सॅमसन, लीला
भारतीय भरतनाट्यम् नर्तकी. केंद्रीय चित्रपट-प्रमाणन मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा. तमिळनाडू राज्यातील कुनूर येथे जन्म. त्यांनी बी.ए. पदवी संपादन केली आणि नंतर भरतनाट्यम् नृत्याचे प्रशिक्षण ‘कलाक्षेत्र’ या नृत्यसंस्थेत घेतले. ह्या नृत्यसंस्थेची स्थापना प्रख्यात नर्तकी रुक्मिणीदेवी ॲरंडेल यांनी १९३६ मध्ये केली होती आणि प्रत्यक्ष त्यांच्याकडून सॅमसन यांना नृत्याचे शिक्षण मिळाले. भरतनाट्यम् नृत्यशैलीच्या विविध तांत्रिक अंगोपांगांचे बारकावे त्यांनी आत्मसात केले. सॅमसन यांची विशेष ख्याती तंत्रकुशल नर्तकी म्हणूनच मुख्यत्वे आहे. ह्या तांत्रिक कौशल्याचा व त्यातील सूक्ष्म बारकाव्यांचा अचूक प्रत्यय त्यांच्या नृत्याविष्कारांतून येतो. त्यांनी भारतात सर्वत्र तसेच विदेशांतही नृत्याचे कार्यक्रम केले. नृत्यगुरू म्हणूनही त्यांनी केलेले कार्य लक्षणीय आहे.
दिल्ली येथील ‘श्रीराम भारतीयकलाकेंद्र’ या संस्थेत त्यांनी अनेक वर्षे भरतनाट्यम् शिकविले. तसेच तेथील गांधर्व महाविद्यालयातही नृत्याचे अध्यापन केले. परदेशांत- मुख्यत्वे यूरोप, आफ्रिका व अमेरिका येथे- त्यांनी भरतनाट्य म्च्या प्रसार आणि प्रशिक्षण-कार्यात मोलाची कामगिरी बजावली. रॉयल ऑपेरा हाउस, कव्हेंटगार्डन, लंडन येथे तसेच मँचेस्टर येथील ‘मिलाप्फ्रेस्ट’ या वार्षिक महोत्सवात त्यांनी भरतनाट्यम् नृत्याचे प्रशिक्षण दिले. १९९५ मध्ये त्यांनी ‘स्पंद’ ह्या नृत्यगटाची स्थापना केली. भरतनाट्यम्च्या पारंपरिक स्वरूपाची चिकित्सा करण्याचे उद्दिष्ट ह्या गटाच्या स्थापनेमागे होते. त्यांच्या नृत्यविषयक कार्यावर आधारित संचारी व द फ्लॉवरिंग ट्री हे दोन अनुबोधपट निर्माण करण्यात आले. चेन्नई येथील ‘कलाक्षेत्र’ या संस्थेच्या संचालिका म्हणून त्यांची नियुक्ती एप्रिल २००५ मध्ये करण्यात आली. तसेच ऑगस्ट २०१० मध्ये संगीत नाटक अकादेमीच्या अध्यक्षपदी त्यांची पाच वर्षांसाठी नेणूक करण्यात आली, त्याआधी अनेक वर्षे त्या अकादमीच्या सदस्य होत्या.
त्यांची केंद्रीय चित्रपट-प्रमाणन मंडळाच्या ( सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशन ) अध्यक्षा म्हणून मार्च २०११ मध्ये नियुक्ती करण्यात आली (पूर्वीचे ‘चित्रपट अभ्यवेक्षण मंडळ’- फिल्म सेन्सॉर बोर्ड ). या मंडळाच्या आधीच्या अध्यक्षा नामवंत अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा कार्यकाल (२००४ पासून ३१ मार्च २०११ पर्यंत ) संपल्यानंतर लीला सॅमसन यांनी १ एप्रिल २०११ पासून या पदाचा कार्यभार स्वीकारला.
सॅमसन यांनी रुक्मिणीदेवी ॲरंडेल यांचे चरित्र रुक्मिणीदेवी : अ लाइफ (२०१०) या शीर्षकाने लिहिले. तसेच ऱ्हिदम इन जॉय :क्लासिकल इंडियन डान्स ट्रॅडिशन्स (१९८७) हे भारतीय पारंपरिक नृत्यशैलींविषयी पुस्तक लिहिले. या पुस्तकांची खूप प्रशंसा झाली व त्याला प्रमाणग्रंथ म्हणून सर्वत्र मान्यताही लाभली.
सॅमसन यांना अनेक मानसन्मान लाभले. त्यांत पद्मश्री (१९९०), तमिळनाडू शासनातर्फे दिला जाणारा ‘नृत्यचूडामणी कलैमामणी’ (२००५), संस्कृती पुरस्कार, भरतनाट्यम् नृत्यातील योगदानासाठी संगीत नाटक अकादेमी पारितोषिक (१९९९-२०००) हे प्रमुख होत.