Jump to content

सुधीर मोघे

सुधीर मोघे


जन्म८ फेब्रुवारी, इ.स. १९३९
किर्लोस्करवाडी
मृत्यू१५ मार्च, इ.स. २०१४
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे, महाराष्ट्र
कार्यक्षेत्रसाहित्य, गीतरचना
राष्ट्रीयत्वभारतीय
भाषामराठी, हिंदी
कारकीर्दीचा काळइ.स. १९७३ - इ.स. २०१४
प्रमुख चित्रपटकळत नकळत, चौकट राजा
प्रमुख टीव्ही कार्यक्रमडॉलर बहु, हसरतें , स्वामी
पुरस्कारमहाराष्ट्र राज्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार
पत्नीडॉ. शुभदा मोघे
अधिकृत संकेतस्थळhttp://sudheermoghe.com/

सुधीर मोघे (जन्म : किर्लोस्करवाडी, ८ फेब्रुवारी, इ.स. १९३९ - पुणे, महाराष्ट्र, १५ मार्च, इ.स. २०१४) हे एक मराठी कवी, गीतकार व संगीतकार होते..

सुधीर मोघे हे पुण्यातील स्वरानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष होते. स्वरानंदच्या सर्व कार्यक्रमांचेही ते अध्यक्ष असत. नाट्य‌अभिनेते श्रीकांत मोघे हे सुधीर मोघे यांचे थोरले बंधू.

मूळ कवी पण काव्य, गीत- चित्रपटगीत लेखन, ललित लेखन, पटकथा-संवाद लेखन, सुगम गायन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण आणि दिग्दर्शन या माध्यमांतून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, अक्षर प्रकाशन इत्यादी क्षेत्रात सुधीर मोघे यांचा संचार होता. ते एक उत्तम चित्रकार होते. त्यांच्या चित्रांची प्रदर्शनेही भरली होती. ’विमुक्ता’ या चित्रपटाद्वारे ते चित्रपट दिग्दर्शक बनणार होते, पण त्या चित्रपटाचे पहिले शूटिंग होण्याआधीच सुधीर मोघे निवर्तले.

जीवन

सुधीर मोघे मूळचे किर्लोस्करवाडीचे. ते इ.स. १९६८-६९ च्या सुमारास पुण्यात आले. त्या वेळी ते ’किर्लोस्कर’ कारखान्यात नोकरी करत होते. १९७१ मध्ये त्यांनी ’स्वरानंद’ सादर करीत असलेल्या ’आपली आवड’ या रंगमंचीय कार्यक्रमात निवेदक म्हणून काम करावयास सुरुवात केली. निवेदक म्हणून सुधीर मोघे यांची स्वतःची खास ’स्टाइल’ होती. स्वतः जातिवंत कवी असल्याने, कधी स्वतःचीच कविता, तर कधी एखाद्या नामवंत कवीची कविता वापरून ते प्रत्येक गाण्याची अप्रतिम काव्यातून ओळख करून द्यायचे.

’कविता पानोपानी’ या रंगमंचीय कार्यक्रमात सुधीर मोघे हे कागद हातात न घेता, ध्वनिप्रकाश योजनेच्या साहाय्याने स्वतःच्या मराठी कविता, गीते सादर करीत असत. ’राजा शिवछत्रपती’ या चित्रपटापासून सुधीर मोघे गीतकार झाले. त्या चित्रपटांत त्यांनी एक भूमिकाही केली होती. ’समिंदरा समिंदरा माझ्या भाग्याचा मुहूर्त झाला’ अशी त्यां चित्रपटातील एका गाण्याची ओळ होती. आणि खरोखरच त्यांचा चित्रपटातून त्यांच्या भाग्याचा उदय झाला, आणि पुढील आयुष्यात त्यांनी अनेक चित्रपटांची गाणी लिहिली.

