सूरज एंगडे
सूरज एंगडे | |
---|---|
जन्म | सहृदय इ.स. १९८८ नांदेड महाराष्ट्र |
निवासस्थान | नांदेड महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | हार्वर्ड विद्यापीठ, अमेरिका जोहान्सबर्ग विद्यापीठ, दक्षिण आफ्रिका |
पेशा | संशोधन, लेखन, व सामाजिक कार्य |
धर्म | बौद्ध |
वडील | विश्वनाथ एंगडे |
आई | रोहिणी एंगडे |
नातेवाईक | प्रणाली एंगडे |
पुरस्कार | डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय पुरस्कार" (कॅनडा, २०१९) |
संकेतस्थळ https://scholar.harvard.edu/surajyengde/about |
डॉ. सूरज मिलिंद एंगडे[a] (जन्म इ.स. १९८८) हे एक भारतीय संशोधक, मानवाधिकार कार्यकर्ते, आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते, वकील व लेखक आहेत. ते मूळचे नांदेडचे असून अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात संशोधन करत आहेत.[१] एंगडे हे भारतातील आघाडीचे विचारवंत आणि जातव्यवस्थेचे प्रख्यात अभ्यासक आहेत. ते बेस्टसेलर 'कास्ट मॅटर्स'चे लेखक आणि 'द रॅडिकल इन आंबेडकर'चे सह-संपादक आहेत. ते नेहमी सुटाबुटात वावरतात, व त्यांची आफ्रिकन हेअरस्टाईल आहे.[२][३] ते संयुक्त राष्ट्रांच्या उपक्रमात काम करतात.[४] जीक्यू इंडिया मासिकाने त्यांना २०२१ मधील २५ सर्वाधिक प्रभावशाली तरुण भारतीयांमध्ये सूचीबद्ध केले आहे.[५][६]
बालपण व प्राथमिक शिक्षण
सूरज एंगडे नांदेडच्या जयभीमनगर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर यादरम्यान असलेल्या जनता हाउसिंग सोसायटीमध्ये त्यांचे बालपण गेले. बौद्ध दलितांमधील सुशिक्षित लोकांनी ती सोसायटी बांधली होती. ते पत्र्याच्या खोलीत राहत.[७] त्यांचे वडील मिलिंद एंगडे हे बँकेत चपराशी होते तसेच ते दलित पँथरशी जोडलेले होते. ते राजा ढालेंचे जवळचे सहकारी असल्यामुळे सूरजचे नाव आधी 'सहृदय' असे ढालेंनीच ठेवले होते. वडील नंतर बामसेफ-बसपाचेही कार्यकर्ते झाले होते. 'वस्तुनिष्ठ विचार' नावाचे साप्ताहिकही ते चालवत असे. वडलांच्या आग्रहामुळे सूरज यांनी कांशीराम यांचे 'चमचायुग' हे पुस्तक वाचले होते. त्यात आंबेडकरी चळवळीतील 'चमच्यां'चे सहा प्रकार कांशीराम यांनी सांगितले आहेत. दारिद्ऱ्य रेषेखालील असलेल्या कुटुंबात वाढताना त्यांनी शाळकरी वयापासून शेतमजूर, ट्रकवरती हेल्पर अशी कामे करत शिक्षण पूर्ण केले. त्यांनी सकाळी वृत्तपत्र विकण्याची काम दोन वर्ष केले.[८] ते लहानपणापासून कविता करायचे.[९] त्यांना एक भाऊ व एक बहीण आहे.[१०] सूरज यांचे कॉलेजपर्यंतचे शिक्षण नांदेडमध्ये झाले. त्यांनी इ.स. २००३ ते २००५ दरम्यान नांदेडच्या सायन्स कॉलेजमध्ये ११वी व १२वीचे शिक्षण घेतले. त्यांनंतर इ.स. २००५ ते २०१० दरम्यान नांदेडच्या विधि महाविद्यालयात शिकते, तेथे ते पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहायचे. या लॉ कॉलेजमधून त्यांनी बीएसएल व एलएलबी ह्या पदव्या मिळवल्या.[११] या महाविद्यालयात सरंजामी वातावरण असतानाही ते जनरल सेक्रेटरी (जीएस) म्हणून निवडून आले होते.[४][११] ते स्टुडंट कौन्सिलवर सलग तीन वर्षे निवडून गेले आणि विद्यापीठात तिसरे आले. लॉ कॉलेजमध्ये शिकत असताना ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धेत तसेच वाद-विवाद स्पर्धेत भाग घ्यायचे.[११]
