Jump to content

सूर्याचे राशिभ्रमण

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. सूर्याच्या या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे (तारकापुंज) येतात. ही २। (सव्वा दोन) नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

अभिजित नावाचे एक २८वे एक-चरणी नक्षत्र मानले जाते. हे छोटे नक्षत्र उत्तराषाढा आणि श्रवण यां नक्षत्रांदरम्यान येते. अभिजित नक्षत्रात सूर्य २१ ते २३ जानेवारी या काळात असतो.

प्रत्येक नक्षत्राचे चार चरण (भाग) आहेत अशी कल्पना केली आहे. त्यामुळे काही पूर्ण नक्षत्रे व काही नक्षत्रांचे काही चरण मिळून एक रास बनते. एका राशीत २। (सव्वा दोन) नक्षत्रे म्हणजे नक्षत्रांचे एकूण नऊ चरण असतात. चरण दाखवण्याची पद्धत अशी :- आश्विनी-१, मृग-२, चित्रा-३, ४, विशाखा-४ म्हणजे अनुक्रमे - आश्विनी नक्षत्राचा पहिला चरण, मृगाचा दुसरा, चित्राचा तिसरा व चौथा चरण, आणि विशाखाचा चौथा चरण.

रास, तिच्यातील नक्षत्रे आणि त्यांचे चरण

  • मेष : आश्विनी + भरणी + कृत्तिका-१
  • वृषभ : कृत्तिका-२, ३, ४ + रोहिणी + मृग-१, २
  • मिथुन : मृग-३, ४ +आर्द्रा + पुनर्वसू-१, २, ३
  • कर्क : पुनर्वसू-४ + पुष्य + आश्लेषा
  • सिंह : मघा + पूर्वा + उत्तराफाल्गुनी-१
  • कन्या : उत्तरा-२, ३, ४ + हस्त + चित्रा-१, २
  • तूळ : चित्रा-३, ४ + स्वाती + विशाखा-१, २, ३
  • वृश्चिक : विशाखा- ४ + अनुराधा + ज्येष्ठा
  • धनु : मूळ + पूर्वाषाढा + उत्तराषाढा-१
  • मकर : उत्तराषाढा-२, ३, ४ + श्रवण + धनिष्ठा-१, २
  • कुंभ : धनिष्ठा-३, ४ + शततारका + पूर्वाभाद्रपदा-१, २, ३
  • मीन : पूर्वाभाद्रपदा-४ + उत्तराभाद्रपदा + रेवती

सूर्याच्या प्रत्येक राशीत व नक्षत्रात राहण्याच्या अंदाजे तारखा

  • कन्या रास : १७ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर
  • कर्क रास: १६ जुलै ते १६ ऑगस्ट
  • कुंभ रास : १३ फेब्रुवारी ते १३ मार्च
  • तूळ रास : १७ ऑक्टोबर ते १५ नॊव्हेंबर
  • धनु रास : १६ डिसेंबर ते १३ जानेवारी
  • मकर रास : १४ जानेवारी ते १२ फेब्रुवारी
  • मिथुन रास : १५ जून ते १५ जुलै
  • मीन रास : १४ मार्च ते १३ एप्रिल
  • मे़ष रास : १४ एप्रिल ते १३ मे
  • वृश्चिक रास : १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर
  • वृषभ रास : १४ मे ते १४ जून
  • सिंह रास : १७ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर

  • आश्विनी नक्षत्र : १४ एप्रिल ते २६ एप्रिल
  • भरणी नक्षत्र : २७ एप्रिल ते १० मे
  • कृत्तिका नक्षत्र : ११ मे ते २४ मे
  • रोहिणी नक्षत्र : २५ मे ते ७ जून
  • मृग नक्षत्र : ८ जून ते २१ जून
  • आर्द्रा नक्षत्र : २२ जून ते ५ जुलै
  • पुनर्वसू नक्षत्र : ६ जुलै ते १९ जुलै
  • पु़्ष्य नक्षत्र : २० जुलै ते २ ऑगस्ट
  • आश्ले़षा नक्षत्र : ३ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट
  • मघा नक्षत्र : १७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट
  • पूर्वा (फाल्गुनी) नक्षत्र : ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर
  • उत्तरा (फाल्गुनी) नक्षत्र : १३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर
  • हस्त नक्षत्र : २७ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर
  • चित्रा नक्षत्र : १० ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर
  • स्वाती नक्षत्र : २४ ऑक्टोबर ते ५ नॊव्हेंबर
  • विशाखा नक्षत्र : ६ नोव्हेंबर ते १८ नॊव्हेंबर
  • अनुराधा नक्षत्र : १९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर
  • ज्येष्ठा नक्षत्र : ३ डिसेंबर ते १५ डिसेंबर
  • मूळ नक्षत्र : १६ डिसेंबर ते २८ डिसेंबर
  • पूर्वाषाढा नक्षत्र : २९ डिसेंबर ते १० जानेवारी
  • उत्तराषाढा नक्षत्र : ११ जानेवारी ते २३ जानेवारी
  • श्रवण नक्षत्र : २४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी
  • धनिष्ठा नक्षत्र : ६ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी
  • शततारका नक्षत्र : १९ फेब्रुवारी ते ३ मार्च
  • पूर्वाभाद्रपदा नक्षत्र : ४ मार्च ते १७ मार्च
  • उत्तराभाद्रपदा नक्षत्र : १८ मार्च ते ३० मार्च
  • रेवती नक्षत्र : ३१ मार्च ते १३ एप्रिल

