९२वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन (सांगली)
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे भरवले जाते. ९२वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सांगली येथील नेमिनाथनगर परिसरात ‘बालगंधर्वनगरी’ येथे २१ व २२ जानेवारी इ.स. २०१२ रोजी पार पडले. सांगलीत यापूर्वी इ.स. १९२४ साली बाबासाहेब घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली त्याचप्रमाणे १९४३ या वर्षी ना. वी. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यानंतर इ.स. १९८८ मध्ये ज्येष्ठ नाट्य कलावंत / निर्माते राजाराम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नाट्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले होते. महापालिका निवडणुकीची आचारसंहिता असल्याने मुख्यमंत्र्यांना उद्घाटन करण्यास निवडणूक आयोगाने मज्जाव केला.
पूर्वसंध्या
संमेलनाच्या पूर्वसंध्येला १९ जानेवारीला ‘घाशीराम कोतवाल’च्या प्रयोगाने संमेलनास सुरुवात झाली. विष्णूदास भावे नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग झाला. विजय तेंडुलकर लिखित या नाटकाची निर्मिती पुणे येथील निलोत्तम पांडव यांची होती. २० जानेवारीला 'आरंभ ते प्रारंभ' या कार्यक्रमाच्या निमित्ताने कृष्णाकाठी जन्मलेले रंगकर्मी बालगंधर्व, विष्णूदास भावे, काकासाहेब खाडिलकर, पठ्ठे बापूराव अशा अनेक दिग्गजांच्या स्मृतींना स्थानिक कार्यकर्त्यांनी लावणी, गोंधळ, पोवाडा, नाट्यगीते अशा माध्यमांतून अभिवादन केले.
उद्घाटन
अमोल पालेकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले, श्रीकांत मोघे संमेलनाध्यक्ष होते. श्रीकांत मोघे यांनी नाट्यचळवळीतील नव्या पिढीबाबत आशादायी सूर लावला; तर ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक व अभिनेते अमोल पालेकर यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची वृत्ती, हेतू आणि भूमिकेचा पंचनामा केला.
कार्यक्रम
आठ नाटके, एक महानाट्य, १५ पथनाट्ये, परिसंवाद, चर्चासत्रे, प्रसिद्ध अभिनेत्यांची ‘कलारंग रजनी’, पाच एकांकिका, एक एकपात्री प्रयोग अशा भरगच्च कार्यक्रमांची संमेलनात रेलचेल होती. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे आजी आणि माजी अध्यक्ष यांची प्रकट मुलाखत हे शेवटच्या दिवसाचे आकर्षण होते.
संदर्भ
मटामधील बातमी Archived 2012-01-24 at the Wayback Machine. मटामधील बातमी[permanent dead link]