Jump to content

हार्ली ग्रॅन्‌व्हिल-बार्कर

इंग्रज नाट्यसमीक्षक, नट, नाट्यनिर्माता आणि नाटककार. जन्म लंडनमध्ये. वयाच्या तेरा-चौदाव्या वर्षांपासून त्याचा रंगभूमीशी नट म्हणून आणि पुढे व्यवस्थापक, निर्माता, नाटककार ह्या नात्यांनी संबंध आला. परिणामतः रंगभूमीच्या विविध तांत्रिक अंगांचे उत्तम ज्ञान त्याला प्राप्त झाले आणि नाट्यकृतींच्या आस्वाद-मूल्यमापनासंबंधीचा त्याचा एक निश्चित दृष्टिकोण विकसित झाला. इब्सेन, माटरलिंक, शॉ, गॉल्झवर्दी इ. आधुनिक नाटककारांची नाटके, तसेच गिल्बर्ट मरीने इंग्रजीत अनुवादिलेल्या प्राचीन ग्रीक नाट्यकृती त्याने यशस्वी रीत्या रंगभूमीवर सादर केल्या. शेक्सपिअरची नाटके— विशेषतः द विंटर्स टेल  आणि द ट्‍वेल्‌फ्‌थ नाइट  त्याने अभिनव पद्धतीने सादर केली.

विसाव्या शतकातील इंग्रजी रंगभूमीवरील शेक्सपिअरची नाटके सादर करण्याच्या पद्धतीवर ग्रॅन्‌व्हिल-बार्करच्या दृष्टीचा मोठा प्रभाव पडला. द व्हॉय्‌सी इन्‌हेरिटन्स (१९o५), वेस्ट (१९o७), द मद्रास हाउस (१९१o) ह्यांसारखी स्वतंत्र नाटकेही त्याने लिहिली.

पहिल्या महायुद्धानंतरच्या इंग्रजी रंगभूमीशी त्याला फारसे जमवून घेता आले नाही. तो पॅरिसमध्ये स्थायिक झाला. तेथे असतानाच शेक्सपिअरसमीक्षेत मोलाची भर घालणारी  ‘प्रेफसिस टू शेक्सपिअर’ (१९२७—४८) ही ग्रंथमाला त्याने लिहिली. रंगभूमीचे सखोल ज्ञान आणि रसिक पण चिकित्सक वाङ्‌मयीन दृष्टिकोण ह्या दोहोंचा प्रत्यय त्या ग्रंथमालेतून येतो. पॅरिस येथे तो निधन पावला.