त्यानंतर इ.स. २०१० मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठात एलएलएम करण्यासाठी प्रवेश घेतला होता. येथे त्यांचे प्रा. सुरेश माने हे एक सर होते.[१२] तेथे शिकत असतानाच इ.स. २०१० मध्ये मुंबईचा प्रतिनिधी म्हणून जनरल नॅशनल कोऑपरेशन डिबेट मध्ये त्यांनी भाग घेतला होता, ही स्पर्धा लखनऊमध्ये झाली होती. तेथे त्यांना "बेस्ट डिबेटर पुरस्कार" मिळाला.[१३] मुंबई विद्यापीठात कायद्याचे शिकत घेत असताना त्यांनी पर्यावरण विषय सुद्धा निवडला होता. विद्यापीठातील काही विद्यार्थांना एक गट बनवून एंगडे यांनी पर्यावरणाला नुकसान पोहोचवणाऱ्या कंपन्यांविरुद्ध भारतातील विविध उच्च न्यायालयांमध्ये पीआयएल (जनहित याचिका) टाकल्या होत्या.[१४] कारण पर्यावरण हा मानवाधिकार होता.[१४] यादरम्यान त्यांना शिष्यवृत्ती मंजूर झाली आणि ३१ जानेवारी २०१० रोजी ते लंडनला रवाना झाले.[१४] तिथे ते १७ महिने राहिले मग तेथून ते जिनिव्हा आणि नंतर दक्षिण आफ्रिकेत गेले.[२] ते हार्वर्ड केनेडी स्कूलला गेले. आफ्रिकेतल्या भारतीय स्थलांतरित कामगारांच्या स्थितीचा त्यांनी अभ्यास केला. आफ्रिकेतल्या विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळविणारा ते पहिले भारतीय दलित विद्यार्थी ठरले. ते संयुक्त राष्ट्रांच्या एका उपक्रमात काम करत आहेत.
उच्च शिक्षण व संशोधन
एंगडे यांनी आशिया, आफ्रिका, युरोप आणि उत्तर अमेरिका या चार खंडांमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांनी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले आहे. सध्या ते अमेरिकेतील बोस्टनमध्ये हार्वर्ड विद्यापीठात पोस्ट-डॉक्टरल फेलो म्हणजे संशोधक म्हणून काम करत आहे. जात, वर्णभेद, वंश हा सूरजच्या अभ्यासाचा विषय आहे. सध्या ते दलित आणि कृष्णवर्णीय अभ्यासाचा एक सिद्धान्त विकसित करण्यात सामील आहे.[१][२]
इ.स. २०११ ते २०१२ दरम्यान लंडन येथील बर्मिंगहॅम सिटी युनिवर्सिटीमध्ये एलएलएल ही कायद्याची पदवी मिळवली. येथे त्यांनी इन्व्हरमेंट लॉ, ह्यूमन लॉ यांचे अध्ययन केले आहे. शिक्षण चालू असतानाच संयुक्त राष्ट्रसंघात 'सेक्रेटरिएट इंटर्न' म्हणून त्यांची निवड झाली. त्यांच्यासोबत इतर पाच जणही निवडले गेले होते.[१५] त्यानंतर २०११-१२ दरम्यान ते स्वित्झर्लंडला होते, येथे त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मंत्रालयात तज्ज्ञांसोबत, प्रतिवेदकांसोबत आणि जगभरातल्या मानवाधिकार कायद्यासंदर्भात निर्णय घेणाऱ्या लोकांसोबत काम केले.[१५] संयुक्त राष्ट्रांत काम करत असताना त्यांनी दक्षिण आफ्रिकेत जाण्याचा निर्णय घेतला. तेथे जाऊन त्यांना शिक्षण घेण्याबरोबरच आफ्रिकेतली चळवळ समजून घ्यायची होती आणि त्यांना आंबेडकरी दलित चळवळ समजून सांगायची होती. वंचित समाजांची एकजूट झाली तर तेथे आश्रयदाते नसतील व सारे समान असतील असे त्यांना वाटते. त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गच्या विद्यापीठातून त्यांनी मानववंशशास्त्र पीएचडी मिळवली आहे. "South-South Migration: An ethnographic study of an Indian business district in Johannesburg" हा त्यांचा पीएचडी प्रबंधाचा विषय होता.