स्मिता उदय वाघ
कोण आहेत सौ. स्मिता वाघ?
१७ व्या लोकसभा निवडणुकांसाठी जळगाव मतदार संघातून सौ. स्मिता वाघ यांना भाजप कडून उमेदवारी जाहीर झाली आहे. स्मिता वाघ अमळनेरच्या रहिवासी असून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांचे मूळ गांव अंदरसुल (ता. येवला जि. नाशिक) असून हल्ली मुकाम अमळनेरच आहे.
स्मिता वाघ यांचे सासरे २५ वर्ष सरपंच राहिलेले आहेत तर वडीलही पंचायत समितीचे सभापती राहिले आहेत. त्यामुळे बालपणापासून घरात राजकीय वातावरणाचे संस्कार त्यांच्यावर रुजले व वडील आणि सासरे यांच्या प्रेरणेतूनच त्यांच्यात एक कार्यकर्तीचा जन्म झाला असे त्या अभिमानाने सांगतात.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्थापनेसाठी गाजलेल्या तत्कालीन आंदोलनात स्मिता वाघ यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. [- ९०]च्या दरम्यान अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे त्यांनी धडाडीने काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यात 'राष्ट्रवाद' व 'राष्ट्र प्रथम' या विचारांची मुळे रुजली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांची वैचारिक बांधिलकी असून संघ परिवाराच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे.
स्मिता वाघ यांचा राजकीय प्रवास
स्मिता वाघ यांचा भाजपशी सर्वात पहिला संबंध १९९२मध्ये आला. तेव्हापासून भाजपच्या कार्यात त्यांनी सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली. २००३मध्ये भाजपच्या महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आली, तेव्हा सकुशल काम हाताळले व पक्ष बांधणीचे काम करत अनेक महिलांना पक्षाशी जोडले. २००२ ते २०१५ पर्यंत जळगाव जिल्हा परिषदेच्या सलग तीनवेळा सदस्य म्हणून निवडून आल्यामुळे जिल्ह्यातील राजकारण त्यांनी चांगलेच जवळून पाहिले आहे.
२००५ मध्ये उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून सिनेट सदस्या म्हणून निवडून आल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. तेव्हापासून त्यांच्या राजकीय प्रवासाने जो वेग धरला, तो पुढे वाढतच राहिला. त्याचा प्रत्यय म्हणून २००९ला त्या जळगांव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा झाल्या व त्या बरोबरच भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्याही झाल्या.. याचा परिपाक म्हणजे २०१५मध्ये भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आली, ती त्यांनी लीलया पार पाडली.
त्यांच्याकडे २०१७पासून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी आली आहे. २०१७मध्ये त्या विधानपरिषदेच्या आमदार म्हणून निवडून आल्या, तेव्हापासूनच त्यांची पुढची वाटचाल लोकसभेकडे होणार अश्या चर्चा रंगू लागल्या होत्या. १७ व्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपतर्फे त्यांना जळगांव मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. ताज्या बातमीनुसार स्मिता वाघ यांच्याऐवजी उन्मेष पाटील निवडणूक लढवतील. [१]
- ^ तरुण भारत जळगाव. "Tarunbharatjalgaon". www.facebook.com. 2019-04-03 रोजी पाहिले.