नाही. कारण ते निर्विशेष, निर्गुण असल्यामुळे त्याच्या अंगी विवक्षितता नसते; जे द्रव्य आहे त्याचा हे, ही विवक्षित वस्तू (म्हणजे इतर वस्तूंहून वेगळी) असा उल्लेख करता आला पाहिजे आणि अधिष्ठानाचा असा उल्लेख करता येत नाही.
ज्या गुणधर्मांमुळे वस्तू एका विशिष्ट स्वरूपाची वस्तू ठरते, त्यांना ॲरिस्टॉटल ‘सत्त्व’ म्हणतो. वस्तूच्या सत्त्वामुळे तिचे स्वतःचे स्वरूप, तिचे स्वत्व, तादात्म्य, ती वस्तू स्वतः काय आहे, हे निश्चित होते. अशा सत्त्वाने अवच्छिन्न वस्तू म्हणजे द्रव्य. वस्तूचे हे सत्त्व म्हणजेच वस्तूचा आकार. वस्तूचा आकार हे वस्तूचे आकारिक कारण आणि हेतुकारण असते, हे आपण पाहिलेच आहे. हेतुकारण ह्याचा अर्थ असा, की जो आकार धारण करण्याची क्षमता वस्तूच्या ठिकाणी असते, तो आकार परिपूर्णतेने प्राप्त करून घेण्याची त्या वस्तूची प्रवृत्ती असते; त्या दिशेने ती विकसित होत असते आणि जेव्हा ती हा आकार परिपूर्णतेने प्राप्त करून घेते, तेव्हा ह्या विकासाचा अंत होतो. स्वतःचा आकार परिपूर्णतेने साध्य केलेल्या वस्तूची जी अवस्था असते, तिला ॲरिस्टॉटल तिची ‘विद्यमानता’ व ‘परिपूर्णावस्था’ म्हणतो.
आता एखादा आकार धारण करण्याची क्षमता असलेल्या वस्तूमध्ये तो आकार परिपूर्ण रितीने विद्यमान होण्यासाठी तिचा जो विकास व्हावा लागतो, तो जिच्यामध्ये तो आकार परिपूर्ण रितीने विद्यमान आहे, अशी (दुसरी) वस्तू घडवून आणीत असते. थोडक्यात, विद्यमानता हेच क्षमतेचे विद्यमानतेत रूपांतर होण्याचे कारण असते. ह्या तत्त्वाच्या आधाराने ॲरिस्टॉटल ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करतो.
काल चिरंतन आहे आणि बदलाशिवाय काल असू शकत नाही; तेव्हा बदलही चिरंतन आहे. आता विश्वातील सर्व बदलांचे, स्थित्यंतरांचे, क्षमतेचे विद्यमानतेत होणाऱ्या रूपांतराचे कारण, जिच्या ठिकाणी आकार परिपूर्ण स्वरूपात विद्यमान आहे, अशी वस्तू असली पाहिजे आणि बदल चिरंतन असल्यामुळे त्याचे कारणही चिरंतन असले पाहिजे. बदलाच्या ह्या अंतिम कारणाला ॲरिस्टॉटल ‘आदिचालक’ म्हणतो. इतर सर्व वस्तू आशयात्मक अधिष्ठान अधिक आकार ह्या स्वरूपाच्या असतात. पण आदिचालक केवल किंवा शुद्ध आकार असला पाहिजे; कारण अधिष्ठान म्हणजे आकार धारण करण्याची क्षमता. आदिचालकाला जर अधिष्ठान असेल, तर त्याच्या विद्यमान आकाराहून वेगळा आकार प्राप्त करून घेण्याची क्षमता त्याच्या अंगी असेल. पण क्षमता असली म्हणजे तिचे विद्यमानतेत रूपांतर होणे शक्य असते. तेव्हा आदिचालकाच्या ठिकाणी जर आशय असेल, तर आदिचालक बदलू शकेल आणि ह्या बदलाचे कारण ह्या बदलामुळे जो आकार साध्य व्हायचा असेल, तो ज्याच्या ठिकाणी विद्यमान आहे, असा दुसरा चालक असावा लागेल. ही अनवस्था टाळण्यासाठी आदिचालक स्वतः अचल असतो व म्हणून शुद्ध आकार असतो, असे मानावे लागते. आता ॲरिस्टॉटलच्या मताप्रमाणे शुद्ध, आशयहीन आकार म्हणजे विचार. तेव्हा विश्वाचा आदिचालक म्हणजे चिरंतन असा विचार किंवा बुद्धी. हिलाच ॲरिस्टॉटल ईश्वर म्हणतो. ह्या विचाराचा आशय काय? ॲरिस्टॉटलच्या म्हणण्याप्रमाणे हा विचार स्वतःचाच विचार करीत असतो. स्वतःचा आकार परिपूर्ण स्वरूपात प्राप्त करून घेण्यात वस्तूचे कल्याण असते व म्हणून त्या आकाराची ओढ प्रत्येक वस्तूला असते. ईश्वर परिपूर्ण आकार असल्यामुळे तो कल्याणस्वरूप आहे, विश्वातील सर्व वस्तूंना ईश्वराची स्वाभाविक ओढ आहे व ह्या ओढीतून विश्वातील सर्व चलनवलन घडून येते.
सत्सामान्ये किंवा आकार ह्यांना पृथक अस्तित्व असते, ह्या प्लेटोच्या मताचे ॲरिस्टॉटलने खंडन केले आहे.
ॲरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार द्रव्यनिष्ठ वस्तूतून सत्सामान्य वेगळे स्वतंत्रपणे असू शकत नाही. या जगातील सर्वच सतत कमीजास्त प्रमाणात विकार पावत असते. जे विकार पावते ते द्रव्य आणि ज्यात ते परिणाम रूपात उतरते तो आकार असतो. बदलाच्या या प्रक्रियेत, प्रत्येक बदलाबरोबर द्रव्यसुद्धा कमी कमी होत जाऊन अधिकाधिक आकारात ते परिणत होते. ॲरिस्टॉटलला निसर्गातील परिवर्तनाचा अर्थ, विकासक्रम हा प्रगतीपर असल्याचे वाटते. केवळ द्रव्य या स्थितीकडून अखेर केवळ आकार या दिशेने तो प्रवास आहे असे त्याचे म्हणणे आहे. शुद्ध द्रव्यरहित आकार त्याच्या मते ईश्वराचे प्रतीक आहे. ईश्वर या अर्थाने आकाराचा आकार अर्थात विकासक्रमातील अंतिम उद्दिष्ट ठरतो.
संदर्भ
- मराठी तत्त्वज्ञान महाकोश, मराठी तत्त्वज्ञान - महाकोश मंडळ, पुणे, प्रमुख संपादक दे. द. वाडेकर, प्रथम खंड.
- मराठी विश्वकोश, खंड पहिला.