Jump to content

स्टेथोस्कोप

हे एक वैद्यकीय हत्यार आहे की ज्याच्या साहाय्याने छातीतील फुप्फुस व ऱ्हदय यांचे परीक्षण करता येते.याच्या मध्ये

  1. कानात घालायचा भाग
  2. रबरी नळी
  3. डबी हे भाग असतात.

स्टेथोस्कोपचा शोध लागण्यापूर्वी छातीला कान लावून आवाज ऐकला जाई. याचा शोध डॉ.रेने लिनेक यांनी १८१६ साली पॅरिस मध्ये लावला.त्यांनी कागदाची पुंगळी तयार करून ती रुग्णाच्या छातीला कान लावून आवाज ऐकला.डॉक्टर म्हणले की डोळ्यासमोर येते ती पांढऱ्या एप्रनमधील गळ्यात स्टेथोस्कोप अडकवून फिरणारी व्यक्ती. स्टेथोस्कोप हा डॉक्टरचा एक अवयवच असतो जणू. या स्टेथोस्कोपचा जन्म मोठय़ा मजेशीर प्रसंगी झाला. पूर्वी डॉक्टरमंडळी रुग्णाच्या छातीवर कान टेकवून आतील धडधड आणि घडामोडी समजावून घेत. त्या काळात रुग्ण खंगलेले शरीर घेऊन येत असे. यात बदल घडत गेले तसे डॉक्टरांचे काम कठीण होत गेले. त्यात पृथूला ते स्थूला अशा स्त्रिया रुग्ण म्हणून समोर आल्या की डॉक्टर आणि रुग्ण दोघांनाही अवघडल्यासारखं होई. १८१६ साली फ्रान्समध्ये रेने लेन्नाक (हा उच्चार वेगळाही असू शकतो, कारण फ्रेंच शब्द इंग्रजीत वाचून त्याचा मराठीत उच्चार केला आहे.) कडे एक अतिविशाल महिला आली. नेहमीच्या पद्धतीने कान टेकवून हृदयाची धडधड ऐकू येईना. रेनेचे प्रयत्न चालू आणि बाई अस्वस्थ होऊ लागल्या. शेवटी रेनेने आपल्याजवळील एका जाडसर कागदाची नळकांडी केली आणि एक टोक छातीवर टेकवून नळकांडीच्या दुसऱ्या टोकाशी कान लावला. अहो आश्चर्यम्! त्याला छातीतील आवाज स्पष्ट ऐकू आले. नंतर त्याच्या लक्षात आले की, छातीला कान लावण्यापेक्षा नळकांडीतून जास्त छान ऐकू येते. तर हा पहिला स्टेथोस्कोप. स्टेथो म्हणजे छाती आणि स्कोप म्हणजे चिकित्सा. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन त्याला नुसतेच स्टेथो म्हणायला सुरुवात झाली. पुढे त्याच्या रूपात बदल होत जाऊन डॉ. लिटमन यांनी बनवलेला स्टेथो आजकाल वापरला जातो. साधारणपणे छाती आणि पोटातील आवाज ऐकण्यासाठी याचा उपयोग होतो. पुढे एक्स-रे, सोनोग्राफी, इको, सीटी आणि एम.आर.आय. इ. तपासण्या उपलब्ध होऊ लागल्या तसे स्टेथोचे महत्त्व कमी होत गेले. आता तर बऱ्याच वेळा स्टेथो हा डॉक्टरांचे व्हिझिटिंग कार्ड बनला आहे. कुठच्याही हॉस्पिटलमध्ये जाताना हातात स्टेथो असेल तर सरळ प्रवेश मिळतो, सिक्युरिटी गार्ड थांबवीत नाहीत. आय.सी.यू. किंवा ऑपरेशन थेटरमध्ये मात्र अजूनही स्टेथो खरोखर वापरला जातो. या स्टेथोच्या अनेक गमतीशीर गोष्टी बघण्यात येतात. खरेतर आजकाल पेशंटला विचारलेले प्रश्न आणि तपासण्या यावरून रोगनिदान होते. पण पेशंटचा स्टेथोवर इतका विश्वास असतो की, तो लावल्याशिवाय आपल्याला नीट तपासले आहे असे पेशंटला वाटतच नाही. अगदी औषध लिहून दिले आणि निघायची वेळ आली तरी कोणी सांगतोच ‘पण डॉक्टर ते तपासायचं राहिलंच की’.स्टेथोस्कोप कानात अडकवून दुसरे टोक पेशंटच्या छातीवर टेकवले की, आतील आवाज ऐकण्यासाठी डॉक्टर आणि पेशंट दोघांनीही गप्प राहण्याची गरज असते. बरे ह्या आवाजाची पत आणि प्रत समजण्यासाठी काही वेळ द्यावा लागतो. हिंदी सिनेमात तिजोरी फोडताना हिरो जसा कान देऊन ऐकतो तसे ऐकावे लागते. प्रत्यक्षात मात्र डॉक्टर इतक्या वेगात स्टेथोची जागा बदलतात की, त्यातून काही ऐकणे शक्यच होऊ नये. बरेचदा कानात स्टेथो, दुसरे टोक जलद गतीने पेशंटच्या छाती-पाठीवरून फिरते आहे, आणि त्याच सोबतीने डॉक्टर प्रश्न विचारताहेत आणि पेशंट उत्तरे पण देतो आहे. मल्टिटास्किंगचे इतके उत्तम उदाहरण दुसरे नसेल. बरे कानात स्टेथो असताना डॉक्टर उत्तरे ऐकतो कशी, हे पण मोठ्ठे कोडेच आहे. याहीपेक्षा मजेशीर गोष्ट. एका भोंदू डॉक्टरने आपल्या दुकानात विविध प्रकारचे स्टेथो लटकवून ठेवले होते. आमच्या कामवाल्या मावशी एक दिवस मला सांगू लागल्या की, मुलाला खोकला झाला होता तेंव्हा पहिले दोन दिवस दहा रुपयाच्या नळीने तपासून घेतले. मग शेवटी पंचवीसवाल्या नळीने पण तपासून घेतले तरी आराम पडेना. मग सरळ सरकारी दवाखाना गाठला. पण तिकडे एकदम मोठे डॉक्टर पण दहा रुपयाच्या नळीनेच तपासतात. मला ही दहावाली नळी आणि पंचवीसवाली नळी हा प्रकार कळेना. मग मी त्या दवाखान्यात गेलो तेंव्हा हा सगळा प्रकार मला कळला. आजकाल ही परिस्थिती बघितली तरी मला स्टेथो वापरून उत्तम रोगनिदान करणारे अनेक डॉक्टर्स माहीत आहेत. त्यांचे रोगनिदान आधी होते आणि त्याची खात्री करून घेण्यासाठी पुढल्या तपासण्या असतात. कॉलेजमध्ये शिकत असताना डॉ. व्ही. आर. जोशी, डॉ. व्ही. व्ही. शानभाग, डॉ. राममूर्ती असे अनेक निष्णात डॉक्टर्स मी बघितले आहेत की, त्यांच्या हातातील स्टेथो रुग्णाच्या आतील बारीकसारीक घडामोडी त्यांच्या कानात मनमोकळेपणे बोलत असे. डॉक्टर शानभाग म्हणायचे की, The most important component in the stethoscope is what lies between two ear pieces. म्हणजे ऐकणाऱ्याचे कान आणि ते समजावून घेणारा मेंदू. शाळेत असताना एक निबंध हमखास लिहायला असायचा- ‘आग- शाप की वरदान?’. खरेतर कुठच्याही यंत्राच्या बाबतीत किंवा माणसाच्या बाबतीत हेच म्हणता येईल. आपल्यातील अज्ञान समोरच्या माणसातील अपप्रवृत्तींना जागवते. सगळ्याच विषयातील ज्ञान मिळवणे अशक्य असले तरी शिक्षणामुळे अपप्रवृत्ती लवकर ओळखता येण्याची शक्यता वाढते आणि असे दहावाली नळी आणि पंचवीसवाली नळी करणाऱ्या लोकांना भीती वाटू शकते. वैद्याला यमाचा मोठा भाऊ म्हणलेले बऱ्याच जणांना ठाऊक असते. ‘वैद्यो नारायणो हरी’ असेपण म्हणतात, हे मात्र बरेच जण विसरलेले असतात. डॉक्टरला यमजेष्ठसहोदर बनविण्यात किंवा नारायण बनविण्यात त्याच्या पेशंटचा थोडासा सहभाग असतोच.