Jump to content

सोनकोळी

सोनकोळी हा महाराष्ट्राच्या कोकण भागात राहणारा समाज आहे. या जातीचें मुख्य ठिकाण चंपावती (चेऊल, रायगड जिल्हा) हे होय. यांची मुख्य वस्ती मुंबई बेट, कुलाबा, ठाणेरत्‍नागिरी या चार भागांतील समुद्रकांठच्या गांवी आहे. मुंबईचे पूर्वज म्हणून यांना ओळखले जाते.कारण मुंबई चे नामकरण या लोकांची ईष्टदेवी मुंबा देवीचा नावाने झाला आहे.मुंबईत १९३४ साली लालबाग चा राजाची स्थापना याच लोकांनी केली होती.हे लोक खूप पारंपरिक आणि मन मिळाऊ असतात.यांचा मुख्य आहार मासे(म्हावरा) आहे. आणि कोकण मध्ये ही एक प्राचीन आणि प्रमुख जात आहे.तसेच ठाणे,कल्याण-डोंबिवली जे खाडी लगतचे गाव आहेत तिकडे सोनकोळी लोकांची वस्ती दिसून येते.

यांचा मुख्य धंदा मासे धरण्याचा. मोठे मासे फक्त दर्यात सापडतात. म्हणून हे दर्याकाठीच राहतात. हे लोक जाळ्यांनी मासे धरतात व यांच्या बायका ते मासे ताजे किंवा वाळवून बाजारांत विकतात. यांच्या जाळ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:- डोलं, बोकशी, जाळ, पास, तिबोटें, वागूर, कानजावळें, जावळें, हेडा, पाग,भुसा,घोळवें, खांदा वगैरे.तसेच मागील काही वर्षांपासुन आधुनिक पद्धतीचा वापर करून देखील हे लोक मत्स्यशेती करतात.

 सोनकोळी नावाबद्दल शिवनिबंध नामक ग्रंथांत पुढील कथा आहे. परमेश्वराच्या सोहंध्वनीपासून एक पुरुष निर्माण झाला, त्याला सोहं अगर सोम किंवा मयातऋषी असे नाव मिळाले. त्याची मुलगी अचिंता ही कश्यपास दिली, तिला मार्धन म्हणून मुलगा झाला. याच्या वंशजास सोम नाव पडलें. त्याची प्रवृत्ती तपापासून सुटून हिंसेकडे होऊ लागल्याने मयातऋषीने त्यास मासे मारून निर्वाह करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तो करू लागल्यावर त्याचे सोम नाव जाऊन सोन अगर सोनकोळी हे नाव पडलें. सोनकोळी जात कोणत्या वर्णाची आहे याबद्दल निश्चित सांगता येत नाही. “यांची प्रथम वस्ती कुलाबा जिल्ह्यांत होती. नंतर तेथून ते ठाणे व रत्‍नागिरी जिल्ह्यांत पसरले. कुलाबा जिल्ह्यांतील थळ वगैरे गावांतील वस्ती उठून मुंबई, ठाणें, चिंबई, वेसावें इकडे येऊन राहिली.यांची कुलदैवते जेजुरीचा खंडोबा व कार्ल्यांच्या लेण्यांतील एकवीरा देवी ही होत. या पंथाचा प्रवर्तक कुलाबा जिल्ह्यांतील मौजे वरसोली गांवचा पूर्वीचा कोणी कान्हो नावाचा भगत होता. हा स्मार्तपंथांतर्गत खंडोबाचा पंथ असून याच्या धर्मगुरूची गादी वरील वरसोली गावी आहे व गादीवर वरील भगताचाच वंशज अधिष्ठित आहे. सोनकोळ्यांकडून भिन्न अशा कोळ्यांच्या जाती पुढीलप्रमाणे आहेत:- गांवकर सोनकोळी, वैती, मांगेली, मेंद्री, खारबी, ढोरलेकर, ऱहटाळकर, गावीट, पान, राज, मार्तंड, डोंगरी, भिल्ल, भोईर, कराडे व क्रिस्तांव. या जाती बहुतेक मासळी मारून त्यावर निर्वाह करणाऱ्या व थोडय़ा शेती वगैरे दुसरे धंदे करणाऱ्या आहेत. क्रिस्ताव हे जरी ख्रिस्ती धर्म पाळतात तरी ते हिंदू धर्मही थोडाफार आचरतात. सोन, गांवकरसोन, वैती व मार्तंड या चौघांत परस्पर अन्नोदकव्यवहार चालतो. मात्र हे चारही इतर कोळ्यांच्या घरी जेवीत नाहीत. लग्नव्यवहाराविषयी म्हटल्यास ज्या जातींतील स्त्री-पुरुषांचा त्याच जातींतील स्त्री-पुरुषांबरोबर विवाह होत असतो. मध्यंतरी सोन व गांवकरसोन यांच्यात लग्ने होत; परंतु हल्ली ही चाल बंद होत चालली आहे. मात्र कुलाब्यातील करंजे मुलुखांड व ठाण्यांकडील साबासें, दिवाळें इकडे ही चाल सुरू आहे.