हेलन केलर
हेलन केलर | |
---|---|
जन्म | हेलन ॲडम्स केलर जून २७, इ.स. १८८० टस्कंबिया, अलाबामा, अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
मृत्यू | जून १, इ.स. १९६८ ईस्टन, कनेटिकट, अमेरिकेची संयुक्त संस्थाने |
मृत्यूचे कारण | मेंदूतील रक्तस्राव |
चिरविश्रांतिस्थान | नॅशनल कॅथेड्रल, वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका |
राष्ट्रीयत्व | अमेरिकन |
पेशा | राजकीय कार्यकर्ती, व्याख्याती, समाजसेविका |
कारकिर्दीचा काळ | इ.स. १९०९ - इ.स. १९६१ |
धर्म | ख्रिस्ती |
वडील | आर्थर केलर |
आई | केट ॲडम्स |
पुरस्कार | प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम |
स्वाक्षरी |
डॉ. हेलन ॲडम्स केलर (जून २७, इ.स. १८८० - जून १, इ.स. १९६८) या अमेरिकन लेखिका, सुधारक व प्राध्यापिका होत्या. महाविद्यालयातून पदवीदार होणाऱ्या त्या पहिल्या मूकबधिर व्यक्ती होत्या .
सुरुवातीचे दिवस
हेलन केलर हिचा जन्म २७ जून, इ.स. १८८० मध्ये टस्कंबिया, अलाबामा येथे झाला. तिच्या आजोबांनी काही दशकांपूर्वी बांधलेल्या एव्ही ग्रीन या घरात त्यांचे कुटुंब राहत होते. हेलनच्या आईचे नाव केट ॲडम्स होते. हेलनच्या वडिलांनी बरीच वर्षे 'टस्कंबिया नॉर्थ अलबमियन'चे संपादन केले व नंतर काही दिवस ते सांघिक राज्य सेनेचे [१] कप्तान होते. हेलनची आजी ही रॉबर्ट ई ली यांची बहीण होती. हेलनची आई केट ही चार्लस ॲडम्स यांची मुलगी होती. हेलनच्या पूर्वजांपैकी एक जण हे झूरिचमध्ये मूक बधिरांसाठीचे पहिले शिक्षक होते.
हेलन या जन्मजात मूक बधीर नव्हत्या. लोहितांग ज्वर (स्कार्लेट फीव्हर) किंवा मस्तिष्कावरण ज्वरामुळे (मेनिंजायटिस) नंतर ती अंध आणि बधिर झाली.
प्राथमिक शिक्षण
मे, इ.स. १८८८ मध्ये केलर यांनी अंधांसांठीच्या पर्किनस संस्थेत प्रवेश घेतला. इ.स. १८९४ मध्ये त्यांनी आणि ॲन सॅलिव्हन यांनी न्यू यॉर्कमधल्या बधिरांसाठीच्या राइट ह्यूमसन शाळेत प्रवेश घेतला आणि सारा फुलर यांच्याकडून शिक्षण घेतले. इ.स. १८९६ मध्ये त्या मॅसेच्युसेट्सला परतल्या. केलर यांनी महिलांसाठीच्या केंब्रिज शाळेत प्रवेश घेतला आणि १९०० मध्ये त्या रॅडक्लिफ कॉलेजला गेल्या व तेथे त्या ब्रिग्स हॉल, साऊथ हाऊसमध्ये राहिल्या. त्यांचे प्रशंसक, मार्क ट्वेन यांनी त्यांची ओळख हेन्री हटलस्टन यांच्याशी करून दिली, त्यांनी व त्यांच्या पत्नी एबी यांनी केलर यांच्या शिक्षणाचे पैसे भरले.
लेखन
केलर यांनी १२ पुस्तके आणि अनेक लेख लिहिले आहेत.
- दि फ्रॉस्ट किंग : वयाच्या ११ वर्षी त्यांनी द फ्रॉस्ट किंग (पुस्तक) (इ.स. १८८१) हे पुस्तक लिहिले. मात्र या कथेवर साहित्य चोरीचा आरोप झाला होता. ती कथा द फ्राॅस्ट फेअरीज या मार्गरेट कॅनबी यांच्या पुस्तकातून घेतली होती. पुढे संशोधनांती कळाले की केलर यांना अर्धचेतनस्मृती झाली होती, म्हणजेच की त्यांना कॅनबी यांची कथा ऐकवली गेली होत त्यांच्या अंतर्मनामध्ये राहिली होती.
- दि स्टोरी ऑफ माय लाइफ : वयाच्या २२ वर्षी त्यांनी स्वतःची आत्मकथा द स्टोरी ऑफ माय लाइफ (पुस्तक) (इ.स. १९०३), सॅलिव्हन आणि त्यांचे पती जॉन मेसी यांच्या साहाय्याने लिहिली. ही आत्मकथा त्यांच्या वयाच्या २१ वर्षे पर्यंतच्या महाविद्यालयाच्या काळातील आहे आणि त्यांच्या स्वतःच्या शब्दांत लिहिली आहे.