[१६] आफ्रिकन विद्यापीठातून पीएचडी मिळवणारे ते पहिले दलित स्कॉलर आहेत.[१][२] दक्षिण आफ्रिकेत ते चार वर्ष राहिले तेथे त्यांनी १८ महिन्यांत पीएचडी पूर्ण केली होती.[१७] पीएचडी दरम्यान त्यांनी एक नवीन संकल्पना तयार केली जी आता "स्मार्टफोन माइग्रेशन" या शाखांमध्ये वापरली जाते.[१८] आफ्रिकेत त्यांनी ईपीडब्ल्यू साप्ताहिकात "कास्ट अमंगस्ट इंडियन्स इन आफ्रिका" हा लेख लिहिला. ते म्हणतात की बाबासाहेबांसारखा आदर्श प्रत्येकाला मिळायला हवा कारण तो तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही.[१९]
त्यानंतर इ.स. २०१५ ते हार्वर्डला गेले व सध्या तेथे सीनियर फेलो म्हणून कार्यरत आहेत. आंबेडकरी चळवळीतील दलित पँथर आणि बामसेफ यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव आहे.[२०] हार्वर्डला त्यांचे कार्यालय आहे ज्यात बाबासाहेब आंबेडकर, माल्कम एक्स, डब्ल्यूईबी, अँजेला डेव्हिस व कांशीराम यांचे फोटो आहेत. तसेच खूप पुस्तके सुद्धा आहेत.[१९] हार्वर्डला शिकत असताना त्यांनी नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांचा क्लास निवडला होता. २०१८ साली त्यांची व्यक्तिगत ओळख अमर्त्य सेन यांच्याशी झाली. ते दोघे बाबासाहेबांवर चर्चा करत असताना तेव्हा अमर्त्य सेन म्हणाले की "बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला ही त्यांची निवड अतिशय तर्कशुद्ध होती" तसेच ते (अमर्त्य सेन) स्वतः सुद्धा बौद्ध असल्याचे त्यांनी एंगडेंना सांगितले.[२१]
परदेशात जातीभेदाचा अनुभव
इंग्लंडमध्ये शिकत असताना इतर भारतीय विद्यार्थ्यांकडून त्यांना "दलित" म्हणून जातिभेदाचा अनुभव आला आहे. पायल तडवी आत्महत्या प्रकरणानंतर बीबीसी मराठीसोबत त्यांनी परदेशातही जात पाठ कशी सोडत नाही हा अनुभव मांडला होता. माझ्यासह अनेक विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या अशाप्रकारच्या त्रासातून जावे लागत असून सातासमुद्रापारही जात पिच्छा सोडत नाही असे एंगडे यांनी सांगितले आहे.[२][२२][२३]
लेखन
त्यांनी इ.स. २०१९ मध्ये 'कास्ट मॅटर्स' हे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक त्याच्या प्रकाशनाच्या तारखेनंतर एका आठवड्यात पुन्हा छापण्यासाठी गेले. अलीकडेच द हिंदूने प्रतिष्ठित "बेस्ट नॉनफिक्शन बुक्स ऑफ द डीकेड"च्या यादीमध्ये ते वैशिष्ट्यीकृत केले होते.[१][२][४]
'द रॅडिकल इन आंबेडकर' हे पुस्तक सूरजने आनंद तेलतुंबडे यांच्यासोबत इ.स. २०१८ मध्ये संपादित केले आहे. दलित, ब्लॅक, रोमा, बुराकु आणि जगभरातील स्थलांतरित यांना एकत्रित आणण्याचा त्याचा प्रयत्न आहे.[२]
बाबासाहेबांवर ते एक इंग्रजी चरित्र लिहीत आहेत.[१९]
व्यक्तिगत जीवन
एंगडे यांचे केस कुरळे आहेत आणि ते आफ्रिकन हेअर स्टाईल करतात, ज्याची प्रेरणा त्यांना अल्बर्ट आईन्स्टाईन आणि त्यांचे प्राध्यापक अजय स्कारीया यांच्याकडून मिळाली.[२१]
पुरस्कार व सन्मान
- सूरज यांचे भारताच्या सर्वोच्च साहित्य पुरस्कार "साहित्य अकादमी"साठी नामांकन करण्यात आले.[१]
- ते "डॉ. आंबेडकर सामाजिक न्याय पुरस्कार" (कॅनडा, २०१९) प्राप्तकर्ता[१]
- "रोहित वेमुला मेमोरियल स्कॉलर अवॉर्ड" (२०१८) प्राप्तकर्ता[१]
- १४ नोव्हेंबर २०२० रोजी ते साधना या मराठी साप्ताहिकाच्या मुखपृष्ठावर झळकले होते.
