सुधाकर भगवानराव देशमुख
डॉ. सुधाकर भगवानराव देशमुख ( इ.स. १९४४; निधन : औरंगाबाद, १९ मे,इ.स. २०१६) हे उदगीरमध्ये राहणारे एक डॉक्टर, विचारवंत, इतिहासतज्ज्ञ आणि लेखक होते. डॉ. देशमुख यांचे वैद्यकीय शिक्षण औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले होते.
इतिहास, तत्त्वज्ञान, साहित्य विषयांवर मोलाचेे लेखन करणारे डॉ. सुधाकर देशमुख यांचे वैद्यकीय क्षेत्रात विशेष योगदान होते. ते २६ जानेवारी १९७०रोजीे उदगीरचे सर्जन झाले.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या उदगीर शाखेचे ते अध्यक्ष होते. रोटरी क्लब ऑफ उदगीर, सहयोग अर्बन को. ऑप. बँक, आयएमए या संस्थांचेही अध्यक्षपद भूषवले.
डॉ. सुधाकर देशमुख यांनी पत्नीच्या स्मरणार्थ इ.स. १९८३ सालापासून उज्ज्वला देशमुख व्याख्यानमाला सुरू केली. या व्याख्यानमालेत अनेक नामवंत वक्त्यांनी हजेरी लावली आहे. उदगीरातील वाचक चळवळीला समृद्ध करण्यात डॉ. देशमुख यांचा सिंहाचा वाटा आहे.
त्यांनी लिहिलेल्या दोन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचा वैचारिक ग्रंथासाठीचा राज्यस्तरीय पुरस्कार व महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे.
पुस्तके
- उदगीरचा इतिहास
- प्रतिभा आणि सर्जनशीलता
- मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास
- राष्ट्र आणि राष्ट्रवाद (महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार,डिसेंबर २००९)
- लातूर जिल्ह्यातील ग्रामनामांचा अभ्यास
- वीरशैव तत्त्वज्ञान, आदी