Jump to content

सेपरेट रोड्स टू फेमिनिझम

बेनिता रोथ यांनी लिहिलेले सेपरेट रोड्स टू फेमिनिझम हे पुस्तक केम्ब्रिज प्रकाशनाने २००४ साली प्रसिद्ध केले आहे.[] स्त्रीवादाच्या ‘दुसऱ्या लाटेतील’Second-wave feminism वेगवेगळ्या स्त्रीवादी चळवळी का व कशा उभ्या राहिल्या हा या पुस्तकाचा विषय आहे.

प्रस्तावना

या विषयाचा उगम लेखिकेच्या वैयक्तिक अनुभवातून झाला आहे. एकीकडे काळ्या स्त्रीवादी(Black Feminism) स्त्रिया गोऱ्या स्त्रीवादी (Feminism[permanent dead link]) आंदोलनांमध्ये सामील होत नव्हत्या कारण त्यांच्यामते गोऱ्या स्त्रीवाद्यांना वांशिक शोषण समजणे शक्य नव्हते. तर दुसऱ्या बाजूला गोऱ्या स्त्रीवादी खूप मोठ्या प्रमाणात काळे स्त्रीवादी लिखाण वाचत होत्या आणि त्यातून त्यांच्या वर्ग, वंश, लैंगिकता आणि समलैंगिक शोषणा संदर्भातील जाणिवा विकसित होत होत्या. असे असूनही हे दोन्ही स्त्रीवादी दृष्टिकोन वंशीय आणि वर्णीय दृष्ट्या वेगवेगळे का संघटित झाले?

लेखिका म्हणते की, दुसऱ्या लाटेतील स्त्रीवादाची जडण-घडण ही त्याच्या गाभ्याशी असलेल्या वर्ण, वर्ग आणि वंशीय स्त्रीवादी व्यक्तींच्या प्रेरणेतून झाली. या प्रेरणा समजून घेण्यासाठी त्यांच्यातील संवादच नव्हे तर एकंदरीत सामाजिक चळवळीची रचना, चळवळीअंतर्गत राजकारण आणि अमेरिकेतील विषमतेची रचना समजून घेणे आवश्यक आहे. वेगवेगळया वर्णीय आणि वंशीय समूहांतील स्त्रीवाद्यांनी एखाद्या विशिष्ट मुद्यासाठीच संघटन का केले, त्यांचे आपल्या समूहातील पुरुष कार्यकर्त्यांशी काय नाते होते, तसेच अत्यंत अस्थिर, गुंतागुंतीच्या आणि स्पर्धात्मक असलेल्या सामाजिक चळवळींच्या पर्यावरणामुळे निर्माण झालेल्या आपत्तींना त्यांनी कसे तोंड दिले. याचे विश्लेषण लेखिका या पुस्तकात करीत आहे.

या पुस्तकात लेखिका असे सांगते की, स्त्रीवादाची दुसरी लाट हा संघटनात्मक दृष्ट्या पहिल्यापासून एकमेकांपेक्षा पूर्णतः वेगळ्या असलेल्या स्त्रीवादी कार्यकर्त्यांचा समूह होता. या स्त्रिया वर्ण आणि वंशाच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर संघटित होत्या. या घटनाक्रमांचा वेध घेण्यासाठी लेखिका काळ्या, चिकाना आणि गोऱ्या स्त्रीवादी चळवळींचा आढावा घेते. या तीन चळवळींबाहेरही अनेक चळवळी होत्या. परंतु एकाच काळात उदयास आलेल्या, अनेक राज्यांत पसरलेल्या, त्यांच्यांमधील आंतरसंबंध आणि संघटनाअंतर्गत चिरफाळ्या विचारात घेऊन लेखिकेने या तीन चळवळी निवडल्या; किंवा या तीन चळवळींकडे लेखिकेने लक्ष केंद्रित केले आहे.


संशोधन पद्धती

यासाठी लेखिकेने ऐतिहासिक तुलनेची पद्धत (कंपॅरिटिव्ह हिस्टॉरिकल मेथड) वापरली आहे.

प्रकरणे

‘टू हूम डू यू रेफर? स्ट्रक्चर ॲन्ड सिच्युएटेड फेमिनिस्ट’

या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात लेखिका काळ्या अमेरिकन, चिकाना (Chicana feminism) आणि गोऱ्या स्त्रीवादी कार्यकर्त्या वंश आणि वर्गाच्या उतरंडीवर कोणत्या स्थानावर होत्या आणि त्यामुळे चळवळ बांधताना काय परिणाम झाले याचा अभ्यास केला आहे.

‘द “फोर्थ वर्ल्ड” इज बॉर्न: इंट्रामुव्हमेंट एक्सपीरिअन्स, ऑपोझिशनल पॉलिटिकल कम्युनिटीज, ॲन्ड द इमर्जन्स ऑफ द व्हाईट वीमेन्स लिबरेशन मुव्हमेंट’

या दुसऱ्या प्रकरणात तीन विभाग आहेत. मानवाधिकाराची चळवळ आणि नवी डावी चळवळ यातील अनुभवांतून स्त्रीवादाच्या निर्मिती प्रक्रियेचा अभ्यास लेखिकेने मांडला आहे. या उलट जे अगोदरच कामकाजी प्रश्नांवर आणि गोऱ्या स्त्रियांच्या प्रश्नावर काम करीत होते, अशा कामकरी महिलांच्या संपर्कजाळ्यांनी शोषणाचा विशेषतः वांशिक शोषणाचा मुद्दा कसा स्वीकारला याचे विश्लेषणही केले आहे. या तीनही स्त्रीवादी चळवळींना अशा विरोधाभासी अनुभवांचा वारसा आणि ओझे दोन्हीही मिळाले.

