Jump to content

हरितगृह

greenhouse in vigyan ashram

हरितगृह म्हणजे वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी सर्व भिंती व पूर्ण छत पारदर्शक असणारी काचेची मानव निर्मित एक कृत्रिम खोली. हिला 'ग्लास हाऊस' असेही म्हणतात. अति थंड प्रदेशात अत्यंत कमी असलेले तापमान अनेक झाडांना/वनस्पतींना सहन न होण्याने त्यांची योग्य अशी वाढ होत नाही किंवा त्या मरतात.अशा वनस्पतींचे संरक्षण करण्यास करण्यात आलेली ही व्यवस्था आहे.

युरोपात सतराव्या शतकाच्या सुरुवातीपासून काचेच्या हरितगृहात विविध प्रकारच्या वनस्पतीची लागवड सुरू झाली. प्रो इमरी केर्यस या केन्टुकी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाने १९४८ साली पहिल्यांदा हरितगृहासाठी लोखंडी /अल्युमिनियम/लाकूड/बांबूच्या सांगाडयावर काचेच्या पारदर्शक आच्छादनाचा वापर त्यामध्ये करून वनस्पतीची लागवड करता येते, हे दाखवून दिले. हरितगृहामध्ये वाढवलेल्या वनस्पतीनां वातावरणातील हानिकारक बदलापासून वाचविता येते. त्यांना अति पाऊस अति ऊन, धुके, यापासून संरक्षण मिळते. पॉलिहाऊस किंवा ग्रीनहाऊस (हरितगृह) या दोन्ही एकच गोष्टी आहेत. पूर्वी हरितगृहे लाकडी सांगाड्यावर आच्छादनासाठी काच वापरून उभी केली जात असत. आता प्लॅस्टिक तंत्रज्ञानामध्ये झालेल्या सुधारणांमुळे काचेऐवजी प्लॅस्टिक वापरले जाते. काचेच्या तुलनेत पॉलिथीनचा वापर हा स्वस्त असल्याने पॉलिथीन आच्छादने लोकप्रिय झाली आहेत, त्यामुळे आता हरितगृहांना पॉलिहाऊस असेही म्हणले जाते.

व्हिक्टोरिया ॲमाझोनिका या प्रजातीतील वॉटर लिलींच्या संरक्षणासाठी रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग वनस्पतीशास्त्रीय बागेत उभारण्यात आलेले एक हरितगृह

कार्य

सूर्य उगवल्यावर, त्याची किरणे या खोलीत शिरून तेथील जमीन व वनस्पतींना ऊब देतात. या प्रभावाने तेथील तापमान वाढून वनस्पतींसाठी अनुकूल अशा पोषक वातावरण तयार होते. त्या खोलीतील उष्णता बाहेर जाण्यास जागा नसल्यामूळे ती उष्णता तेथेच कोंडली जाते, व त्यामुळे तेथील वनस्पतींचे रात्रीपण कमी तापमानापासून संरक्षण होते. साधारणतः,अतिशीत वातावरण असलेल्या ठिकाणी अथवा देशांत वनस्पती संशोधन करण्यास या व्यवस्थेचा उपयोग होतो. यात, वनस्पतीस पोषक असणारी सूर्यप्रकाशाची नैसर्गिक प्रक्रिया वापरण्यात येते.

हरितगृहामध्ये वातावरणातील पाच प्रमुख घटक नियंत्रित केले जातात.

  • सूर्यप्रकाश - साधारण ५०००० ते ६०००० लक्‍सपर्यंत सूर्यप्रकाश हरितगृहामध्ये येऊ दिला जातो. त्यासाठी योग्य आकाराच्या सावलीच्या जाळ्याचा वापर केला जातो. सूर्याच्या प्रकाशातील अतिनील किरणे योग्य प्रकारची पॉली फिल्म वापरून रोखली किंवा नियंत्रित केली जातात. त्यामुळे वनस्पतीची योग्य वाढ होते.
  • तापमान - दिवसा २४ ते २८ अंश सेल्सियस व रात्री १५ ते १८ अंश सेल्सियसपर्यंत तापमान हरितगृहामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अशा तापमानाला वनस्पतीची चांगली वाढ होते.
  • कार्बन-डाय-ऑक्‍साईड -- ८०० ते १२०० पीपीएम CO2 हरितगृहामध्ये अडविला जातो. हे प्रमाण बाहेरील वातावरणापेक्षा तीन ते चार पट जास्त असते. त्यामुळे वनस्पतीमध्ये अन्ननिर्मिती चांगल्या प्रकारे होऊन वनस्पतीची वाढ जोमाने होते.
  • आर्द्रता - हरितगृहामध्ये सर्वसाधारणपणे दिवसा ६० ते ७० टक्के व रात्री ७० ते ८० टक्के आर्द्रता नियंत्रित केली जाते. त्यामुळे वनस्पतीची वाढ चांगली होते. वनस्पतीचा रोगांपासून व किडीपासून बचाव होतो.
  • वायुवीजन - हरितगृहामध्ये ८ ते १० टक्के वायुवीजन होईल,अशा पद्धतीने वरची खिडकी व बाजूच्या खिडक्‍या यांच्या पडद्यांची उघडझाप केली जाते. त्यामुळे हरितगृहामध्ये हवा खेळती राहते.हरितगृहामध्ये वातावरणातील घटक नियंत्रित केले जात असल्यामुळे पिकाची उत्पादन व गुणवत्ता चांगली मिळते.

हरितगृहाचे प्रकार

  • लिन टू
  • ए फेम
  • इबन स्पॅन
  • कोनसेट
  • गाॅथिक आर्च
  • जियोडेसिक होम
  • मल्टिस्पॅन रिज ॲन्ड फरो
  • कोनसेट विथ गटर सिस्टिम

परिणाम

अशा प्रकारे निर्माण होणाऱ्या परिणामाला हरितगृह परिणाम (ग्रीन हाऊस इफेक्ट) असे म्हणतात.

उपयोग

  • कट-फ्लाॅवर व भाजीपाला उत्पादन
  • कुंड्यांमधील लागवड
  • पिकांचे (फुले, भाजीपाला, फळे) यांचे उत्पादन
  • भाजीपाला व शोभिवंत रोपांच्या रोपवाटिका करणे
  • ऊतिसंवर्धन रोपांचे बळकटीकरण
  • भाजीपाला पिकांच्या जातींचे व बीजांचे उत्पादन घेणे
  • पिकांचे संशोधन व विकास

हे सुद्धा पहा