सुंदरी (वाद्य)
सुंदरी हे सुषिर-लोकवाद्य गटातील एक वाद्य आहे. हे ओठांनी फुंकून वाजवण्याचे म्हणजे ओष्ठस्वनित असे सनईसदृश वाद्य आहे. सुंदरीची रचना व वादन पद्धती सनईसारखीच असते.[१]
इतिहास
सन १९२२-२३ मध्ये अक्कलकोटला संस्थानिक महाराज फत्तेसिंह भोसले यांनी भव्य राजवाडा आणि शस्त्रास्त्रांचा विलक्षण संग्रह असलेले भव्य शस्त्रागार उभारले. त्यांच्या राज्यारोहणाच्या प्रसंगी आसपासच्या परिसरात कुणी सनईवादक आहे का, याचा शोध केला गेला. त्यावेळी उपजीविकेसाठी सोलापूरला येऊन राहिलेले सनई वादक बाबूराव जाधव यांना बोलावलं. पण महाराजांना सनईपेक्षाही मंजूळ वाजणारे वाद्य असावे असे वाटत होते. त्या काळात तसे वाद्य नव्हतेच. सनईपेक्षा लहान आणि मंजुळ वाजणारे वाद्य शोधण्याचा महाराजांनी आदेश दिला. त्या दरम्यान सोलापूरच्या गड्डा यात्रेत जाधव यांना लाकडाचे पिपाणीसारखे एक लाकडी खेळणे सापडले. त्याला ताडाची पिपाणी जोडली. त्याला सहा स्वर होते, त्यात निषाद जोडला आणि सनई पेक्षा लहान आणि मधुर आवाजाचे एक वाद्य तयार झाले. अक्कलकोटच्या कार्यक्रमात बाबूराव जाधव यांनी ते ताला-सुरात वाजवले. महाराजांना ते खुप आवडले. महाराजांनी विचारलं हे कोणतं वाद्य आहे. त्यावेळी जाधव यांनी सांगितलं हे नवीन वाद्य बनवलं आहे. अजून याला नाव ठेवलं नाही. महाराज म्हणाले, हे वाद्य खुप सुंदर वाजत आहे. याचं नाव सुंदरी ठेवा. तेव्हा पासून बाबूराव जाधव यांच्या कल्पनाशक्तीतून निर्माण झालेल्या या सुंदर वाद्याला सुंदरी हे नाव पडलं. आणि आज सुंदरी या वाद्याने जगभर नावलौकिक मिळवला. खैर किंवा सुपारीच्या लाकडापासून सुंदरी बनवली जाते. लाकडाच्यामध्ये स्टीलची नळी घालून त्या "जिव्हाळ्या"वर ताडाच्या झाडापासून बनवलेली "फुंक" जोडली जाते. अशी आजची सुंदरी हे वाद्य बनवले जाते. अशी माहिती सुंदरी वादक कपिल जाधव यांनी दिली.[२]
परंपरा
सोलापूरच्या जाधव परिवारात बाबूराव जाधव यांच्यापासून सुंदरी या वाद्याची परंपरा सुरू झाली. सुंदरी वादकांची चौथी पिढी सध्या कार्यरत आहे. बाबूराव जाधव यांचे सुपुत्र सिद्राम जाधव, तिसऱ्या पिढीत नागनाथ जाधव, मारुती जाधव, हिरालिंग जाधव, भीमण्णा जाधव, बलभीम जाधव आणि आता चौथ्या पिढीत अमोल आणि कपिल जाधव हा वारसा पुढे चालवत आहेत. सुंदरी वादनाचा महाराष्ट्र शासन, केंद्र शासन यांनी गौरव केला आहे. सुंदरी वादनाचे देशभर कार्यक्रम होत आहेत. सांस्कृतिक क्षेत्रात सुंदरी वाद्याचा नावलौकिक वाढतच आहे. धार्मिक उत्सव, सांस्कृतिक उत्सव, जयंती, पुण्यतिथी, लग्न सोहळा, आनंद सोहळा, अशा ठिकाणी सुंदरी वादनाचे कार्यक्रम होत असतात. सध्या सुंदरीचा आवाज नाटकासाठी, चित्रपटासाठी पार्श्वसंगीत म्हणून मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे.[३]
चित्रदालन
- सुंदरी वादन
- सुंदरी वादन
संदर्भ
- ^ "सुंदरी". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2019-12-20 रोजी पाहिले.
- ^ "...या अद्भुत वाद्याचे नाव आहे "सुंदरी"". सकाळ. 2019-12-20 रोजी पाहिले.
- ^ "होलार समाजाचे वाजप | थिंक महाराष्ट्र!". thinkmaharashtra.com. 2019-12-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2019-12-20 रोजी पाहिले.