Jump to content

सौंदर्यस्पर्धा

सौंदर्यस्पर्धाला इंग्रजी मध्ये ब्यूटी कॉन्टेस्ट/पॅजन्ट असे म्हणतात. स्त्री किंवा पुरुष यांच्या शरीरसौष्ठवाची सौंदर्याच्या दृष्टिकोनातून परीक्षा घेण्यासाठी आयोजित केलेली  स्पर्धा. व्यक्तीचे सौंदर्य, शरीरयष्टी, बुद्धिमत्ता, जीवनाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन इत्यादींना या स्पर्धेत महत्त्व असते.

प्राचीन काळी अनेक राजांच्या राण्यांमध्येदेखील अशा सौंदर्यस्पर्धा होत असत. मुस्लिम राजांच्या ऐरेममध्ये आवडती राणी शोधण्यासाठी राण्यांची सौंदर्यस्पर्धा आयोजित केली जात असे. प्राचीन चिनी ग्रंथांमध्ये सौंदर्यस्पर्धांविषयी व तत्संबंधीच्या नियमांविषयीची माहिती आढळते. ऑटोमन साम्राज्यामध्ये इस्लामिक नियम कितीही कडक असले, तरी त्याहीवेळेला सरदार व राज्यांमधील प्रतिष्ठित लोकांच्या घरी अशा सौंदर्यस्पर्धा घेतल्या जात. यूरोपमध्ये अतिप्राचीन काळी ट्रॉय या शहरामध्ये सौंदर्यस्पर्धा ह्या मनोरंजना-साठी होत होत्या. या स्पर्धांचे परीक्षक हे शिल्पकार, कवी, बुद्धिवंत, नेते आणि सेनापती असत. सध्याच्या गिनी बिसाऊ या देशातील व्हीझगॉश बेटावर सौंदर्यस्पर्धा फार मोठ्या प्रमाणात आयोजित होत असत.

यूरोपमध्ये पहिली मोठी सौंदर्यस्पर्धा सप्टेंबर १८८८ मध्ये झाली. बेल्जियम रिसॉर्ट स्पामध्ये ती आयोजित केली होती. त्यामध्ये एकवीस स्पर्धकांना बंद घोड्याच्या गाडीतून ( बग्गीतून ) आणले गेले. बाहेरच्या कोणत्याही लोकांना आत येण्यास परवानगी नव्हती. स्पर्धकांचे फोटो निर्णायकांना पाठवले गेले. ह्यांमध्ये ग्वादलूप शहरातील अठरा वर्षांची स्पर्धक मार्थे सॉकरेत हिला पाच हजार फ्रँकचे बक्षीस दिले गेले. जर्मनीमधील पहिली सौंदर्यस्पर्धा १९०९ मध्ये झाली. या स्पर्धेची विजेती एकोणीस वर्षांची गर्ट्रड दॉपिएरलस्की ही पूर्व प्रशियामधील होती.

पहिली सौंदयस्पर्धा

अमेरिकेत सर्वांत पहिली सौंदयस्पर्धा १८५४ मध्ये पी. टी. बारूम यांनी घेण्याचे ठरवले पण लोकांनी विरोध करून ती बंद पाडली. त्यानंतर १८८० मध्ये पोहण्याच्या वेषातील स्पर्धा प्रथमच आयोजित करण्यात आली. त्यावेळेस या स्पर्धेच्या विरोधी बाजूने फार मोठे वादळ उठले होते.

दुसरी सौंदयस्पर्धा

८ सप्टेंबर १९२०ला न्यू जर्सी येथे सौंदर्यस्पर्धा झाली. तीत वॉशिंग्टन येथील सोळा वर्षीय मार्गारेट गॉरमन ह्या मुलीने मुकुट पटकावला पण ही स्पर्धा अटलांटिक शहराची प्रसिद्धी करण्यासाठी होती असे समजले गेले.

दूरचित्र-वाणीवर प्रसार

दूरचित्रवाणीच्या ( टीव्ही ) शोधानंतर दृक्-श्राव्य प्रक्षेपणामुळे १९६०—७० च्या दशकांत सौंदर्यस्पर्धांना एक वेगळे स्वरूप प्राप्त झाले.  कुठल्याही स्पर्धा जगभर दिसू लागल्या. स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्यांचे प्रमाणही वाढले. १९५४ मध्ये ‘ मिस् अमेरिका ’ ही सौंदर्यस्पर्धा दूरचित्र-वाणीवर प्रसारित झाली. तत्पूर्वी १९५१ मध्ये लंडनमधील ‘ ग्लोबल ब्यूटी कॉन्टेस्ट’ मध्ये इंग्लिश स्पर्धक पोहण्याच्या वेषात दाखल झाल्या आणि इंग्लंडमध्ये त्याबद्दल निषेधाचे वादळ उठले.  

रशियातील पहिली स्पर्धा रशियात बाहेरून आलेल्या रहिवाशांचीच झाली. १९३१चा ‘ मिस् रशिया ’चा मान मार्यीना चेलिअपिनाने पट-कावला. सोव्हिएट रशियाच्या निर्मितीनंतरची पहिली स्पर्धा १९८८ मध्ये झाली. सौंदर्यस्पर्धा पाश्चिमात्य देशांत जोर धरू लागल्या असल्या, तरी १९७०—८० पर्यंत अनेक स्त्रीवादी संस्था ह्याविरुद्ध लढा देत होत्या. त्यांच्या मते स्त्रियांचे अशाप्रकारे प्रदर्शन हा स्त्रीशोषणाचाच एक भाग आहे.

भारतातील सौंदयस्पर्धा

भारतामध्ये सौंदर्यस्पर्धा विसाव्या शतकाच्या अखेरच्या चतुर्थकात सुरू झाल्या कारण मध्ययुगीन भारतात व नंतर येथील समाज सनातनी संस्कृतीला चिकटून बसलेला होता. त्यामुळे स्त्रियांचे प्रदर्शन ही कल्पनाही समाजाला मान्य नव्हती. स्त्रियांच्या सौंदर्यस्पर्धा ह्या फक्त मुलींच्या शाळांमध्ये, महाविद्यालयांत किंवा क्लबपर्यंत मर्यादित होत्या. काही काळानंतर शहरांमध्ये सौंदर्यप्रसाधने निर्माण करणाऱ्या किंवा पोषाखांच्या कंपन्यांतर्फे तसेच फेमिनासारख्या नियतकालिकांद्वारे सौंदर्यस्पर्धा आयोजित होऊ लागल्या. त्यानंतर प्रत्येक शहर व प्रत्येक राज्ये यांच्या तर्फे सौंदर्यस्पर्धा आयोजित करण्यात येऊ लागल्या. त्यांपैकी मिस् फेमिना लुक ऑफ द इयर, फेमिना मिस् इंडिया, ग्लॅडरॅग्लस मॅनहंट कॉन्टेस्ट, आय ॲम शी – मिस् युनिव्हर्स् इंडिया, मिस् चेन्नई, मिस् हिमालय पॅजन्ट, मिस् इंडिया साउथ, मिस् केरळा, मिस् तमिळनाडू , मिस् तिबेट इ. स्पर्धा उल्लेखनीय असून त्या भारतात आयोजित केल्या जातात.

  • मिस् फेमिना लुक ऑफ द इयर : १९९४ पासून फेमिना नियतकालिकाद्वारे ही स्पर्धा सुरू झाली. संपूर्ण भारतभर चालणारी ही स्पर्धा आहे. १९९४ — शीतल मल्हार, १९९५— कारमीन शॅक्लरान, १९९६—उज्ज्वला राऊत, १९९७—नेत्रा रघुरामन् , १९९८—कॅरॉल ग्रासीयस, १९९९—करिश्मा मोदी ह्यांनी ही स्पर्धा जिंकली. ईव्ह्ज विकली हे साप्ताहिक चालविणारी संस्थाही अशा सौंदर्यस्पर्धा आयोजित करते. फेमिना मिस इंडिया : ही भारतात सर्वत्र घेतली जाणारी स्पर्धा आहे.
  • आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धा : (१) जगत्सुंदरी ( मिस् वर्ल्ड — १९५१), (२) विश्वसुंदरी ( मिस् युनिव्हर्स — १९५२), (३) आंतरराष्ट्रीय सुंदरी ( मिस् इंटरनॅशनल — १९६०) व (४) वसुधा सुंदरी ( मिस् अर्थ — २००१) ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवर भरविल्या जाणाऱ्या मोठ्या स्पर्धा होत.
  • मिस् वर्ल्ड स्पर्धेमध्ये भारताच्या रिता फरीया (पहिली -१९६६), ऐश्वर्या रॉय (१९९४), डायना हेडन (१९९७), युक्ता मुखी (१९९९), प्रियांका चोप्रा (२०००), मानुषी छिल्लर (२०१७) यांनी मान मिळविला. २०१२ मध्ये चीनची वेनझिया यू आणि २०१३ मध्ये फिलिपीन्सची मेगन यंग या मिस् वर्ल्डच्या मानकरी ठरल्या.[]
  • १९९४ च्या मिस् युनिव्हर्स स्पर्धेमध्ये भारताची सुष्मिता सेन हिने मिस् युनिव्हर्सचा मान मिळविला. तसेच वसुधा सुंदरीचा मान भारताच्या नीकोल फरीया हिने प्राप्त केला (२००९). मिस् युनिव्हर्सचा किताब अमेरिकेच्या ओलिवा कुल्पो (२०१२) आणि व्हेनेझुएलाच्या गॅब्रिएला इस्लेर (२०१३) यांनी पटकावला.  मिस् आशिया पॅसिफिक या स्पर्धेच्या भारतीय विजेत्या : १९७० — झीनत अमान १९७३ — तारा ॲन फोनसेका २००० — दिया मिर्झा २०१२ — हेमांगिनी सिंग यादु.


सर्व जागतिक सौंदर्यस्पर्धांचे स्वरूप केवळ शारीरिक सौंदर्य एवढ्या-पुरतेच मर्यादित न राहता सौंदर्यवतींचे व्यक्तिमत्त्व, बुद्धिमत्ता, कार्यक्षमता यांच्या मूल्यमापनावर आधारित असते.

भारत हा व्हेनेझुएलानंतरचा दुसरा असा देश आहे, की ज्याने जास्तीत जास्त वेळा मिस् वर्ल्ड हा किताब जिंकला आहे.

अलीकडे सौंदर्यस्पर्धा ह्या फक्त स्त्रीवर्गाशी निगडित न राहता लहान मुले, पुरुष यांमध्येही होतात.

  1. ^ DelhiDecember 14, India Today Web Desk New; December 14, 2019UPDATED:; Ist, 2019 17:09. "Who are the past Miss World winners from India?". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-03-07 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)