- जीक्यू इंडियाने २०२१ मधील २५ सर्वाधिक प्रभावशाली तरुण भारतीयांमध्ये डॉ. सूरज एंगडे त्यांना सूचीबद्ध केले आहे.[५][६][२४]
टीप
- ^ अनेक ठिकाणी सूरज एंगडे यांचे आडनाव "एंगडे" ऐवजी "येंगडे" लिहिलेले आढळते; दोन्ही शब्दांच्या उच्चारांमधील साधर्म्यामुळे हे घडलेले असू शकते. मात्र त्यांचे वास्तविक वा मूळ आडनाव "एंगडे" हे होय.
संदर्भ
- ^ a b c d e f g "About". scholar.harvard.edu.
- ^ a b c d e f g "आंबेडकरांना सगळे स्वीकारतात, पण त्यांच्या व्यापक दृष्टिकोनाला नाही: सूरज एंगडे" – www.bbc.com द्वारे.
- ^ "'वामपंथ और दक्षिणपंथ के ध्रुवीकरण की शिकार दलित राजनीति'" – www.bbc.com द्वारे.
- ^ a b c "रॉकस्टार' स्कॉलर!". Loksatta. 2019-08-17. 2021-02-13 रोजी पाहिले.
- ^ a b "Innovators, entertainers, disruptors, game changers: Meet GQ's Most Influential Young Indians". GQ India. 2021-02-14 रोजी पाहिले.
- ^ a b "Innovators, entertainers, disruptors, game changers: Meet GQ's Most Influential Young Indians". GQ India (इंग्रजी भाषेत). 2021-02-13 रोजी पाहिले.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ४३-४५.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ४८.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५०.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ४५.
- ^ a b c शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५१.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड,स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५२.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड,स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५१.
- ^ a b c शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५३.
- ^ a b शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५४.
- ^ Yengde, Suraj (7 मार्च, 2016). "South-south migration: an ethnographic study of an Indian business district in Johannesburg" – wiredspace.wits.ac.za द्वारे.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link] - ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५५.
- ^ Yengde, Suraj. ""Smartphone Migration" Emerging Lifestyle and Changing Habits of Indian Labor Migrants in Johannesburg". Social Transformations: Journal of the Global South. 2 (1): 3–33 – www.academia.edu द्वारे.
- ^ a b c शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५६.
- ^ शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५५-५६.
- ^ a b शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना: ५७.
- ^ "'परदेशी जाऊन बाबासाहेबांसारख्या पदव्या घेणार असे वाटले पण जातीने तिथेही पिच्छा सोडला नाही'" – www.bbc.com द्वारे.
- ^ "'देश छोड़ने पर भी जाति ने पीछा नहीं छोड़ा'" – www.bbc.com द्वारे.
- ^ "जीक्यू मॅगझिनच्या प्रभावशाली व्यक्तीत पहिल्यांदाच मराठवाड्याच्या युवकाला स्थान | eSakal". www.esakal.com. 2021-03-06 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- शिरसाठ, विनोद (१४ नोव्हेंबर २०२०). पाटील, सुहास (ed.). "नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका: सूरज एंगडे". साधना
- Send 10,000 Dalit students every semester to foreign universities: Suraj Milind Yengde
- रॉकस्टार’ स्कॉलर!, आफ्रिकेतल्या विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळविणारा तो पहिला भारतीय दलित विद्यार्थी. लोकसत्ता टीम | १७ ऑगस्ट २०१९
- Indian Express मधील सूरज एंगडे यांचे स्तंभलेखन