हरिपंडीत
हरिपंडीत Haripandit ( शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचे सुपुत्र )
पैठण निवासी संत एकनाथ महाराजांच्या पुत्रासंबंधाने आजपर्यंत फार जास्त माहिती उपलब्ध नव्हती; जी काही होती ती अर्धवट होती. विविध कीर्तनकार, लेखक आदींनी त्यांची प्रतिमा आपल्या वडिलांच्या विरोधी एक हट्टी मुलगा अशी केली होती परंतु हे अर्धसत्य असून त्यांनी आपल्या वडिलांची वारकरी पताका खांद्यावर घेऊन परंपरा वाढविलीच असे आहे.
संत एकनाथ महाराज व गिरिजाबाई या दाम्पत्याच्यापोटी एकूण तीन अपत्ये जन्मास आली. गोदावरीबाई (यांचा मुलगा मराठीतील प्रसिद्ध कवी मुक्तेश्वर होय), गंगाबाई (यांची मुलगी लक्ष्मीबाई कि जी कर्नाटकातील प्रसिद्ध कवी शिवरामपंत यांची आई होय) व पुत्र हरी !
हरी हा जन्मापासूनच पैठण येथे वाढल्यामुळे पैठणच्या वैदिक शिक्षणाचा त्याच्यावर प्रभाव होता. त्या काळात प्रत्येक ब्राह्मणाचा मुलगा वैदिक शिक्षण घेत. एकनाथ महाराजांची परमार्थीक क्षेत्रातील घौडदौड प्रचंड प्रमाणात वाढल्याने, नाथानी लोकांना नाम मार्गच कसा सोपा असून इतर मार्ग हे कालसुसंगत नाहीत किंवा त्याने मोक्ष प्राप्त होणार नाही असा उपदेश केल्याने लोकांची कर्मकांडांकडे निर्माण झालेली उदासीनता याने तत्कालीन वैदिक कर्मे करणाऱ्यांना पुरते काळजीत पाडले होते. त्यामुळे आता ते नाथ महाराजांचा विरोध करू लागले. मग नाथ कसे अवैदिक वागतात, बहुजनांना संस्कृतातील ज्ञान मराठीत सोपे करून सांगतात, त्यांच्या वाड्या वस्त्यांवर जाऊन नाम साधनेला लावतात इ.इ. चर्चा रंगू लागल्या. यातूनच नाथ पुत्र हरि यांस यावरून उलटे सुलटे बोलणे सुरू झाले. याचा परिणाम हरीच्या किशोरावस्थेत मनावर होऊ लागला व आपले वडील कसे धर्म बुडवत आहेत यावर त्यांचा विश्वास वाढू लागला.
हरी हा अत्यंत विद्वान व पंडित झाल्याने लोक त्यास हरिपंडित म्हणू लागले. आता हरिपंडित तरुण झाले. त्यांचा विवाह एका कुलीन पुत्रीशी झाला. त्यांना तीन पुत्र झाले. पहिला प्रल्हाद, दुसरा मेघश्याम व तिसरा राघोबा. घरात नाथ महाराजांच्या कृतीवरून वडिलांशी ते वाद घालू लागले. परिणामतः ते पैठण सोडून काशी (वाराणसी) ला परिवारासोबत निघून गेले. काही वर्षे ते तिथे राहिले. तेथेही त्यांनी मोठा अधिकार संपादन केला.
एकनाथ महाराज वृद्धावस्थेकडे झुकलेले पाहून त्यांची पत्नी गिरिजाबाई यांनी त्यांना हरीला पैठणला घेऊन येण्याचा आग्रह धरला. नाथमहाराज काशीस गेले व त्यांनी हरिपंडितास पैठण ला येण्यास सांगितले. त्यावर हरिपंडिताने दोन अटी टाकल्या कि, आपण संस्कृतातील तत्वज्ञान सामान्यालोकाना मराठीत सांगायचे नाही व परान्न घ्यायचे नाही. या दोन्ही अटी नाथानी काबुल केल्या. तदनंतर हरीपंडित आपल्या संपूर्ण परिवारास घेऊन पैठणला कायमचे राहण्यास आले.
दैनंदिन प्रवचन बंद पडू नये म्हणून नाथानी हरिपंडितास प्रवचन करण्यास सांगितले. हरिपंडीत नाथांऐवजी प्रवचन करु लागले. श्रोत्यांची संख्या रोजच्यारोज कमी होऊ लागली. नाथांप्रमाणे आपल्यावर लोकांची श्रद्धा नाही हे जाणुन त्यांचा अभिमान कमी होऊ लागला. परंतु तो संपूर्ण निरभिमानी व्हावा असे नाथांना वाटे. एका वृद्ध स्त्रीने नवरा हयात असताना सहस्र ब्राह्मण भोजनाचा संकल्प केला होता. परंतु तो काही कारणाने पूर्ण होऊ शकला नव्हता. तो पूर्ण व्हावा असे त्या स्त्रीस वाटे. तिने नाथांच्या प्रवचनात एक वाक्य ऐकले कि, एक ब्रह्मवेत्ता जेवू घातल्यास हजारो ब्राह्मणास भोजन घातल्याचे पुण्य मिळते. तिने नाथांनाच जेवणाचे आमंत्रण दिले. त्या स्त्रीच्या घरी जाऊन स्वयंपाक करण्याचे नाथांनी हरिपंडीतास सांगितले. हरिपंडीताने स्वयंपाक सिद्ध केला. नाथांची पत्रावळ मांडली, त्यांना पोटभर जेवू घातले. नाथ जेवण करून उठले, ’पत्रावळ तूच उचल’ असे नाथांनी हरिपंडीतास सांगितले. हरिपंडीताने पत्रावळ उचलली, परत येऊन पाहतो तर पत्रावळ जशीच्या तशी पुन्हा दुसरी उचलली तिसरी आली तिसरी उचलली चौथी आली, अशा हजार पत्रावळी हरिपंडीताने उचलल्या. त्या स्त्रीस सहस्रब्राह्मण भोजन घातल्याचा आनंद झाला व हरिपंडीतासही आपल्या वडीलांची महती कळली, अभिमान नष्ट झाला.
