हणमंतराव रामदास गायकवाड
हणमंतराव रामदास गायकवाड | |
---|---|
जन्म | २१ ऑक्टोबर, १९७२ रहिमतपूर, सातारा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
शिक्षण | अभियांत्रिकी |
पेशा | उद्योजक |
संकेतस्थळ http://bvgindia.com/ |
हणमंतराव रामदास गायकवाड (जन्मः २१ ऑक्टोबर १९७२) हे एक भारतीय उद्योजक आणि भारतातील सर्वात मोठी एकात्मिक सेवा कंपनी 'भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) इंडिया लिमिटेड'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही कंपनी स्वच्छता राखण्याच्या कामापासून ते साखर कारखाना चालविणे आणि औषध उत्पादक होणे, तत्काळ सेवा पुरवणे, घन कचरा व्यवस्थापन, अशा अनेक क्षेत्रांत कार्यरत आहे.[१]
प्रारंभिक जीवन आणि शिक्षण
हणमंतराव गायकवाड यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे झाला. सातारा जिल्ह्यातल्या रहिमतपूरच्या न्यायालयात त्यांचे वडील कारकून होते तर आई घरगृहिणी होती. त्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण रहिमतपूरलाच झाले. चौथीत असतानाच त्यांना राज्यसरकारची शिष्यवृत्ती मिळाली.[२] पाचवीसाठी हणमंतरावांचे कुटुंब पुण्याला आले, पुण्यातील शाळेत प्रवेश मिळवला. पुढे चालून त्यांच्या वडिलांची बदली मुंबईला झाली. मुंबईचे वातावरण त्यांच्या प्रकृतीला मानवले नाही. त्यांना मधुमेह झाला आणि त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळतच गेली. त्यामुळे घरची परिस्थिती अजुन खालावली. आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्यांच्या आईने शिवणकाम सुरू केले. हणमंत त्यावेळी पुण्याच्या मॉडर्न स्कूल मध्ये शिकत होते. शाळा घरापासून खूप दूर होती, त्यावेळी ते शाळेत पायी जात असत. घर खर्चाची गरज पूर्ण करण्याकरिता त्यांची आई जवळच्याच महानगरपालिकेच्या शाळेत शिकवायला देखील जायच्या. अशा परिस्थितीतही त्यांनी दहावीला ८८% मिळवले.[२]
गायकवाड यांनी पुण्याच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि इलेक्ट्रॉनिक्स हा विषय निवडला. ते डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिकत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांच्या वडिलांचे निधन झाले. अशातूनही त्यांनी डिप्लोमा पूर्ण करून अभियांत्रिकीचा अभ्यास करण्यासाठी विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे प्रवेश घेतला.[२] इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू असताना त्यांनी पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या विद्यार्थांच्या शिकवण्या घेणे, घरांना रंग देणे अशी छोटी-मोठी कामे करत स्वतःचा निर्वाह केला. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असताना राष्ट्रीय खेळासाठी बालेवाडी स्टेडियममध्ये काम निघाले होते, त्यांनी ते काम मिळवलेही आणि पूर्ण केलेही. परंतु या कामामुळे शेवटच्या वर्षीचे पहिल्या सेमिस्टरचे काही पेपर्ससुद्धा त्यांनी दिले नाही. नंतर त्यांनी अभ्यास करून सर्व विषय परत काढले.[२]
कारकीर्द
वयाच्या १९ व्या वर्षी हणमंत यांनी भारत विकास प्रतिष्ठानची स्थापना केली, या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक स्वरूपाची मदत करायला सुरुवात केली.[२]
१९९४ मध्ये इंजिनियरिंग पूर्ण झाल्यानंतर हणमंत यांना टाटा इंजिनियरिंग एंड लोकोमोटिव कंपनी अर्थात टेल्को (सध्याची टाटा मोटर्स) मध्ये पुणे प्रकल्पासाठी पदवीधर शिकाऊ अभियंता म्हणून नोकरी मिळाली. टेल्कोमध्ये काम करत असताना १९९७ मध्ये त्यांनी भंगारमध्ये टाकून दिलेल्या केबल्सचा सदुपयोग करून कंपनीचा मोठा खर्च वाचवला.[२] त्यावेळेस त्यांनी भारत विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून गाववाल्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.[२]
