सुवादीव
मालदीवच्या अगदी दक्षिणेकडील टोकाला सुवादीव (Suvadive) नावाची अतिशय छोटी बेटे आहेत. या बेटांनी सन १९५९ साली अचानक स्वातंत्र्य पुकारले आणि 'सुवादीवच्या संयुक्त प्रजासत्ताका'ची स्थापना केली.
मालदीव हा देश क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या दोन्ही बाबतीत आशियातील सर्वात लहान देश आहे. पण या चिमुकल्या देशाच्या एका छोट्याशा भागाने ३ जानेवारी १९५९ रोजी बंड करून स्वातंत्र्याची घोषणा केली होती.
मालदीव बेटांच्या समूहातील सर्वात दक्षिणेकडील बेटांना व्यापारासाठी श्रीलंका आणि दक्षिण भारतातील बंदरांना भेट देणे सोयीचे होते. भारत, श्रीलंका आणि मालदीव हे सर्वच ब्रिटिश अधिपत्याखाली असताना हा व्यापार सुरळीत चालू होता. पण हे देश स्वतंत्र झाल्यानंतर मालदीवच्या मध्यवर्ती सरकारने अशा प्रत्यक्ष व्यापारावर बंदी घातली, व व्यापाराची सूत्रे माले या राजधानीत राहतील अशी व्यवस्था केली. दक्षिण मालदीवच्या बेटांनी प्रत्यक्ष व्यापार करू नये म्हणून मालदीव सरकारने तेथे आपले प्रतिनिधी पाठवले. यापैकी एका प्रतिनिधीने स्थानिक व्यापाऱ्यांवर अन्याय केल्याचे निमित्त झाले आणि बंडाला तोंड फुटले. परिस्थिती कशीबशी नियंत्रणाखाली येत होती, एवढ्यात मालदीवच्या मध्यवर्ती सरकारने होड्यांवर नवीन कर लागू केला, आणि दक्षिण मालदीव पुन्हा पेटले.
यादरम्यान, मालदीवमधील दुसरी दोन बेटे ब्रिटनला भाडेपट्ट्यावर देण्याबद्दल वाटाघाटी चालल्या होत्या. त्या प्रक्रियेत अडथळे आल्यामुळे ब्रिटिश सरकारचा मालदीवच्या मध्यवर्ती सरकारवर रोष ओढवला होता. दक्षिण मालदीवमधील आगीत ब्रिटिशांनी तेल ओतले, आणि तेथील स्थानिक नेत्यांनी "सुवादीवचे संयुक्त प्रजासत्ताक" या नावाने स्वतंत्र राष्ट्राची घोषणा केली. सुवादीवचा ध्वज मिरवणाऱ्या नावा भारतात आणि श्रीलंकेत व्यापार करू लागल्या.
पण हे स्वातंत्र्य फार काळ टिकणार नव्हते. मालदीवच्या सरकारने ब्रिटनशी बोलणी केली, आणि ब्रिटनने सुवादीवला दिलेला पाठिंबा काढून घेतला. मालदीव सरकारने आपले शस्त्रसज्ज जहाज पाठवून मालदीवच्या दक्षिणेकडील बेटांवर पुन्हा कब्जा केला. सुवादीवच्या अध्यक्षाने सेशेल्सला पलायन केले. २३ सप्टेंबर १९६३ रोजी 'सुवादीवचे संयुक्त प्रजासत्ताक' संपले.