पुढे हरिपंडीतांनी नाथांप्रमाणेच पारमार्थिक आचरण ठेवले. ते एकनाथमहाराजांचे पुत्र तर होतेच आता त्यांनी एकनाथ महाराजांचा अनुग्रह प्राप्त केला व त्यांचे शिष्य बनले. एकनाथ महाराजांनंतर त्यांनी नाथ महाराजांचा वंशपरंपरा व गुरुपरंपरेनुसार चालत आलेला परमार्थ जपला व वाढवला. आपल्या तिन्ही पुत्रांना उपदेश देऊन वडिलांच्याही पूर्वीपासून चालत आलेला घराण्यातील वारकरी संप्रदाय व गुरुपरंपरेकडून आलेला दत्त संप्रदाय प्राणपणाने जपला. एकनाथ महाराजांनी इ.स. १५९९ साली जलसमाधी घेतली. त्यानंतर हरिपंडित महाराजांनी एकनाथ महाराजांची समाधी बांधली व त्यावर पादुकांची स्थापना केली. हेच स्थान एकनाथ महाराजांचे गोदाकाठावरील समाधी मंदिर असून लाखो भाविक पैठणला येऊन एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतात. एकनाथ महाराजांच्या समाधी नंतर इ.स. १५९९ साली हरिपंडित महाराजांनी पादुका डोक्यावर घेऊन पंढरपूरला आषाढी एकादशी साठी जाणे सुरू केले. पुढे याचे पालखी सोहळ्यात रूपांतर झाले. शिवाय बंद पडलेली आळंदीची कार्तिकी वारी जी कि एकनाथ महाराजांनी पुन्हा सुरू केली होती ती सुरू ठेवली. याशिवाय देवगिरीची वारीही सुरू ठेवली. एकनाथी भागवतासह नाथ महाराजांचे इतर वाङ्मय लोकांपर्यंत पोचवले. सध्या सोप्या मराठी भाषेत सामान्य लोकांसाठी आपल्या वडिलांप्रमाणे कीर्तने, प्रवचने सुरू केली. आजही पैठण पासून दूर दूर पर्यंत हरिपंडित महाराजांच्या शिष्य परंपरा पसरलेल्या असून त्यांच्या नित्य भजनात एकनाथ महाराजांसह हरिपंडित महाराजांचा उल्लेख येतो. जसे कि, "एकनाथ गुरू माझे आई मजला ठाव द्यावा पायी ... हरिपंडित गुरू माझे आई मजला ठाव दयावा पायी ... मेघश्याम गुरू माझे आई मजला ठाव दयावा पायी ..."
एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिहायला घेतले व युद्धकांडाच्या ४४ व्या अध्यायापर्यंत आल्यावर मी समाधी घेणार असे जाहीर केले. मग आता हे राहिलेले रामायण कोण पूर्ण करणार असा प्रश्न उपस्थित झाल्यावर एकनाथ महाराजांनी सांगितले कि हे गावोबा पूर्ण करील. गावोबा हा गोदावरी नदीच्या पलीकडील कावसान या गावातील कुलकर्ण्यांचा मुलगा होता, परंतु त्याला खायला आवडते म्हणून पुरणपोळी व ती एकनाथ महाराजांकडे मिळते म्हणून एकनाथ या दोन नावाशिवाय इतर नाव देखील घेता येत नव्हते. अनेक जण असा आक्षेप घेतात कि, हरिपंडित जर एकनाथ महाराजांचे पुत्र होते तर एकनाथ महाराजांनी भावार्थ रामायण लिखाणाचे वेळी गावोबावरच का कृपा केली ती हरिपंडितांवर का केली नाही ? तर त्याचे उत्तर असे आहे कि, जो विद्वान आहे त्या हरिपंडितांवर नाथानी या लिखाणाची जिम्मेदारी दिली असती तर ती फार विशेष गोष्ट ठरली नसती कारण हरिपंडित हे मुळातच विद्वान होते. तसेच ते या घटनेच्या आधीच एकनाथ महाराजांचे अनुग्रहित शिष्य बनले होते. गावोबा सारख्या मंदमति युवकावर नाथकृपा झाली तर तोहि संतांसारखेच तोलामोलाचे लिखाण करू शकतो, महान लेखक होऊ शकतो ते यातून दाखविणे अपेक्षित होते. जे कि एकनाथ महाराजांनी केले.[१]
हरिपंडित महाराजांची प्रतिमा अर्धवट माहितीच्या आधारे अनेकांकडून मालिन करण्यात आली होती. या माध्यमातून ती खऱ्या स्वरूपात समोर येईल अशी अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे आतातरी हरिपंडित महाराजांची योग्य व संपूर्ण माहिती लोकांपर्यंत पोचवल्या जाईल अशी अशा आहे.
- ^ "Sant Eknath Maharaj". santeknath.org. 2023-05-06 रोजी पाहिले.