Jump to content

सोमदेव सुरि

सोमदेव सुरि (जन्म : इ.स. शतक १० वे, पूर्वार्ध) हा एक दिगंबर पंथीय जैन कवी असून हा जैन साधू आणि तर्कपंडित नेमिदेव याचा शिष्य होता. आचार्य नेमिदेवाप्रमाणे सोमदेव सुरि हाही मोठा तर्कशास्त्री होता. [] जैन धर्मातील देवसंघ या नावाने परिचित असणाऱ्या एका पंथाचा तो आचार्य होता. History of Sanskrit Literature या ग्रंथात संपादक एम. कृष्णमाचारियार यांनी एकूण सहा सोमदेवांचा संदर्भ दिला आहे. "यशस्तिलकचंपू"चा लेखक सोमदेवसूरि हा त्यापैकी एक असून "कथासरित्सागर"चा लेखक अन्य दुसरा सोमदेव आहे.[] =

मराठीतील नोंद

सोमदेव सुरिची मराठीतील नोंद भारतीय संस्कृतिकोशात[] आढळते. कोश संपादक पंडित महादेवशास्त्री जोशी यांनी या नोंदीसाठी पुढील ग्रंथाचा आधार घेतला आहे: जैन साहित्य और इतिहास, नाथूराम प्रेमी, १९५६; जैन सिद्धान्त भास्कर, त्रैमासिक पत्र, आरा जानेवारी१९४९; भारतीय राज्यशास्त्र प्रणेता, रामलाल पांडेय, १९६४.

भारतीय संस्कृतिकोशातील माहितीनुसार सोमदेव सुरीच्या धाकट्या भावाचे नाव महेंद्रदेव असे होते.

यशस्तिलकचंपू

सोमदेव सुरिचा प्रसिद्ध ग्रंथ म्हणजे यशस्तिलकचंपू. हा संस्कृतात आहे. यशस्तिलकचंपूचे एकूण आठ भाग आहेत. प्रत्येक भागास 'उच्छ्वास' असे म्हणतात. पहिल्या पाच उच्छ्वासात अवंतीचा राजा यशोधर याचे चरित्र वर्णिले आहे. शेवटच्या तीन 'उच्छ्वासात' जैनांच्या धर्मसिद्धान्तांचे विस्तृत विवेचन आहे. सोमदेव सुरीने जैन आचार्य गुणभद्राच्या उत्तरपुराणातील एका कथानकावरून राजा यशोधरचे हे चरित्र लिहिले. [] सोमदेव सुरीने यशस्तिलकचंपूचे लेखन शके ८८१ म्हणजे अंदाजे ९५१ साली केले असावे. यशोधराचा राज्यकारभार, त्याची जैनधर्मविषयक श्रद्धा, त्याच्या बायकोने केलेली कटकारस्थाने, त्याचा खून आणि त्याचा पुनर्जन्म यांचे यात वर्णन आहे. []

इतर ग्रंथ

जैन साहित्याप्रमाणे सोमदेव सुरिचा जैनेतर साहित्यातही अधिकार होता.

  • नीतिवाक्यामृत
  • युक्तिचिंतामणी
  • त्रिवर्गमहेंद्रमातलिसंज्ल्प
  • षण्णवतिप्रकरण
  • अध्यात्मतरंगिणी

नीतिवाक्यामृत हा ग्रंथ म्हणजे सोमदेव सुरिच्या प्राचीन भारतीय धर्मशास्त्र, अर्थशास्त्र व नीतिशास्त्र यांच्या सखोल अध्ययनाचे फळ आहे.

अरिकेसरी नामक चालुक्य राजा कृष्णराजदेव या राष्ट्रकुट राजाचा मांडलिक होता. सोमदेव सुरिला अरिकेसरिचा मुलगा बद्दिगने एक गाव इनाम दिल्याचा उल्लेख एका ताम्रपटावर आहे. एम. कृष्णमाचारियार यांच्या नोंदीनुसार [] आचार्य नेमिदेव आणि आचार्य यशदेव हे दोघेही सोमदेव सुरिचे गुरू होते.

संदर्भ


  1. ^ a b c भारतीय संस्कृतिकोश, खंड १०, पान १४६, कला, संपादक : पंडित महादेवशास्त्री जोशी, सहसंपादक : तर्कतीर्थ सौ. पद्मजा होडारकर, श्री. व. ग. सहस्त्रबुद्धे, भारतीय संस्कृतिकोश मंडळ, ४१०, शनिवार पेठ, पुणे ३०, मूल्य रु. ६००/- आवृत्ती २००९, मुद्रक : ॲलर्ट डी. टी. प्रिंटर्स, ओमकार १०/३, वडगाव (खुर्द), सिंहगड रोड, पुणे ३०, प्रत : संगमनेर महाविद्यालय संगमनेर, ग्रंथालय क्र. 21251551,k/जोशी/51551.
  2. ^ History of Sanskrit Literature, M. Krishnamachariar, Assisted by M. Srinivasachariar, page 1108,Motilal Banarsidass Publishers, Delhi; ISBN: 81-208-0284-5, Price: Rs. 695/- प्रत : संगमनेर महाविद्यालय संगमनेर, ग्रंथालय क्र. 21254365, 015v/Krishnam/54365
  3. ^ a b History of Sanskrit Literature, M. Krishnamachariar, Assisted by M. Srinivasachariar, page 499,Motilal Banarasidass Publishers, Delhi; ISBN: 81-208-0284-5, Price: Rs. 695/- प्रत : संगमनेर महाविद्यालय संगमनेर, ग्रंथालय क्र. 21254365, 015v/Krishnam/54365