सोनाली विष्णु शिंगटे
वैयक्तिक माहिती | |
---|---|
Full name | सोनाली विष्णू शिंगटे |
Citizenship | भारतीय |
जन्म | २७ मे १९९५ मुंबई, महाराष्ट्र |
Education | पदवीधर |
Sport | |
खेळ | कबड्डी |
Position | रेडर |
सोनाली विष्णू शिंगटे (२७ मे १९९५:मुंबई, महाराष्ट्र - ) ही महाराष्ट्रातील एक व्यावसायिक महिला कबड्डीपटू आहे. जकार्ता येथील २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये रौप्य पदक आणि काठमांडू येथे २०१९ आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघांचा ती भाग होती.[१][२]
शिंगटे ही भारतीय रेल्वेमध्ये काम करीत असून, तिने राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत रेल्वे संघाकडून सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली आहेत. महाराष्ट्र सरकारने तिला शिव छत्रपती या राज्यातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार दिला आहे.[३]
वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी
सोनालीचा जन्म मुंबईतील लोअर परळमध्ये झाला. तिचे वडील सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते आणि आई भोजनालय चालवत असे. महर्षी दयानंद महाविद्यालयात शिकत असताना तिने कबड्डी खेळायला सुरुवात केली. सोनालीने प्रशिक्षक राजेश पाडवे यांच्याकडून शिव शक्ति महिला संघ क्लब येथे कबड्डीच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली. त्या काळात आर्थिक परिस्थिती अगदीच हलाखीची असल्याने तिला शूज आणि कबड्डी किट खरेदी करणे देखील शक्य नव्हते. तिचे प्रशिक्षक पाडवे यांनी तिला शूज आणि किटसाठी मदत केली. तिचे कुटुंब तिला खेळासाठी पाठिंबा देत असताना त्यांची इच्छा होती की तिने अभ्यासाकडे लक्ष द्यावे. बऱ्याच वेळा ती संध्याकाळी सराव करून किंवा खेळून, नंतर मध्यरात्री उठून सकाळच्या परीक्षेसाठी अभ्यास करायची.
सुरुवातीला सोनालीला तिची ताकद वाढवण्यासाठी जास्तीचे प्रयत्न करावे लागले. तिला धावताना त्रास होत असे. म्हणूनच ती पाय व पोट बळकट करण्यासाठी धावणे तसेच पायाला वजन बांधून विविध व्यायाम करणे, असा सराव करू लागली.
सोनालीला भारताकडून सतत खेळायची इच्छा आहे, मात्र पुरुष प्रो-कबड्डी लीगच्या धरतीवर महिलांसाठीसुद्धा देशांतर्गत कबड्डी लीगची बाब अधोरेखित करते. [४]
व्यावसायिक कारकीर्द
सोनालीने आपल्या कारकिर्दीची सुरुवात २०१४ मध्ये कनिष्ठ स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना केली. कनिष्ठ राष्ट्रीय कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा २०१४-१५ मध्ये तिने या संघाचे नेतृत्व केले आणि रौप्य पदक जिंकले. २०१५ मध्ये तिने भारतीय रेल्वेमध्ये नोकरी सुरू केली आणि रेल्वेला वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत ६४व्या (२०१६-१७),६६व्या (२०१८-१९)आणि ६७व्या (२०१९-२०) आवृत्तीत सुवर्ण व ६५व्या (२०१७-१८) आवृत्तीत रौप्य पदक जिंकून दिले.
रेल्वे संघाची अग्रगण्य रेडर (पहिली आक्रमणकर्ता) म्हणून सोनाली तिच्या अतिरिक्त गुण लुटण्याच्या शैलीसाठी ओळखली जाते. जकार्ता येथे आशियाई खेळ २०१८ मध्ये भारताकडून खेळण्यासाठी तिची निवड झाली होती, जिथे भारताने रौप्य पदक जिंकले. काठमांडू येथे दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा २०१९ मध्ये ती सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होती.
पुरस्कार
सन २०२० मध्ये महाराष्ट्र शासनाने तिला राज्यातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानित केले.
पदके
प्रतिनिधित्व : भारत
सुवर्ण : दक्षिण आशियाई खेळ २०१९ ,काठमांडू, नेपाळ
रौप्य : आशियाई खेळ २०१८,जकार्ता, इंडोनेशिया
संदर्भ
- ^ "10 things to know about Sonali Shingate on her 25th birthday". Kabaddi Adda (इंग्रजी भाषेत). 2021-02-17 रोजी पाहिले.
- ^ "BBC News हिंदी" (हिंदी भाषेत).
- ^ "BBC News मराठी".
- ^ Vijay.Sain (2020-01-29). ""There should be a Pro Kabaddi League for the women as well," says Indian women's kabaddi team raider Sonali Shingate (Exclusive)". www.sportskeeda.com (इंग्रजी भाषेत). 2021-02-17 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
खेल कबड्डी Archived 2021-01-23 at the Wayback Machine. प्लेयर प्रोफाइल
स्पोर्ट्सकीडा प्रोफाइल