‘द व्हॅनगार्ड सेंटर: इंट्रामुव्हमेंट एक्सपीरिअन्स ॲन्ड द इमर्जन्स ऑफ ब्लॅक फेमिनिझम’

या तिसऱ्या प्रकरणात, गोऱ्या स्त्रियांच्या चळवळी बरोबरच थोड्या प्रमाणात का होईना काळ्या स्त्रियांच्या चळवळींचाही उगम झाला होता हे सांगताना लेखिका निदर्शनास आणून देते की, काळ्यांच्या वंशवाद विरोधी लढ्याने ‘पुरुषी’ स्वरूप घेतल्याने काळ्या स्त्रियांची भूमिका मर्यादित झाली. त्याचवेळी मानव अधिकाराची चळवळ उत्तरेतील तरुणांमध्ये लोकप्रिय होत होती आणि गोऱ्या स्त्रियांच्या स्त्रीवादी चळवळी उदयास येत होत्या. काळे स्त्रीवादी या सर्व चळवळींना ‘मध्यम वर्गीय’ मानत असत आणि त्यांनी स्वतःचे असे वर्गीय, वंशीय, लिंगभावात्मक दृष्टिकोन तयार केला आणि त्यातून १९६८ ते १९७० मध्ये ताकदवान काळी स्त्रीवादी चळवळ उभी राहिली.

‘वुई कॉल्ड अवरसेलव्हज ‘फेमिनिस्टाज्’’’: इंट्रामूव्हमेंट एक्सपरीअन्स ॲन्ड द इमर्जन्स ऑफ चिकाना फेमिनिझम’

या चौथ्या प्रकरणात चिकाना फेमिनिझमच्या वेगळेपणाचा आढवा घेतला आहे. चिकाना लोकसमूहाचे विशिष्ट सामाजिक स्थान आणि चळवळीच्या निराळ्या प्रेरणा यामुळे चिकाना फेमिनिझमचा जन्म झाला. चिकाना चळवळीमध्ये स्त्री कार्यकर्त्यांनी संस्कृती रक्षणाचे ओझे वाहिले त्यामुळे चिकाना स्त्रीवाद्यांनी स्त्रीवादी संघटनांसाठी नवे मुद्दे वापरले त्यामुळे चिकाना स्त्रीवाद्यांनी मूळ चळवळीशी संबंध राखूनही स्वतंत्र अशा वेगळ्या चिकाना स्त्रीवादी चळवळी उभारल्या.

वेगवेगळ्या आंदोलनांमधील राजकारण

‘ऑर्गनायझिंग वन्स ओन मुव्हमेंट सेक्टर ॲन्ड द राईज ऑफ ऑर्गनायझेशनली डिस्टिंक्ट फेमिनिस्ट मुव्हमेंट्स’

हा या पाचव्या प्रकरणाचा विषय आहे. १९६० च्या दशकातील चळवळींमधील स्पर्धात्मक राजकारणामुळे आणि सामाजिक चळवळींच्या गर्दीमध्येही या तीन म्हणजेच काळ्या, चिकाना आणि गोऱ्या चळवळी संघटनात्मकदृष्ट्या वेगळ्या प्रकारे उदयास आल्या. या काळात निर्माण झालेल्या अनेक सामाजिक आंदोलनांचा कणा स्त्री कार्यकर्त्या होत्या. निष्ठावान असण्याबाबत पुरुष कार्यकर्ते स्त्री कार्यकर्त्यांच्या स्पर्धेत असत. काळ्या स्त्रिया आणि चिकाना चळवळीतील स्त्रियांच्या निष्ठा अत्यंत प्रखर असत. गोऱ्या स्त्रीवादाने विश्वव्यापी शोषणाची मांडणी केली. या तऱ्हेने तीनही प्रवाह वेगवेगळ्या पद्धतीने परंतु ताकदीने उभे राहिले.

‘फेमिनिस्ट्स ऑन देअर ओन ॲन्ड फॉर देअर ओन: रीव्हिझिटिंग ॲन्ड “री- व्हिजनिंग” सेकंड–वेव्ह फेमिनिझम्स’

या प्रकरणात निष्कर्ष लिहिताना लेखिका लिहिते की, वंश, वर्ण आणि वर्गाच्या आणि लिंगभावाच्या प्रेरणा समजावून घेतल्यास स्त्रीवादाच्या दुसऱ्या लाटेचे एक समर्पक चित्र आपल्यासमोर उभे राहाते. या घटनाक्रमाकडे विविध अंगाने पहिल्यास सर्व विभागातील शोषणामध्ये असलेली समानता नोंदवताना आणि विषमतेविरुद्ध लढताना स्त्रीवादाची क्षमता पुढे येते या पुढे जाऊन या सर्व वेगवेगळ्या स्त्रीवादांमध्ये युती होण्याची काय शक्यता आहे याचाही विचार शेवटी लेखिका मांडते.


संदर्भ

  1. ^ Roth, Benita (2004), Separate Roads to Feminism, NY, Cambridge University Press, ISBN 978-0-521-52972-3