Jump to content

ॲनॅक्झिमेनीस

ॲनॅक्झिमेनीस

ॲनॅक्झिमेनीस हा मायलेटसचा रहिवासी असलेला थेलीसचा अनुयायी होता. याचा जन्म इ.स. पूर्व सहाव्या शतकामध्ये मध्ये झाला. हा मायलेशियन संप्रदायाचा तिसरा तत्त्वज्ञ होय. थेलीसने विश्वाच्या मूळ कारणाचा अभ्यास करण्याची परंपरा सुरू केली, ॲनॅक्झिमेनीसने ती परंपरा पुढे चालू ठेवली. थेलीसप्रमाणेच विश्वाचे मूळ कारण कोणते असावे, हा प्रश्न ॲनॅक्झिमेनीसपुढे उपस्थित झाला होता. एक विश्वाच्या कारणासंबंधीचे थेलीसचे विचार मान्य नव्हते. विश्व पाण्यापासून निर्माण होते. मूलभूत द्रव्य जलरूप असावे, हा थेलीसचा विचार ॲनॅक्झिमेनीसला मान्य नव्हता. विश्वाचे मूलकारण जलरूप नसून वायुरूप असावे, असे ॲनॅक्झिमेनीस म्हणतो. विश्व पाण्यापासून निर्माण झाले नसावे, तर ते वायूपासूनच निर्माण झाले असावे. असे म्हणण्यामागे ॲनॅक्झिमेनीसने कोणता विचार केला असावा, हे खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल.

जीवनाला आवश्यकता कशाची? याचा विचार केल्यास असे दिसून येते की, जरी पाणी जीवनास आवश्यक असले, तरी वायू त्याच्याहीपेक्षा अत्यावश्यक आहे. अन्न, पाण्यावाचून सजीव काही काळ जगू शकतो, परंतु वायू म्हणजे श्वासोच्छवास याशिवाय कोणताही सजीव क्षणभरसुद्धा जगू शकणार नाही. म्हणजेच पाण्यापेक्षा वायू अधिक जीवनावश्यक असल्याने वायू हे सर्व विश्वाचे मूळ कारण असावे, असे म्हणता येते.

दुसरे कारण असे असे की, प्रत्येक पदार्थांची मूळ अवस्था वायुमय आहे, असे दिसते. द्रवरूप पाणी आणि घनरूप बर्फ हे दोन्हीही सर्वप्रथम वाफेच्या म्हणजेच वायूच्या रूपामध्ये असतात, असे दिसते. बर्फ आणि पाण्याप्रमाणे जगातील प्रत्येक पदार्थाचे मूळ स्वरूपसुद्धा वायुमय असले पाहिजे. थोडक्यात वायुस्वरूप असलेल्या मूलभूत द्रव्यापासून विश्व निर्माण झाले असावे, असे म्हणायला प्रत्यक्ष अनुभवास येणाऱ्या घटनांचा आधार आहे, असे ॲनॅक्झिमेनीसला वाटले, म्हणून ॲनॅक्झिमेनीसने विश्वाचे मूळ कारण वायू असले पाहिजे, असा सिद्धान्त मांडला.

संदर्भ

१) मराठी तत्त्वज्ञान महाकोष २) पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा इतिहास – ग. ना. जोशी