- दि वर्ल्ड आय लिव्ह इन : केलर यांनी द वर्ल्ड आय लिव्ह इन (पुस्तक) (इ.स. १९०८) साली प्रकाशित केले. या पुस्तकातून जगाबद्दल काय वाटते हे सांगितले आहे. त्यांची ‘आऊट ऑफ द डार्क', ही सामाजिक विषयांवरील निबंधांची मालिका इ.स. १९१३ मध्ये प्रकाशित केली.
अकीता कुत्रा
जेव्हा केलरने जुलैमध्ये इ.स. १९३७ साली जपानमध्ये अकीता परगण्याला भेट दिली, तेव्हा त्यांनी हाचीको या इ.स. १९३५ साली वारलेल्या प्रसिद्ध अकीता कुत्र्याबद्दल चौकशी केली, तिने एका जपानी माणसाला सांगितले की तिलाही तसे कुत्रे हवे आहे; तिला महिन्याभरातच कामिकाझे-गो नावाचा एक कुत्रे देण्यात आले, पण ते विषाणुजन्य रोगाने मेले. जुलै, इ.स. १९३८ मध्ये जपानी सरकारने कामिकाझे-गोचा थोरला भाऊ केंझन-गो नावाचा आणखी एक कुत्रा त्यांना भेट म्हणून दिला.. हेलर यांनी नेलेल्या या कुत्र्यांमुळे अमेरिकेत अकीता कुत्र्यांबद्दल जागरूकता निर्माण झाली.
सहकारी
ॲनी मेन्सफील्ड सॅलिव्हन ह्यांचे सहकार्य हेलन केलर यांच्या जीवनात लाभले. हेलनचे शिक्षण झाल्यानंतरही त्या तिच्याबरोबर काही काळ राहिल्या. ॲन यांचा विवाह जॉन मेसी ह्यांच्याशी इ.स. १९०५ साली झाला. त्यांची तब्येत इ.स. १९१४ नंतर उतरत गेली. ॲन सॅलिव्हन ह्यांचा मृत्यू १९३६ साली झाला. त्यापूर्वी त्या कोमात होत्या. मृत्यूसमयी त्यांचा हात केलर यांच्या हातात होता. [२] त्यांच्या मृत्यूनंतर थाँप्सन आणि केलर या दोघी कनेटिकट येथे निवास करू लागल्या.
पॉली थाँप्सन यांना हेलनच्या घराची काळजी घेण्यासाठी नेमले होते. मूकबधिर लोकांबरोबर संवाद साधण्याचा अनुभव नसलेल्या अशा त्या एक साधारण तरुणी होत्या. [३] हेलन त्यानंतर ॲन आणि जॉन ह्या दोन्ही सहकाऱ्यांबरोबर फॉरेस्ट हिल्स, क्वीन्स येथे राहण्यास गेल्या व त्यांनी तिथून "अमेरिकन फाऊंडेशन फॉर द ब्लाईंड" सुरू केले. [४]. १९५७ साली थाँप्सनना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची तब्येत खालावली. १९६० साली त्यांचा मृत्यू झाला.
नंतरचे आयुष्य
इ.स. १९६१ मध्ये हेलन केलर यांना हृदयविकाराचा झटका आला. शेवटच्या दिवसात त्या त्यांच्या घरातच होत्या. १४ सप्टेंबर, इ.स. १९६४ रोजी राष्ट्रपती लिंडन बी. जॉन्सन यांनी हेलन केलर यांना अमेरिकेमधील सर्वश्रेष्ठ नागरी सन्मान असलेले प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम दिले. इ.स. १९६५ मध्ये त्यांची नॅशनल वीमेन्स हॉल ऑफ फेममध्ये निवड झाली. केलर यांनी नंतरचे आयुष्य अमेरिकन फाऊंडेशन, ह्या अंध लोकांच्या संघटनेसाठी निधी जमवण्यात खर्ची घातले .१ जून, इ.स. १९६८च्या रात्री आर्कन रीज, ईस्टर्न, कनेटिकट येथील घरात झोपेतच त्यांचा मृत्यू झाला.
हेलन यांच्या नावाचे पुरस्कार
पुण्याच्या आडकर फाउंडेशन आणि श्यामची आई फाऊंडेशन या संस्था अंधांकरिता काम करणाऱ्या व्यक्तीला डॉ. हेलन केलर पुरस्कार देतात. २०१६ साली हा पुरस्कार पुणे विद्यापीठातील प्रगत तंत्र अंध विद्यार्थी केंद्राचे समन्वयक धनंजय भोळे यांना प्रदान करण्यात आला. (२७-६-२०१६). २०१५ साली हा पुरस्कार निरंजन पंड्या यांना मिळाला होता.
संदर्भ
- ^ सांघिक राज्य सेना (इंग्लिश: Confederate States Army, कॉन्फेडरेट स्टेट्स आर्मी)
- ^ "संग्रहित प्रत". 2012-12-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-10-28 रोजी पाहिले.
- ^ http://www.graceproducts.com/keller/life.html
- ^ http://en.wikipedia.org/wiki/Royal_National_Institute_of_Blind_People