प्रकाशित साहित्य

कविता संग्रह

  1. आत्मरंग
  2. गाण्याची वही
  3. पक्षांचे ठसे - ३हून अधिक आवृत्त्या
  4. लय - एकाहून अधिक आवृत्त्या
  5. शब्द धून
  6. स्वतंत्रते भगवती

गद्य

  1. अनुबंध
  2. कविता सखी (लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीत प्रसिद्ध झालेले सदर लेखन)
  3. गाणारी वाट - एकाहून अधिक आवृत्त्या
  4. निरांकुशाची रोजनिशी- एकाहून अधिक आवृत्त्या

चित्रपट गीतकार

सुमारे ५०हून अधिक चित्रपटांचे गीतलेखन

काही निवडक नावे

  • राजा शिवछत्रपती
  • आत्मविश्वास
  • एक डाव भुताचा
  • कळत नकळत
  • चौकट राजा
  • जानकी
  • पुढचं पाऊल
  • राजू
  • लपंडाव
  • शापित
  • सूर्योदय
  • हा खेळ सावल्यांचा
  • लक्ष्मीची पावले
  • गोष्ट धमाल नाम्याची
  • चोराच्या मनात चांदणे

सुधीर मोघे यांनी लिहिलेली रसिकप्रिय भावगीते आणि चित्रपट गीते

  • अरूपास पाहे रूपी
  • आदिमाया अंबाबाई
  • आला आला वारा
  • एक झोका चुके काळजाचा
  • एकाच ह्या जन्मी जणू
  • ॐकार अनादि अनंत अथांग
  • कधी गौर बसंती
  • काजल रातीनं ओढून नेला
  • कुण्या देशीचे पाखरू
  • गुज ओठांनी ओठांना
  • गोमू संगतीनं माझ्या तू
  • घर दोघांचे घरकुल पाखरांचे
  • जरा विसावू या वळणावर
  • झुलतो बाई रास-झुला
  • तपत्या झळा उन्हाच्या
  • तिथे नांदे शंभू
  • तूच मायबाप बंधू
  • त्या प्रेमाची शपथ तुला
  • दयाघना का तुटले
  • दिसलीस तू फुलले ॠतू
  • दिसं जातील दिसं येतील
  • देवा तुला शोधू कुठं
  • दृष्ट लागण्याजोगे सारे
  • नवा डाव चल मांडायाला
  • निसर्गासारखा नाही रे
  • फिटे अंधाराचे जाळे
  • बारा पुण्यक्षेत्रे झाली बारा ज्योतिर्लिंगे
  • भन्‍नाट रानवारा मस्तीत शीळ (संगीत स्वतंचेच)
  • भेटशील केव्हा माझिया जिवलगा (संगीत स्वतःचेच)
  • मन मनास उमगत नाही
  • मन लोभले मनमोहने
  • मना तुझे मनोगत
  • मनी जे दाटले
  • माझे मन तुझे झाले (संगीत स्वतःचेच)
  • माय भवानी तुझे लेकरू
  • मी फसले ग फसले
  • मी सोडुन सारी लाज
  • मंदिरात अंतरात तोच
  • रात्रीस खेळ चाले
  • विषवल्‍ली असुनी भवती
  • विसरू नको श्रीरामा
  • शंभो शंकरा करुणाकरा
  • सखि मंद झाल्या तारका
  • सजणा पुन्हा स्मरशील ना
  • सप्‍तस्वरांनो लय
  • सूर कुठूनसे आले अवचित
  • सांग तू माझाच ना
  • सांज ये गोकुळी सावळी सावळी
  • हे जीवन सुंदर आहे
  • हे नायका जगदीश्वरा

सुधीर मोघे यांनी संगीत दिलेली अन्य गीते

  • अज्ञात तीर्थयात्रा
  • भन्‍नाट रानवारा मस्तीत शीळ
  • भेटशील केव्हा माझिया जिवलगा
  • माझे मन तुझे झाले
  • रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा (कवी सुरेश भट)

संगीत दिग्दर्शन

  1. कशासाठी प्रेमासाठी : मराठी चित्रपट
  2. समर्थ छंद, समर्थ घुन, तुझियाविना : अल्बम (३)
  3. सूत्रधार : हिंदी चित्रपट
  4. स्वामी, अधांतरी, नाजुका : मराठी दूरदर्शन मालिका (३)
  5. हसरतें, डॉलर बहू, शरारतें : हिंदी मालिका (३)


