Jump to content

हिरवळीचे खत

हिरवळीचे खत म्हणजे पिकांच्या वाढीसाठी तसेच जमनीच्या सुपिकतेसाठी आवश्यक असणारी अन्नद्रव्ये जमिनीत उपलब्ध व्हावेत म्हणून हेतूुरस्सर जमनित गाडलेला विशिष्ट वनस्पतींचा हिरवा पाला होय. हा पाला जमिनीत गाडल्या नंतर तो कुजतो आणि त्यातील उपलब्ध अन्नद्रव्ये मातीत मिसळतात. जमिनीमध्ये जैव पदार्थांची भर करण्यासाठी ह्या प्रकारच्या खताचा उपयोग करतात. जमिनीत लवकर तयार होणारी पिके लावून ती ठराविक वेळी नांगराने जमिनीत गाडून टाकतात. ह्यासच हिरवे खत म्हणतात. हे खत स्वस्त असून त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. तसेच त्यामुळे जमिनीच्या संरचनेत बदल होतो, पावसाचे पाणी जमिनीत मुरते, पाण्याचा निचरा होण्यास व जमिनीची धूप होण्यास प्रतिबंध होतो. शिंबावंत वनस्पतींच्या पिकांमुळे लागोपाठ घेण्यात येणाऱ्या पिकांना लागणारा नायट्रोजनाचा जादा पुरवठा होतो. ही खते सर्वप्रकारच्या शेतीसाठी उपयुक्त असतात.[]

हिरवळीचे खत तयार करतेवेळेस पुढील काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. जसे की हिरवळींच्या खतासाठीचे पिक हे पटकन आणि चांगले वाढणारे असावे. हे पिक रसदार आणि तंतूचे असावे ज्यामुळे ते लवकर कुजावे. हे पिक सर्वप्रकारच्या मातीत वाढणारे असून त्यात द्विदल, एकदल तसेच तेलबिया इत्यादींचा समावेश असावा. या पिकामुळे मातीवर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये. साधाणपणे पिक ४५ दिवसांचे झाले म्हणजे ते फुलोऱ्यावर येते आणि त्याच वेळी ते जमिनीत गाडावे. पिकाच्या वाढीसाठी हवा, पाणी आणि सूर्यप्रकाश मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावेत.[]

हिरव्या खतासाठी शिंबावंत वनस्पती व इतर वनस्पती किंवा दोन प्रकारच्या वनस्पती वापरतात. भारतात याकरिता सामान्यत: सनताग, रानशेवरी (धैंचा), उडीद, मुगवेल, गवार, तूर, कुळीथ (हुलगा), नीळ, मसूर, वाटाणा, शेंजी, बरसीम, मेथी, लाख, ग्लिरिसिडिया इ. वनस्पती वापरतात. काही वेळा पाण्याचा निचरा कमी होण्यासाठी व जमिनीची धूप कमी करण्यासाठी लावलेल्या पिकांचा वापर हिरव्या खतांसाठी करतात. जमिनीत गाडण्याच्या वेळी पीक रसदार असावे व जमिनीत भरपूर ओल असावी म्हणजे ते चांगले कुजते. गाडल्यापासून ४–६ आठवड्यांनंतर दुसरे पीक लावतात. अशा रीतीने दर हेक्टरी १२–१५ टन हिरवे खत जमिनीत गाडले जाते व त्यामुळे ४५–९० किग्रॅ. नायट्रोजन, तसेच इतर पोषक द्रव्ये जमिनीला मिळतात.[] हिरवळीचे खत तयार करताना वापरण्यात येणाऱ्या वनस्पतीतील साधारण नत्राचे प्रमाण पुढीप्रमाणे असते - ताग (भोरू) ०.४६ %, चवळी ०.४२ %, गवार ०.४९ %, सुर्यफुल ०.४५ %, हरभरा ०.५० %, सोयाबीन ०.७१ %, उडीद ०.४७ %, मटकी ०.३५ %, लसून घास ०.७३ %, करंज २.६१ %, अंजन १.४२ %, ऐन २.०४ %, भेंड २.९० % आणि गिरिपुष्प २.७४ %.[]

ज्या प्रदेशात भरपूर आर्द्रता असते अशा प्रदेशातील जमिनीतच हिरवे खत करण्याची प्रथा आहे. ज्या ठिकाणी हिवाळ्यातील कडक थंडी पिकांना मानवत नाही अशा ठिकाणी हिवाळ्यात हिरवे खत करण्यात येते. समशीतोष्ण कटिबंधाच्या प्रदेशातील फळबागांत व उपवनांत हिरवे खत करतात. भात, ऊस, कापूस व इतर पिकांसाठी भारतात नेहमी हिरवे खत वापरले जाते. समुद्रकिनारी आवळी व आंबा ह्यांची पाने हिरव्या खतासाठी वापरतात.[]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ a b c "खते". मराठी विश्वकोश. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.
  2. ^ a b "हिरवळीचे खत". विकासपेडिया. २६ सप्टेंबर २०२२ रोजी पाहिले.