२२ मे, १९९७ मध्ये, नवीनच सुरू करण्यात आलेल्या इंडिका कारच्या प्लांटसाठीचे कंत्राट भारत विकास प्रतिष्ठानला मिळाले होते. हे भारत विकास प्रतिष्ठानचे पहिले कंत्राट होते आणि त्यांची जबाबदारी हणमंत यांनी त्यांचे जुने मित्र उमेश माने यांच्यावर सोपवली होती. उमेश माने हे त्यांची बँकेतली मॅनेजरची नोकरी सोडून भारत विकास प्रतिष्ठानला पहिले कंत्राट मिळण्याच्या पाच महिने आधीच जानेवारी, १९९७ मध्ये संस्थेत रुजू झाले होते.[२] संस्थेला पहिल्या वर्षी आठ लाख, दुसऱ्या वर्षी ३० लाख, आणि तिसऱ्या वर्षी जवळपास ६० लाखाचे उत्पन्न मिळाले होते.[२]
त्यांनी कंपनीचे ‘भारत विकास सर्विसेस’ असे नामकरण केले. विविध ठिकाणी लोकांना आणि संस्थाना विविध सेवा पुरवण्याचे काम सुरू केले. साफ-सफाई करणारी अद्ययावत यंत्रणा खरेदी केल्या. ऑफिसेस, भवन, इमारती व मंदीरे इत्यादींच्या स्वछतेच्या कामाची कंत्राटे मोठ्या प्रमाणात चालू केली.[२]
२००४ मध्ये भारत विकास सर्विसेसला भारतीय संसद भवनाच्या कामाचे कंत्राट मिळाले. पुढे पंतप्रधानांचे निवासस्थान आणि राष्ट्रपती भवनाचे कामही या संस्थेला मिळाले. सरकारी भवन, रेल्वेगाड्या, रेल्वे स्थानक, विमानतळ, कॉर्पोरेट भवन, मंदिर यासारख्या ठिकाणच्या कामाची जबाबदारी या संस्थेवर सोपवण्यात आली. वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांचे जाळे उभे करण्यात आले आणि त्याला ‘भारत विकास ग्रुप’ असे नाव देण्यात आले. सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी आळंदी, पंढरपूर आणि तुळजापूरची मंदिरे विनामूल्य साफ करायचे काम स्वीकारले.[२][१][३]
भारत विकास ग्रुपने देशाबाहेरही आपल्या सेवा सुरू केल्या. ऑगस्ट २०१६ मध्ये भारत विकास ग्रुपमधील कर्मचाऱ्यांची संख्या ६५०००हून अधिक होती. भारत विकास ग्रुप देशातील २० राज्यांमध्ये ८००हून अधिक ठिकाणी सेवा पुरवत आहे.[३][२]
समूहाचे २०१२ पर्यंतचे मूल्य १,००० कोटी आहे [४]
पुरस्कार
गायकवाड यांना त्यांच्या सामाजिक आणि उद्योजकीय कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.(???) तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये व्याख्याने दिली आहेत.[ संदर्भ हवा ]
वैयक्तिक जीवन
छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद हणमंतराव यांचे आदर्श आहे. १९९९ मध्ये गायकवाड यांचे लग्न झाले. ते पत्नी आणि दोन मुलींसह पुण्यात राहतात.[५]
बाह्य दुवे
https://www.bvgindia.com/chairman.php Archived 2022-05-20 at the Wayback Machine.
हे सुद्धा पहा
संदर्स
- ^ a b टीम, एबीपी माझा वेब (2017-08-04). "70 हजार तरुणांना नोकरी देणारा साताऱ्याचा पठ्ठ्या-हणमंत गायकवाड!". marathi.abplive.com. 2022-04-04 रोजी पाहिले.
- ^ a b c d e f g h i j k l "कोट्यावधी लोकांच्या जीवनावर आपला सकारात्मक आणि क्रांतीकारी प्रभाव टाकू इच्छितात हणमंत गायकवाड". YourStory.com (इंग्रजी भाषेत). 2016-09-01. 2022-04-07 रोजी पाहिले.
- ^ a b "दूरदृष्टीचा नवनिर्माता : हणमंतराव गायकवाड". Maharashtra Times. 2022-04-07 रोजी पाहिले.
- ^ Tare, Kiran. http://indiatoday.intoday.in/story/rural-rockstars-hanmantrao-gaikwad-from-pune/1/216532.html. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ "कोट्यावधी लोकांच्या जीवनावर आपला सकारात्मक आणि क्रांतीकारी प्रभाव टाकू इच्छितात हणमंत गायकवाड". YourStory.com (इंग्रजी भाषेत). 2016-09-01. 2022-04-04 रोजी पाहिले.