Jump to content

स्प्रेडशीट

ओपन ऑफिस.ऑर्ग कॅल्क स्प्रेडशीट सॉफ्टवेराचे दृश्य

स्प्रेडशीट किंवा कोष्टकप्रणाली (इंग्लिश: Spreadsheet) हा उपयोजन सॉफ्टवेरांचा एक प्रकार आहे. यात हिशेब करणाऱ्या कागदी कोष्टकाप्रमाणे अनेक रकाने असतात. हे रकाने अनेक ओळी व स्तंभांच्या परस्परछेदी रचनेत मांडलेले असतात.

स्प्रेडशिटातील प्रत्येक रकान्यात अल्फान्यूमरिक, अक्षरी, संख्यात्मक मूल्ये, अथवा सूत्रे भरता येतात. एखाद्या रकान्यातील माहिती किंवा मूल्य ही अन्य एका किंवा अनेक रकान्यांतील माहिती किंवा मूल्य बदलल्यास कशाप्रकारे बदलेल अथवा सोडवली जाईल, हा संबंध म्हणजे स्प्रेडशीट सॉफ्टवेरातील सूत्र होय. स्प्रेडशिटाचा वापर वित्तीय/ आर्थिक, शास्त्रीय, तसेच गणिती आकडेमोडींसाठी केला जातो. एक रकाना बदलला, तरीही संपूर्ण कोष्टक स्वतःहून पुनर्गणना होऊन बदलू शकण्याची सुविधा, हे याचे मुख्य बलस्थान होय. त्याचप्रमाणे यांत कोष्टकातील माहितीवर आधारित, विविध प्रकारचे आलेखही रेखता येतात.

व्हिजीकॅल्क[] हे पहिले इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट मानले जाते. अ‍ॅपल-२ संगणकाच्या यशात व स्प्रेडशीट सॉफ्टवेर प्रकाराच्या प्रसारात त्याचा मोठा वाटा होता. डॉस संगणक कार्यप्रणाली प्रचलित असताना लोटस १-२-३ हे स्प्रेडशीट सॉफ्टवेर लोकप्रिय होते. विंडोज व मॅकिंटॉश या प्लॅटफॉर्मांवर मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे स्प्रेडशीट सॉफ्टवेर सर्वाधिक लोकप्रिय आहे.

मुक्त सॉफ्टवेरांमध्ये ओपन ऑफिस कॅल्क हे बरेच लोकप्रिय आहे. आंतरजालावरही गूगल स्प्रेडशीट ही ऑनलाइन स्प्रेडशीट सेवा उपलब्ध आहे.

संदर्भ

  1. ^ व्हिजिकॅल्क (इंग्लिश: Visicalc)