स्वरचक्र
प्रारंभिक आवृत्ती | १९ ऑगस्ट, २०१३ |
---|---|
भाषा | हिंदी, मराठी , गुजराती, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी (गुरमुखी लिपी), बंगाली, कोंकणी, तमिळ, आसामी |
सॉफ्टवेअरचा प्रकार | अँड्रॉइड |
सॉफ्टवेअर परवाना | मोफत |
संकेतस्थळ | swarachakra |
स्वरचक्र हा टचस्क्रीन असलेल्या मोबाईल फोन, टॅबलेट व अन्य उपकरणांसाठी मराठी व अन्य भारतीय भाषांमध्ये मजकूर लिहिण्यासाठी उपयुक्त मोफत कीबोर्ड (कळफलक) आहे. स्वरचक्र सध्या अँड्रॉइड फोन साठी उपलब्ध आहे. मराठी व्यतिरिक्त कोंकणी, हिंदी, गुजराती, तेलुगू, कन्नड, तमिळ, मल्याळम, ओडिया, बंगाली, पंजाबी व आसामी या ११ भारतीय भाषांसाठी स्वरचक्र सध्या उपलब्ध आहे.
स्वरचक्रची वैशिष्ट्ये
स्वरचक्रची मांडणी देवनागरीच्या मूलभूत रचनेनुसार संकल्पित केलेली असल्यामुळे मराठीत टाईप करणे सोपे होते. त्यात अक्षरांची मांडणी ही मराठीच्या बाराखडीच्या रचनेवर ( ् ा ि ी ु ू े ै ो ौ ं ः इत्यादी) आधारित आहे. सामान्यतः एखाद्या व्यंजनाला काना, मात्रा अथवा वेलांटी लावायची असेल, तर कीबोर्डवरील दोन तरी स्पर्श करावे लागतात. उदाहरणार्थ जर ‘थो’ लिहायचा असेल तर थ आणि ो अशी वेगवेगळी बटणे दाबावी लागतात. स्वरचक्र मध्ये एखाद्या व्यंजनाच्या (उदा. थ च्या) बटणाला स्पर्श करताच त्या बटणाच्या भोवती सर्व काना, मात्रा, वेलांट्या लावलेल्या व्यंजनांचे पर्याय (था थि थु थू थे थै थो थौ) बोटाभोवती एका चक्रात उमटतात. हवा असलेला पर्याय आपण बोट सरकावून एकाच स्पर्शात निवडू शकतो. नेहेमीच्या वापरातले स्वर (अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ) हे शेवटून दुसऱ्या ओळीत उजव्या बाजूला एका चक्रात आहेत. कमी वापरातले स्वर आणि त्यांची मात्राचिन्हे (ॲ ऑ ऋ ॠ ॅ ॉ ृ ॄ ऽ े ो) ही त्याच्या शेजारच्याच चक्रात आहेत. या मांडणीमुळे अक्षरे चटकन सापडतात.
स्वरचक्रच्या मांडणीमुळे वापरून जोडाक्षरे (स्व, च्या, क्ति) लिहिणेदेखील सोपे आहे. उदाहरणार्थ जर 'त्या' लिहायचा असेल, तर आधी तच्या चक्रात वर बोट नेऊन त् निवडला की सर्व व्यंजनांच्या आधी अर्धात लागेल - म्हणजेच कचा त्क होतो आणि यचा त्य. त्य दाबल्यावर त्यचे एक वेगळे चक्र येते - आणि त्यातून आपण त्या, त्यी, त्यि वगैरे निवडू शकतो. रफार (र्क, र्थ इत्यादि), वाऱ्यातला, ऱ्हासातला अर्धा र (र्), आणि जोडाक्षरातला रकार (ट्र, क्र, प्र, ब्र इत्यादी) ह्यांसाठी स्वरचक्रामध्ये शॉर्टकट बटणे आहेत, त्यामुळे ती लिहिणेही अगदी सोपे आहे. रफाराचे बटण दाबले की सर्व व्यंजनांना रफार लागतो. आकडे, चिन्ह आणि कमी वापरातली अक्षरे ही शिफ्ट दाबून टाईप करता येतात. शिवाय जर मधेच एखादा इंग्रजी शब्द लिहायचा असेल, तर त्याचीदेखील सोय आहे. [१][२][३][४][५][६][७]
स्वरचक्र कुठे मिळेल?
मराठीसाठी स्वरचक्र सध्या अँड्रॉइड फोनवर उपलब्ध आहे. मराठी व्यतिरिक्त कोकणी, हिंदी, गुजराती, तेलुगू, कानडी, तमिळ, मल्याळम, ओडिया, बंगाली, आसामी व पंजाबी या ११ भारतीय भाषांसाठीही स्वरचक्र मिळते. स्वरचक्र कीबोर्ड डाऊनलोड करण्यासाठी अँड्रॉइड फोनवरून गुगल प्ले मधे जा. त्यात इंग्रजीत Swarachakra असे लिहून शोधा. मराठी स्वरचक्र ॲप डाऊनलोड करून इन्स्टॉल करा. त्यानंतर स्वरचक्र चालू कसे करायचे ह्याची माहिती तेथे क्रमवार दिली आहे. फेब्रुवारी २०१५ अखेरी एक लाखापेक्षा अधिक वापरकर्त्यांनी स्वरचक्र डाऊनलोड केले आहे.
संदर्भ
- ^ आता अँड्रॉइड फोनवर मराठी टायपिंग सहज शक्य
- ^ तंत्रज्ञानातील मराठीचा प्रसारक[permanent dead link] महाराष्ट्र टाइम्स
- ^ आशा उद्याच्या ! मराठी टायपिंगचा फंडा[permanent dead link]
- ^ Corpus of Marathi word frequencies from touch-screen devices using Swarachakra Android keyboard मराठीतील स्वरचक्र शब्दसंख्या
- ^ Convenient keyboard
- ^ A day in a lab - Interaction design for Indian needs, IIT Bombay
- ^ मोबाइलवर संदेशवहन करणारी तरुणाई आता जोमाने मराठीत टाइप करू लागली आहे