सूर्याच्या नक्षत्रात असण्याबद्दल व चांद्रमासाबद्दल काही सामाजिक व सांस्कृतिक संकल्पना/तथ्ये/म्हणी

  • सत्तावीस वजा नऊ = शून्य... मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा आणि हस्त ही महाराष्टातल्या पावसासाठीची नऊ नक्षत्रे आहेत. सूर्य मृग नक्षत्रात आला की, पावसाळा सुरू होतो आणि तो हस्त नक्षत्रात गेला की, पावसाळा संपतो. म्हणून मृग ते हस्त ही सारी पावसाची नक्षत्रे मानली जातात. एकूण नक्षत्रे सत्तावीस असली तरी यांच नऊ नक्षत्रांत पाऊस पडला नाही तर परिणाम शून्य. त्यामुळे, सत्तावीस वजा नऊ = शून्य!
  • जेव्हा सूर्य मृग नक्षत्रात असतो, तेव्हा गडगडाटासह माॅन्सूनपूर्व पाऊस पडतो. नैर्ऋत्य दिशेकडून माॅन्सून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असतो, पण देशावरची परिस्थिती त्याला अडथळा करते. या संघर्षातून ढगांचा गडगडाट होतो. काही दिवसातच माॅन्सूनचा जोर वाढतो आणि सर्व अडथळे दूर करून माॅन्सून भारतभर पसरतो.
  • जेव्हा सूर्य हस्त नक्षत्रात असतो, तेव्हा महाराष्ट्रात हत्तीच्या सोंडेसारखा मुसळधार गडगडाटी पाऊस पडतो. त्या काळात हत्तीचे चित्र काढलेल्या बसायच्या लाकडी पाटाभोवती फेर धरून स्त्रिया व मुली भोंडला खेळतात. परतीच्या वाटेवरचा नैर्ऋत्य माॅन्सून आणि येऊ पाहणारा ईशान्य माॅन्सून यांच्या संघर्षामुळे हा गडगडाट होतो.
  • २५ मे रोजी सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो. तो दिवस धरून पुढचे एकूण नऊ दिवस मध्य प्रदेश आणि आजूबाजूच्या राज्यांत हवेचे तापमान खूप जास्त असते आणि उन्हाळ्याची सर्वाधिक तीव्रता जाणवते. या घटनेला नौतपा म्हणतात.
  • वैशाख वणवा :- वैशाखात जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण जास्त असते. अश्या आगीला वैशाख वणवा म्हणतात. एखाद्याच्या आयुष्यात रखरखाट असेल, तर त्यालाही वैशाख वणव्याची उपमा देतात.
  • काल वैसाखी : बंगालमध्ये वैशाख महिन्यात ज्या स्थानिक वावटळी आणि धुळीची वादळे हॊतात त्यांना काल वैसाखी म्हणतात.
  • श्रावणधारा : महाराष्ट्रात श्रावण महिन्यात सौम्य ऊन व झिमझिम पाऊस पडतो, अशा पावसाला श्रावणधारा म्हणतात.
  • चैत्रपालवी : चैत्र महिन्यात झाडांनी जी नवी पालवी फुटते तिला चैत्रपालवी म्हणतात.
  • पानगळ : समशीतोष्ण प्रदेशांत नैसर्गिकरीत्या झाडांची पाने गळण्याचा कालावधी शरद ऋतूचा असतो तर उष्ण कटिबंधात हवामान शुष्क होण्याआधी पानगळ होते.
  • आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास - मराठी म्हण.
  • दुष्काळात तेरावा महिना. - मराठी वाक्प्रचार
  • चतुर्मास (चातुर्मास) : आषाढी एकादशीला (शयनी एकादशीला) भगवान विष्णू झोपायला जातात, ते कार्तिकी एकादशीला (देवउठणी एकादशीला) उठतात. या चार महिन्यांच्या काळाला चातुर्मास म्हणतात. या काळात हिंदूची व्रतवैकल्ये असतात, आणि जैन साधू 'स्थानकवासी" होतात.
  • सूर्याच्या धनुराशीत प्रवेश केल्यानंतर, म्हणजे १६ डिसेंबरच्या आसपास खरमास सुरू होतो आणि १४ जानेवारीच्या आसपास संपतो. या महिन्यात सू्र्याचा रथ गाढवे (खर) ओढतात व रथाच्या घोड्यांना विश्रांती मिळते.
  • सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाच्या दिवशी भारतात मकरसंक्रांत हा सण असतो. इंगर्जी कॅलेंडरप्रमाणे हा दिवस २०व्या-२१व्या शतकात बहुतेक वेळा १४ किंवा १५ जानेवारीला आला आहे/येईल. इतर शतकांसाठी मकरसंक्रांत हा लेख वाचता येईल.
  • आसलकाचा पाऊस : आश्लेषा नक्षत्रातला पाऊस
  • तरणा पाऊस : पुनर्वसू नक्षत्रातला पाऊस
  • नागडा पाऊस : ऊन असताना पडणारा पाऊस
  • म्हातारा पाऊस : पुष्य नक्षत्रातला पाऊस
  • सासूचा पाऊस : मघा नक्षत्रातला पाऊस
  • सुनेचा पाऊस : पूर्वा फाल्गुन नक्षत्रातला पाऊस
  • रब्बीचा पाऊस : उत्तरा फाल्गुन नक्षत्रातला पाऊस
  • हत्तीचा पाऊस : हस्त नक्षत्रातला पाऊस
  • पडतील स्वाती तर पिकतील माणिक मोती : स्वाती नक्षत्रातल्या पावसाचा थेंब शिंपल्यात पडला, की त्याचा मोती होतो, अशी कल्पना आहे. स्वाती नक्षत्रात पाऊस पडला की चांगले पीक येते.
  • पडतील चित्रा तर भात खाईल कुत्रा : चित्रा नक्षत्रातला पाऊन बिन भरवशाचा असतो. पडला तर इतका पडतो की, तो काहीच शिल्लक ठेवत नाही. अगदी वाडग्यात काढून ठेवलेले उष्टावण असो की ताजे जेवण असो, ते एकतर सादळून तरी जाते किंवा बेचव होते. मग त्याचे वर्णन भात खाईना कुत्रा अशा बोलक्या शब्दांत आले आहे.
  • आला आर्दोडा झाला गर्दोडा - आर्द्रा नक्षत्रात पडणारा पाऊस गर्दोडा (चिखल) करतो.(एक ग्रामीण म्हण)
  • पडता हत्ती कोसळतील भिंती.
  • पडतील आद्रा तर झडतील गडदरा (आर्द्रा नक्षत्रात पाऊस बरसला तर, गडकोटांच्या तटबंदी ढासळतील. मथितार्थ असा की आर्द्रा नक्षत्रातला पाऊस पडझड करून जातो.
  • पडतील मघा तर चुलीपुढे हगा. : मघा नक्षत्रातला पाऊस इतका सातत्याने पडतो की, माणूस घराबाहेर पडू शकत नाही, उबेसाठी तो चुलीपाशी बसतो. .
  • पडल्या मिरगा (मृग) तर टिरीकडे बघा.(मृगात पेरणी होत नाही, मात्र पेरणीपू्र्व मशागतीची कामे होतात. ही कामे महत्त्वाची असतात. जर का मृगाचा पाऊस पडला तर ही कामे खोळंबतात. परिणामी पुढच्या सर्व कामांचा विचका होतो. मग पावसाच्या मोसमाअखेरीस पोटावरून हात फिरविण्याची अनुभूती येत नाही. जुन्या मागच्या गोष्टींतच समाधान मानावे लागते. त्या अर्थाने टिरीकडे पहा असे शब्दप्रयोजन आहे.
  • आश्लेषा नक्षत्र : मी येते सळाळा, मामाजी तुम्ही पुढे पळा. आश्लेषाचा पाऊस असा असतो, आता होता आता नाही. तुम्ही पुढे पाऊस मागे, नाहीतर पाऊस पुढे तुम्ही मागे, असे याचे कोसळणे. हा सूर-ताल लावून पडत नाही, आली लहर केला कहर आणि गेला सरसर अशी याची तऱ्हा असते.
  • पुष्य नक्षत्र : पडतील पुक (प़ुष्य) तर चाकरीच्या गड्याला सुख! (पुष्य नक्षत्राचा पाऊस दिवसा ढवळ्या धो धो कोसळतो. आता थांबला म्हणेपर्यंत पुन्हा संततधार सुरू होते. औताला बैल जुंपेपावेतो आभाळ पुन्हा गळू लागते. मग अश्या वेळेला गड्याला कामाला लावता येत नाही. त्याच्यासाठी हा आरामच असतो. हे सुख त्याला क्वचित लाभते.)