Jump to content

हेडीस

हेडीसचा पुतळा

हेडीस (/ˈheɪdiːz/; ग्रीक: ᾍδης Hádēs; Ἅιδης Háidēs) हा प्राचीन ग्रीक मिथकशास्त्रानुसार पाताळभूमीचा राजा व मृतांचा देव मानला जातो, तो क्रोनस आणि रिया यांचा मोठा मुलगा होता.[][]तो झ्यूसपोसायडन यांचा भाऊ आहे. झ्यूस आणि डीमीटरची यांची मुलगी पर्सेफनी ही त्याची पत्नी होती. []

हेडीसशी संबंधित अनेक मिथकांपैकी त्याने पर्सेफनीचे केलेले अपहरण हे एक अत्यंत प्रख्यात असे मिथक होय. हेडीसशी विवाह करण्यास ती उत्सुक नसल्याने तिचे त्याने बळजबरीने अपहरण केल्याचे मिथकांमध्ये वर्णिले आहे.[][]

सृष्टीच्या विभाजनाच्या वेळी टायटन्सविरुद्ध ऑलिम्पियन्स या दैवी युद्धात आपल्या वडिलांचा‒क्रोनसचा‒पाडाव झाल्यानंतर झ्यूसने अंतरिक्षावर, पोसायडने समुद्रावर, तर हेडीसने पाताळावर आपली सत्ता प्रस्थापित केली. तसेच पृथ्वी या तिघांनीही आपापसात वाटून घेतली.[]ग्रीक दंतकथामध्ये अनेकदा पाताळभूमीला ‘हेडीस’ या नावानेच संबोधले जाते.साधारणपणे हेडीस हा पाताळाचा देव असल्याने आणि त्याने ऑलिम्पियस पर्वताला कधीच भेट दिली नसल्याने १२ ऑलिम्पियन्स देवतांमध्ये त्याचा समावेश केला जात नाही. परंतु एल्युसिनिअन गूढकथांच्या प्रभावामुळे हेडीस कधीकधी या देवतांमध्ये गणला गेला आहे.[]

हेडिसला मिथकांमध्ये तीन शिरे/मस्तक असणाऱ्या ‘सर्बेरूस’ या नावाचा संरक्षक कुत्र्यासोबत वर्णिला आहे.[] त्याचा रथ चार काळे घोडे ओढतात. []त्याचे शस्त्र त्रिशूळासारखे[] असून त्याद्वारे तो भूकंप निर्माण करतो. हेडीसला ‘हेस्प्रोस थेऑस’ अर्थात मृत्यू आणि अंधार यांचा राजा असेही एक बिरुद बहाल केले गेले आहे. मृतांवर राज्य करणाऱ्या या देवतेचे गृह (पाताळ) हे दाट सावल्यांचे असून ते कायम मृतांनी भरलेले असते, असे म्हणले जाते.ग्रीक कलेमध्ये आणि मिथकांमध्ये इतर देवतांच्या तुलनेने हेडीसचे वर्णन त्याच्याविषयी वाटणाऱ्या भीतीपोटी कमी आले आहे. प्लुटो म्हणून चित्रित केलेला हेडीस विविध कलांमध्ये अत्यंत सकारात्मक आढळतो. त्याच्या हातामध्ये अनेकदा ग्रीक मिथकशास्त्रामधील प्रसिद्ध असे बोकडाचे शिंग असते. ह्या शिंगातून फळे, फुले आणि धान्यादिक स्रवत असतात. जे की, संपन्नता आणि समृद्धी यांचे द्योतक आहे. इट्रुस्कन[] देवता आइटा, रोमन देवता दिस पॅटर आणि ऑर्कस यांच्यानंतर हेडीसला समांतर देवता झाल्या, असे आपल्याला दिसून येते. ह्या सर्व देवता पुढे प्लुटो या एकाच देवामध्ये समाविष्ट झाल्या आणि या नावानेच ओळखल्या जाऊ लागल्या.[]

नाव व व्युत्पत्ती

हेडीस या शब्दाचे मूळ आणि व्युत्पत्ती ही अनिश्चित आहे. त्याचा अर्थ ‘अदृष्ट’ (Unseen) असा केला जातो. अर्वाचीन भाषाशास्त्रज्ञांनी ह्या शब्दाचे प्रोटो-ग्रीक मूल *Awides असे दिले असून याचाही अर्थ ‘अदृष्ट’ असाच आहे. एका पुरातन संदर्भानुसार हेडीस अदृश्यततेचे आवरण/उष्णीश घालतो, असेही म्हणले जाते. हे आवरण/उष्णीश त्याला सायक्लोप्स याने टायटन्सविरुद्ध लढण्यासाठी बहाल केले होते. ह्या अदृष्टाच्या भीतीमुळे त्याचे नाव ग्रीक उच्चारत नसत. ५व्या []शतकाच्या सुमारास ग्रीक समाज त्याला ‘प्लुटो’ या नावाने संबोधित करू लागले, असे मिथकांमधून कळून येते. एल्युसिनिअन गूढकथांमध्ये हेडीस ‘प्लुटो’ या नावानेच प्रसिद्ध आहे. प्लुटो या शब्दातील मूळ धात्वर्थ हा ‘समृद्ध’ असा असल्याने पाताळात राहणारा हा प्लुटो (अर्थातच हेडीस) कसदार माती, सुपीक जमीन, सुवर्णादी धातू, खनिजे, फळे-फुले-अन्नधान्याच्या रूपाने समृद्धीच देत असतो, असा समज तत्कालीन ग्रीक समाजात प्रचलित असावा. नंतर प्लुटो ही पाताळावर राज्य करणारी तसेच लोकांना संपन्न करणारी अशी रोमन देवता म्हणून ओळखली जाऊ लागली.[][]

संदर्भ यादी

  1. ^ a b c d e f g "Hades". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-11-11.
  2. ^ a b c d e "हेडीस (Hades)". मराठी विश्वकोश. 2020-01-09 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Hades' Chariot". Greek Mythology Wiki (इंग्रजी भाषेत). 2020-01-09 रोजी पाहिले.
  4. ^ "Bident". Wikipedia (इंग्रजी भाषेत). 2019-12-30.