रंगमंचावरील कार्यक्रम: संकल्पनां, संहिता निवेदन आणि दिग्दर्शन

  • आपली आवड
  • "उत्तररात्र" रॉय किणीकर-काव्यप्रयोग
  • कविता पानोपानी (दीड ते दोन तासांचा एकपात्री रंगमंचीय कार्यक्रम)
  • कविता सखी - काव्यमैफिल
  • गाण्यांच्या गोष्टी
  • नक्षत्रांचे देणे : कुसुमाग्रज यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम
  • नक्षत्रांचे देणे : शांता शेळके यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रम
  • नक्षत्रांचे देणे : सुधीर फडके यांचे संगीत असलेल्या गाण्यांचा कार्यक्रम
  • मंतरलेल्या चैत्रबनात
  • माडगुळ्याचे गदिमा
  • मी विश्वाचा
  • स्मरणयात्रा
  • स्वतंत्रते भगवती -स्वातंत्र्याच्या रौप्य महोत्सवासाठी लिहिलेल्या गीतांचा कार्यक्रम

लघुपट निर्मिती, संहिता व दिग्दर्शन

  • Unforgettable … Unusual : संगीतप्रेमी कविमनाला भावलेल्या, ५० ते ७० च्या दशकातील श्रवणीय हिंदी गीतांचा मागोवा घेणारा लघुपट
  • आधी बीज एकले : किर्लोस्कर उद्योगसमूहाच्या शतकपूर्ती निमित्ताने त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लघुपट ( संहिता व दिग्दर्शन )
  • ज्योत्स्ना अमृतवर्षिणी : ख्यातनाम गायिका , संगीत अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांच्या जन्म शताब्दीनिमित्त त्यांच्या जीवनावरील लघुपट (दिग्दर्शन)
  • परिवर्तन : पश्चिम विकास महामंडळातर्फे श्रीमती लीना मेहेंदळे यांनी कार्यान्वित केलेल्या देवदासी पुनर्वसन प्रकल्पावर आधारित लघुपट
  • या सम हा : पु ल देशपांडे यांच्या ७५व्या वर्षानिमित्त झालेल्या गौरव सोहोळ्यात प्रदर्शित १ तासाचा लघुपट ( संहिता व दिग्दर्शन)

पुरस्कार आणि सन्मान

  1. सोमण परिवार आणि कुटुंबीयांतर्फे शब्दस्वरप्रभू ’अजित सोमण’ पुरस्कार - (२० ऑगस्ट २०१३).
  2. पहिल्या वर्षी सर्वोत्कृष्ट गीतकार अल्फा गौरव पुरस्कार
  3. 'आरसपानी : निवडक सुधीर मोघे' नावाचे एक पुस्तक निघाले आहे, संदीप खरे त्याचे संपादक आहेत. .
  4. 'मराठी कामगार साहित्य परिषदेतर्फे 'गदिमा पुरस्कार' - २००६
  5. गदिमा प्रतिष्ठानातर्फे चैत्रबन पुरस्कार
  6. 'महाराष्ट्र साहित्य परिषदे'चा 'कविवर्य ’ना.घ. देशपांडे' पुरस्कार - २००६
  7. पहिल्या वर्षी सर्वोत्कृष्ट गीतकार मटा गौरव पुरस्कार
  8. महाराष्ट्र राज्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार ४ वेळा
  9. 'महालक्ष्मी ' पुरस्कार - २००६
  10. साहित्यकार 'गो. नी. दांडेकर 'स्मृती पुरस्कार - मृण्मयी पुरस्कार २००८
  11. ’रोटरी क्लब’, डोंबिवली यांच्यातर्फे ‘व्होकेशनल एक्सलन्स’ पुरस्कार - (२०११-१२)
  12. 'दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान ' - प्रथम वर्ष 'शांता शेळके 'पुरस्कार - हस्ते श्रीमती लता मंगेशकर २००७
  13. श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्यातर्फे कृतज्ञता पुरस्कार
  14. सूरसिंगार पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार २ वेळा