Jump to content

सोनगिर किल्ला

गुणक: 21°05′N 74°47′E / 21.083°N 74.783°E / 21.083; 74.783

सोनगिर(सुर्वणगिरि)

सुर्वणगिरी किल्ल्याचा कसाबसा तग धरुन उभा असलेला एकमेव दरवाजा
नावसोनगिर(सुर्वणगिरि)
उंची१००० फूट
प्रकारगिरीदुर्ग
चढाईची श्रेणीअत्यंत सोपी
ठिकाणधुळे, महाराष्ट्र
जवळचे गावशहादा,शिरपूर,धोंधाई,सोनगिर गाव
डोंगररांगगाळणा टेकडया
सध्याची अवस्थाव्यवस्थित
स्थापना{{{स्थापना}}}


सोनगिर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.जे मुघल सुभेदार अहमद फारुकी याने अपल्या शासन काळात निर्मित दुसरा सर्वात किल्ला आहे, अहमद फारुकी ने सम्राट अकबराच्या काळात ' खान्देशाला ' मोठ्या प्रमाणात विकसित केले, सोनगीर अर्थात सुर्वणगिरी किल्ला हा धुळे जिल्ह्यामध्ये आहे.

भौगोलिक स्थान

मध्ययुगीन काळात महत्त्व पावलेला सुर्वणगिरी किल्ला धुळ्याच्या उत्तरेला २० कि.मी. अंतरावर आहे. धुळे शहर हे खानदेशामध्ये असून ते मुंबई ते आग्रा तसेच नागपूर ते सूरत या महामार्गावर वसलेले आहे. धुळ्यामधून जाणारा आग्रा महामार्ग हा महामार्ग क्रमांक ३ म्हणून ओळखला जातो. या महामार्गावर सोनगीर गावालगतच सुर्वणगिरीचा किल्ला आहे. सुर्वणगिरी किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासून ३०४ मीटर उंचीवर आहे.

कसे जाल ?

सुर्वणगिरी किल्ल्याला जाण्यासाठी धुळे येथून एस.टी. बसेस मिळतात. धुळे-शिरपूर, धुळे- नरडाणा अशा जाणाऱ्या बसेस येथे थांबतात. सोनगीर येथून नंदुरबारकडेही एक रस्ता जातो. एस.टी.ने या फाट्यावर उतरून एक कि.मी. चालत सोनगीर गाठता येतो.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

सोनगीर गावात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे.या मंदिराच्या दारामध्ये एक मोडकी तोफ बेवारस पडलेली होती ती सोनगीर पोलीस स्टेशन समोर स्थापित करण्यात आली आहे. मंदिराच्या बाजूलाच तीस फूट उंचीचा बालाजीचा लाकडी नक्षीकाम असलेला रथ ठेवलेला आहे. या रथापासूनच किल्याकडे जाण्याचा रस्ता आहे.

किल्ल्याच्या पूर्व पायथ्याला घरांची लांबलचक रांग आहे. घरांच्या रांगांमध्ये बोळ आहेत. बोळातून घरांच्या मागच्या बाजूपर्यंत किल्ल्याचा पूर्वउतार पोहोचलेला आहे. हा परिसर अतिशय अस्वच्छ आहे. आठ-दहा मीटर चढल्यावर किल्ल्याच्या डावीकडे जाणारी मळलेली वाट लागते. या वाटेच्या टोकावर सुर्वणगिरी किल्ल्याचा कसाबसा तग धरून उभा असलेला एकमेव दरवाजा दिसतो. पायथ्यापासून या दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी पुरेसा आहे. दरवाजावर सध्या कसलेच नक्षीकाम किंवा शिल्पांकन नाही. येथे पूर्वी एक शिलालेख लावलेला होता असा उल्लेख आहे. या शिलालेखाचा दगड प्रवेशद्वारावरून खाली निखळून पडला. २७ इंच लांब आणि ९ इंच रुंद असलेला या शिलालेखाचा दगड येथून उचलून धुळे येथील राजवाडे संशोधन मंडळात नेऊन ठेवलेला आहे. त्यावर संस्कृत भाषेतील ओळी कोरलेल्या आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर माथ्यावर जाणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या सुरुवातीलाच दरवाजाला लागून एक कबर आहे. कबरीपासून पंधरा-वीस पायऱ्या चढून वर गेल्यावर गडमाथा लागतो. हा माथा समुद्रसपाटीपासून ३०४ मीटर उंचीवर आहे. पायथ्यापासून २० मिनिटांमध्ये माथा गाठता येतो.

सुर्वणगिरीचा किल्ला रुंदीला कमी असून तो लांबीने जास्त आहे. माथ्यावरील पठारावर आज उल्लेखनीय एकही वास्तू नाही. इ.स. १८५४ साली इंग्रजांनी या किल्ल्याची पहाणी केली होती. त्यावेळी गडावर थोड्या वास्तू असल्याची नोंद त्यांनी केलेली आहे. सुर्वणगिरीचा माथा दक्षिणोत्तर पसरलेला आहे. याची तटबंदी रचीव दगडाची आहे. ती तटबंदीही मधून मधून खाली ढासळलेली आहे. उत्तरेकडील तटबंदीवर असलेल्या बुरुजांचे तुरळक अवशेष पहायला मिळतात. जमिनीखाली हौदासारखी वास्तू बांधून त्यामध्ये तेल व तूप साठवीत असल्याचे दिसते. या जागांना तेल टाके, तूप टाके असे म्हणतात. गडावर पाण्याची सोय व्हावी म्हणून एक मोठे पण खोल असे टाके खडकात कोरलेले आहे. पाणी पाझरू नये म्हणून ते चारही बाजूने गिलावा देऊन सुरक्षित केलेले आहे. या टाके-वजा विहिरीतून खाली गावातही पाणी पुरवठा होत असे. या विहिरीतून पाणी काढण्यासाठी अंबाडीच्या दोरासाठी साडेतीन रुपये खर्च झाल्याची १८०६-०७ मधील एक नोंद जमाखर्चात आहे. या विहिरीला सासू-सुनेची विहीर म्हणतात.

या किल्ल्यात आजही गुप्तधन असल्याची चर्चा गावात केली जाते. शत्रूचा हल्ला झाल्यास पळून जाता यावे यासाठी या किल्ल्यात एक गुप्त भुयार तयार करण्यात आले होते. हे भुयार जवळ जवळ १७ कि.मी. लांब आहे.

इतिहास

अतिशय मोक्याच्या जागी असलेला सुर्वणगिरी किल्ला नेमका कोणी बांधला याची इतिहासात नोंद नाही. १२व्या शतकात येथे यादवांचे राज्य असल्याने त्या राजांपैकी उग्रसेन नावाच्या राजाने हा किल्ला बांधला असावा. हा किल्ला महत्त्वाच्या आणि मोक्याच्या जागी असल्यामुळे फारुखी सुलतानांनी हा इ.स. १३७० मध्ये हिंदू सरदाराकडून जिंकून त्यावर आपली पकड कायम ठेवली. पुढे मोगल बादशहा अकबराने आपली सत्ता खानदेशात प्रस्थापित केल्यावर सुर्वणगिरी त्यांच्या ताब्यात गेला. औरंगजेबानंतर हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला. इ.स. १८१८ मध्ये तो ब्रिटिशांनी जिंकून घेतला.


हे सुद्धा पहा

  • भारतातील किल्ले