सोलापुरातील पहिला दूध बाजार
सोलापुरातला पहिला दूध बाजार
शहराचा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुक्रवार पेठेत शंभर-सव्वाशे वर्षांपासून चालणारा दुधाचा व्यापार हेही एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. अलीकडे शहरभर दूध डेअऱ्या वाढल्या तरी त्याचे मूळ उगम स्थान हीच पेठ आहे.येथील बाजाराची सुरुवात नेमकी केव्हा झाली याबद्दल निश्चित अशी कोणाला कल्पना नाही, मात्र तिसऱ्या पिढी पासून या व्यवसायात असलेली मंडळी ही परंपरा शंभर वर्षांपूर्वी सुरू झाल्याचे सांगतात. पूर्वी ग्रामीण भागात घरोघरी गाई म्हशी असायच्या. मुबलक दूध असल्यामुळे ते विकुन अर्थार्जन चालवायचे. शहराच्या चारही बाजूंनी सायकलवरून दुधाची वाहतूक केली जायची. त्याकाळी एक-दोन रुपये शेर विकले जायचे. 72 वर्षाचे हरिभाऊ अंजीखाने यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. बाजार बहरत गेला तसा या व्यवसायातले इंगित लक्षात घेऊन दत्तात्रेय नारायणराव पुकाळे यांनी दूध डेअरी सुरू केली. दूध, दही, लोणी, तूप नेण्यासाठी शहरातील गिराईक हमखास या डेअरीकडे यायचे, या परिसरातील केरबा भास्कर यांचीही दूध गिरणी सुरू झाली. इथे दूध गाळले जायचे, त्यातून लोणी काढून उरलेल्या दुधाचे दही, ताक करून विकले जात असे.
सकाळच्या आठ वाजल्यापासून मानिक चौकातून पुकाळे बोळाकडे दूधाचे कन घेऊन जाणाऱ्या मोटरसायकली आजही दिसतात. आठवडा आठवडा बाजारप्रमाणे बाजार भरतो. व्यवसायामुळे हजारो कुटुंबाचीही गुजराण होते. दूध उत्पादकांचे हे अर्थार्जनाचे साधन बनले आहे. दूध उत्पादकाच्या सोयीसाठी रस्त्यावर फ्याट मोजण्याचे मशीन मांडून शिवानंद सोनटक्के बसलेली दिसतात.या पेठेतील मुरब्बी समजली जाणारे विश्वनाथप्पा बनशेट्टी, स्वा. सै. सिद्धामप्पा फुलारी अशा अनेक मंडळींनी नेहमीच या दूध बाजाराला प्रोत्साहन देत बळ दिल्याने शंभर वर्षे लोटली तरी दिमाखात हा बाजार सुरू आहे. वर्षानुवर्षे चालत आलेला हा बाजार अन्यत्र तसा विरळाच म्हणावा लागेल.