Jump to content

सुमन दत्तात्रेय महादेवकर

सुमन महादेवकर (इ.स. १९३३ - ) या एक मराठीतील संस्कृताभ्यासक लेखिका आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव दत्तात्रेय बाळकृष्ण महादेवकर आणि आई आनंदीबाई महादेवकर आहे.

जन्म आणि बालपण

यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांनी सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर तिथल्याच राणी सरस्वतीदेवी कन्याशाळेत ४/५ वर्षे नोकरी करून त्या पुण्यात आल्या.

लेखनिकेची नोकरी

पुण्यातील एक महापंडित न्यायरत्न धुंडीराजशास्त्री विनोद यांना त्यांच्या पुस्तकांच्या प्रकाशनाकरता लेखनिक म्हणून एका मदतनीसाची गरज होती. महादेवकरांनी ते काम पत्करले. धुंडीराजशास्त्री व त्यांची पत्नी मैत्रेयी विनोद यांच्या सहवासाचा महादेवकरांवर चांगला परिणाम झाला. १९५९ ते १९६९ अशी १० वर्षे त्या लेखनिक म्हणून काम करत होत्याच, पण १९६९मध्ये धुंडीराजशास्त्री वारल्यावरही महादेवकरांनी त्यांचे काम पुढे काही वर्षे सुरू ठेवले.

वेदान्ताचे शिक्षण

लेखनिकाचा व्यवसाय केल्याने सुमनताई महादेवकरांचा संस्कृतचा व्यासंग वाढला. परिणामी १९७५ मध्ये त्यांनी 'वेदान्त' या विषयात 'एम.ए.' पूर्ण केले. या वेळी यशवंतराव मराठे नावाचे विद्वान गृहस्थ सदाशिव पेठेतील स्वतःच्या घरातच न्यायशास्त्र व वेदान्ताचे इतर ग्रंथ शिकवीत असत. वेदान्त शिकण्यासाठी न्यायशास्त्र येणे गरजेचे असल्यामुळे त्या गुरुगृही महादेवकर सतत ४/५ वर्षे जात राहिल्या.

गणेशशास्त्री जोशी यांची सदाशिव पेठेतील, नरसिंहाच्या देवळात ज्ञानेश्वरी, उपनिषदे, अमृतानुभव यांवरची प्रवचने महादेवकरांनी ऐकली. कुरुंदकर, सहजयोग परंपरेचे काका महाराज करमरकर व रत्‍नागिरीचे पुरुषोत्तम शास्त्री फडके यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. अशा पूर्वतयारीमुळे महादेवकरांना वेदान्त समजून घेणे शक्य झाले.

लेखन

सुमनताई महादेवकर यांचे लेख विविध वृत्तपत्रे आणि मासिके यांमधून प्रकाशित होत असतात. ’संतकृपा’या मासिकाच्या त्या सहसंपादक होत्या.

अन्य उपक्रम

वयाच्या ८१व्या वर्षी सुमन महादेवकर या म्हैसूरजवळील मैलकोठे या गावी जाऊन १२ तास अभ्यास व लेखन करतात. लेखनाशिवाय त्या भगवद्गीता, श्रीमद्भागवत, योगवासिष्ठ आदी विषयांवर प्रवचने आणि व्याख्याने देतात. जागतिक तत्त्वज्ञानपरिषदा व अन्य चर्चासत्रांत त्या नित्यनियमाने भाग घेतात. सुमारे २५ वर्षे सुमनताई पुण्याच्या सिंहगड रोडवरील शारदामठात संस्कृत शिकविण्यासाठी जात आहेत.

सुमन महादेवकरांची ग्रंथसंपदा

  • सुबोध योगवासिष्ठ (मूळ ३२००० श्लोकी संस्कृत ग्रंथाचे ८०० पानांत मराठी रूपांतर)
  • महर्षी विनोद जीवनदर्शन
  • धवलगिरीची वाटचाल
  • व्यासपौर्णिमा व्यासदर्शन
  • सुभाषितकोश
  • केसरी शताब्दीसारांशाची विषयसूची
  • तीन-खंडी नरसिंहकोशातल्या संपूर्ण नरसिंहपुराणाचा मराठी अनुवाद
  • अनिरुद्धाचार्यकृत ’स्तोत्ररत्न’ व ’श्रीस्तुति’ वरील हिंदी टीकेचे संपादन
  • ऋषिविज्ञान संशोधनावरील लेखांचे संपादन
  • स्वामिनारायण पंथाच्या ’सत्संगी जीवन’ ग्रंथातील दोन खंडांचा इंग्रजी अनुवाद
  • गोपालानंद मुनी यांच्या संस्कृत गीताभाष्याचा इंग्रजीत अनुवाद, वगैरे.

पुरस्कार

  • सुबोध योगवासिष्ठ या ग्रंथासाठी सुमन महादेवकरांना महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभा, औरंगाबादची एकनाथ संशोधन संस्था व आचार्य किशोर व्यास यांचेे गुरुकुल प्रतिष्ठान अशा तीन मान्यवर संस्थांचे पुरस्कार मिळाले आहेत.
  • चांदोडच्या श्रीवैष्णवपीठाचे प्रमुख अनिरुद्धाचार्य यांच्याकडून वेदान्तवागीश ही उपाधी.
  • महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार