Jump to content

हवेवर चालणारी वाहने

हवेवर चालणारी वाहनांची इंजिने ही दाब असलेली हवा, म्हणजेच काँप्रेस्ड हवेवर चालणारी इंजिने आहेत. म्हणून यांना हवेवर चालणारी वाहने असे म्हंटले जाते.

इतिहास

हवेच्या दाबावर इंजिने चालवणे तसे नवे नाही. याची सुरुवात अगदी दोन शतके आधीच झाली आहे. युरोप मध्ये ट्रॅम आणि रेल्वेसुद्धा यावर चालवली गेली आहे. मात्र तरी सहज मिळणाऱ्या पेट्रोल पुढे ही इंजिने तशी दुर्लक्षीतच राहिली. कारण उच्च दाबाची हवा ही पेट्रोलपेक्षाही महागडी ठरत होती.

सद्य स्थिती

आता मात्र पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे अनेक मोटार कंपन्यांचा हवेवरील इंजिनातील रस वाढला आहे. सध्या फ्रांस मधल्या एम डी आय या कंपनीच्या एर कारच्या शोधामध्ये इंजिन अतिउच्च दाबाची हवा वापरते. हे इंजिन चालविण्यासाठी पेट्रोलचा स्फोट घडवून पिस्टनचा दट्ट्या फिरवण्या ऐवजी, दाब असलेली हवा सोडून पिस्टनचा दट्ट्या फिरवायचा अशी साधी सोपी रचना आहे. या रचनेमुळे सध्याच्या इंजिनात असलेले अनेक घटक जसे कार्ब्युरेटर वगरे निरुपयोगी ठरतात. स्पार्क प्लग्जच्या जागी सोलोनॉइड वॉल्व बसवता येतात आणि टायमींग मात्र असलेल्या प्रणालीचेच वापरून हवेचे नियंत्रण होईल. अर्थातच थोडे फार फेरफार करून आजच्या काळातल्या अनेक गाड्या यावर चालू शकतील. मात्र त्यासाठी हवेचा दाब उच्च असणे फार आवश्यक आहे. आणि इतक्या उच्च दाबाची हवा असलेली टाकी एखाद्या अपघातात फुटली तर आपल्या चिंध्याही सापडणे अवघड. मात्र आता कार्बन फायबर आणि काही विशिष्ट धातू या अतिशय चिवट मिश्रण असलेल्या टा़क्या बनवून या फ्रांसच्या संशोधक कंपनीने हा प्रश्न सोडवला आहे. शिवाय या टाक्या दुहेरी आवरणाच्याही असणार आहेत.

याच वेळी ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्न मध्ये असलेल्या एका एंजेलो दि पिएत्रो नावाच्या संशोधकानेही हवेवर चालणारी वाहने बनवली आहेत. मात्र या संशोधकाचे इंजिन हे वेगळेच, रोटरी इंजिन प्रकारचे आहे. म्हणजे वँकेल या जर्मन संशोधकाने इ.स. १९५० ते ५७ साली बनवलेल्या इंजिनावर आधारीत हे हवेवर चालणारे इंजिन आहे. या मध्ये घर्षण अगदी नगण्य आहे. आणि त्यामुळे हवेचा परिपुर्ण वापर करून घेतला गेला आहे असा दावा केला गेला आहे. शिवाय याचे वजन फक्त १२ किलो आहे.

भारतातील स्थिती

टाटा वनकॅट गाडी

सध्या फ्रांस मधल्या एम डी आय या कंपनीच्या एर कारच्या शोधामध्ये भारतीय उद्योजक टाटा मोटर्सनी रस घेतला आहे आणि त्यांच्याशी करारही केला आहे. भारतातल्या शहरी वाहतुकीसाठी हे फार उपयोगी ठरावे. कारण एंजेलो दि पिएत्रोचे इंजिन चालण्यासाठी अति उच्च दाबाची गरज नाहीये. त्यांचा असा दावा आहे की फक्त १ पिएसआय इतक्या दाबावरही हे इंजिन फिरू लागते. आणि एकदा टाकी भरल्यावर सलग २ तास इंजिन चालू शकते.

यामुळे दुचाकी वाहने तर कदाचित अजूनच चालतील. आणि भारतातला इंधनाचा प्रश्नही सुटायला मदत होईल. जवळपास फुकट प्रवास होत असल्याने वेग व अंतर दोन्ही कमी असले तरी लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचने