Jump to content

सुमित्रा नायक

सुमित्रा नायक (८ मार्च, २०००:दुबुरी, ओडिशा - ) ही एक ओडिशाच्या जाजपूर येथील महिला रग्बी खेळाडू आहे.

२०१९ च्या आशियाई महिला चॅम्पियनशिपमध्ये तिने सिंगापूरविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात अचूक पेनल्टी किक मारत भारताला कांस्यपदक मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली होती.


वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी

सुमित्राचा जन्म ८ मार्च २०००मध्ये ओडिशाच्या जाजपुर जिल्ह्यातील दुबुरी गावात झाला. ती अगदी लहान असताना, तिच्या आईने पतीच्या जाचाला कंटाळून मुलांबरोबर भुवनेश्वरला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. तिच्या वडिलांनी एकदा तर सर्व कुटुंबाला घरात कोंडून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यात सर्वजण बचावले. मुलांचे पालनपोषण करण्यासाठी तिच्या आईला लोकांच्या घरात काम करावे लागले.(१)

भुवनेश्वरमध्ये सुमित्रा कलिंग सामाजिक विज्ञान संस्थेत (केआयएसएस) दाखल झाली, जिथे आदिवासी मुलांना मोफत शिक्षण व क्रीडा प्रशिक्षण पुरविले जाते.(१) सध्या ती या संस्थेत पदवीची विध्यार्थिनी आहे.(३)

सुमित्राची रग्बीशी ओळख २००८ मध्ये याच शिक्षण संस्थेच्या मैदानावर झाली, जेव्हा तिला एक गट एका अंडाकृती चेंडूबरोबर खेळताना पाहून आश्चर्य वाटले. लहानग्या सुमित्राला तो चेंडू अगदी डायनासोरच्या अंड्यासारखा वाटला. तिने लवकरच हा खेळ स्वतः खेळण्यास सुरुवात केली आणि त्यात ती चांगली कामगिरी करू लागली. कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी ब्यूटी पार्लर चालवणारी तिची आई सुरुवातीला सुमित्राला रग्बी खेळू देण्यास टाळाटाळ करत होती, कारण तिने पाहिले होते की कसे रग्बीचे खेळाडू एकमेकांवर पडतात. सुमित्राने तिच्या आईला पटवून दिले की, अशा प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते.(१)

सुमित्रा आज केआयएसएस तसेच तिच्या गावातील मुलींना रग्बी शिकवते. तिने पुण्यात एक टेड टॉकही दिला आहे.(३)

व्यावसायिक कारकीर्द

केआयएसएस येथे प्रशिक्षक रुद्रकेश जेना यांनी सुमित्राला प्रशिक्षण दिले. २०१२मध्ये तिच्या राज्यस्तरीय पदार्पणानंतर तिने २०१४ साली १३ वर्षांखालील महिला रग्बी विश्वचषकात भाग घेतला. त्यांनतर राष्ट्रीय शालेय खेळ आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्येही ती सहभागी झाली. २०१६ च्या दुबई आशियाई गर्ल्स रग्बी सेव्हन (१८ वर्षाखालील) मध्ये भारताच्या कांस्यपदक विजयात ती महत्त्वाची ठरली. २०१८ मध्ये तिला भारताच्या १८ वर्षांखालील रग्बी संघाची कर्णधार नेमण्यात आले. (4)

तिचा मोठा क्षण आला जून २०१९मध्ये, जेव्हा भारताच्या फिफ्टीन्स फॉरमॅटमधील पहिल्या आंतराष्ट्रीय विजयात तिची भूमिका महत्त्वाची ठरली. सिंगापूरविरुद्धच्या या अटीतटीच्या सामन्यात सुमित्राच्या पेनल्टी किकमुळे आशियाई रग्बी महिला स्पर्धेत भारताला कांस्यपदक जिंकता आले. (2)

ऑगस्ट २०१९मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई रग्बी सेव्हन्स करंडक स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या ज्येष्ठ संघात ती होती. त्याच महिन्यात लाओस येथे आशियाई रग्बी अंडर-२० सेव्हन्स मालिकेत ओडिशाच्या या कन्येने भारतीय संघाचे नेतृत्व केले.(3)

आशिया रग्बी अनस्टॉपेबल मीटसाठी सुमित्राची भारतीय संघात निवड झाल्याबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी तिचे अभिनंदन केले होते.(4)

संदर्भ

https://sportstar.thehindu.com/rugby/asian-rugby-women-championship-india-wins-[permanent dead link] third-beats-singapore-sumitra-nayak-penaltyvahbiz-bharucha-world- cup/article28109526.ece [2]

वैयक्तिक माहिती

पूर्ण नाव: सुमित्रा नायक

नागरिकत्व: भारतीय

८ मार्च २०००

जन्म स्थान: दुबरी गाव, जाजपुर जिल्हा, ओडिशा

खेळ: रग्बी

प्रशिक्षक: रुद्रकेश जेना, नासिर हुसेन

पदके

प्रतिनिधित्व - भारत

रौप्यः२०१९ आशियाई रग्बी सेव्हन्स ट्राॅफी, जकार्ता

कांस्यः२०१९ आशियाई रग्बी महिला अजिंक्यपद, मनिला

कांस्यः२०१९ आशियाई गर्ल्स रग्बी सेव्हन्स (अंडर-१८) दुबई