Jump to content

सोलापूर जिल्ह्यातील दगडी रांजणे

प्रस्तावना

सोलापूर जिल्हा हा भीमा, सीना, माण, या नद्यांच्या खोऱ्यामध्ये वसलेला आहे. सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर सांगली, सातारा, पुणे, उस्मानाबाद आणि बीड हे जिल्हे असून दक्षिण सीमेवर|कर्नाटकातील विजापूर जिल्ह्याची सीमा आहे.[]सोलापूर जिल्ह्यात प्राचीन काळापासून अनेक राजघराण्यांची सत्ता होती. त्यापैकी सातवाहन घराण्याची सत्ता इ.स.पूर्व २३० ते इ.स.२३० या काळातील होती. सातवाहन घराण्याचा उल्लेख पुराण ग्रंथांत तसेच ऐतरेय ब्राह्मण ग्रंथात मिळतो. राजा सिमुक हा सातवाहन घराण्याचा संस्थापक मानला जातो. सातवाहनांना आंध्रभृत्य किंवा शालिवाहन असेही म्हणले जाते. सातवाहनांचे साम्राज्य कृष्णा नदीच्या उगमापासून ते दख्खनच्या पठारापर्यंत पसरलेले होते. प्रतिष्ठान (पैठण) हे नगर त्यांच्या राजधानीचे शहर होते.

सातवाहन रोमन व्यापार

सातवाहन काळात रोमन व्यापारी इटलीहून भारतात व्यापार करण्यासाठी येत असत. एका अज्ञात ग्रीक खलाशाने ‘द पेरीप्लस ऑफ एरिथ्रिअन सी’ या ग्रंथात प्राचीन भारतातील व्यापारी केंद्राचे वर्णन केले आहे. भारतच रोमन साम्राज्याशी होणाऱ्या व्यापाराचे उल्लेख इ. स.तिसऱ्या शतकापर्यंत मिळतात.विदेशातून समुद्रमार्गे भारतात आलेला माल, विशेषतः रोमन साम्राज्यातून आलेला माल पश्चिम घाटावर उतरवून तो व्यापारी व व्यावसायिक बोटीतून किंवा बैलगाड्यातून नद्या, ओढे, रस्ते मार्गाने भारतातील विविध व्यापारी केंद्रावर पोहचवीत असत. त्याकाळात भरुकच्छ किंवा भृगुकच्छ (भडोच,गुजरात), शूर्पारक (सोपारा)मधून व कल्याणमधून नाणेघाटमार्गे नाशिककडे जाता येत होते. या मार्गावर रांजणगाव, पुणे, भाजे, कार्ले, प्रतिष्ठान, तगर (तेर- जिल्हा उस्मानाबाद) ही नगरे होती.[]

पुरातत्त्वीय उत्खनन

सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत मूढवी आणि सिद्धापूर (ता. मंगळवेढा), वाकाव (ता. माढा), कार्कळ (दक्षिण सोलापूर ) येथे पुरात्त्वीय उत्खनने डेक्कन कॉलेज (पुणे), सोलापूर विद्यापीठ आणि कोल्हापूर विद्यापीठ येथील पुरातत्त्व विभागाने केली आहेत. या उत्खननात रोमन खापरे, शंखांच्या बांगड्या, मातीचे मणी इ. अवशेष नेवासा (अहमदनगर ) आणि नाशिक,पैठण(औरंगाबाद),जुन्नर (पुणे),तेर (उस्मानाबाद) येथील सात वाहनकालीन अवशेषांशी साम्य दर्शविणारे आहेत. प्रा.डॉ.वसंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही दोन्ही उत्खनने करण्यात आली.

दगडी रांजण ,हत्तरसंग कुडल

=====दगडी रांजणाचा शोध =====

दगडी रांजण,पखालपूर,ता.पंढरपूर
धामणगाव,ता.बार्शी

सन २००४ नंतर सोलापूर जिल्ह्यात संशोधक प्रा.डॉ. रविकिरण जाधव यांनी पुराततत्त्वीय सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी बार्शी तालुक्यातील धामणगाव-काटीमार्गावर मोठ्या दगडी रांजण रस्त्याच्या कडेला आढळले. हे रांजण सातवाहन कालीन नाणेघाट(जुन्नर) येथील दगडी रांणणांसारखे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हत्तरसंग कुडल (तालुका दक्षिण सोलापूर) येथे दोन दगडी रांजण आढळले. तसेच पखालपूर (ता.पंढरपूर), सौंदाणे, वडवळ (ता.मोहोळ), वाकाव (ता.माढा), अकलूज (ता.माळशिरस), पान मंगरूळ (ता.अक्कलकोट) याठिकाणी दगडी रांजण आढळले.अशा प्रकारच्या दगडी रांजणांचा उपयोग व्यापाऱ्यांकडून जकात वसुलीसाठी केला जात असावा असे तज्ज्ञांचे मत आहे.   

              

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ सोलापूर जिल्हा गॅझेटियर
  2. ^ रा.श्री.मोरवंचीकर,सातवाहन कालीन महाराष्ट्र