सीलम
तारकासमूह | |
सीलम मधील ताऱ्यांची नावे | |
लघुरुप | Cae |
---|---|
प्रतीक | छिन्नी |
विषुवांश | ०४h १९.५m ते ०५h ०५.१m[१] |
क्रांती | −२७.०२° ते −४८.७४°[१] |
चतुर्थांश | एसक्यू१ |
क्षेत्रफळ | १२५ चौ. अंश. (८१वा) |
मुख्य तारे | ४ |
बायर/फ्लॅमस्टीड तारे | ८ |
ग्रह असणारे तारे | १ |
३.००m पेक्षा तेजस्वी तारे | ० |
१०.०० pc (३२.६२ ly) च्या आतील तारे | ० |
सर्वात तेजस्वी तारा | α Cae (४.४५m) |
सर्वात जवळील तारा | एचडी ३०८७६ (५७.८६ ly, १७.७५ pc) |
मेसिए वस्तू | ० |
उल्का वर्षाव | १ |
शेजारील तारकासमूह | पारावत शशक यमुना कालयंत्र असिदंष्ट चित्रफलक |
+४०° आणि −९०° या अक्षांशामध्ये दिसतो. जानेवारी महिन्यात रात्री ९:०० वाजता सर्वोत्तम दिसतो. |
सीलम हा दक्षिण खगोलातील एक तारकासमूह आहे. १७५० मध्ये निकोला लुई दे लाकाय या फ्रेंच खगोलशास्त्रज्ञाने याचा शोध लावला. याचा आधुनिक ८८ तारकासमूहांमध्ये समावेश करण्यात आला आहे. सीलम (Caelum) या शब्दाचा अर्थ लॅटिन भाषेमध्ये छिन्नी असा होतो. हा आठवा सर्वात लहान तारकासमूह आहे.
वर्णन
सीलमच्या दक्षिणेला असिदंष्ट आणि चित्रफलक, पूर्वेला कालयंत्र आणि यमुना, उत्तरेस शशक आणि पश्चिमेला पारावत हे तारकासमूह आहेत. हा तारकासमूह खगोलावरील फक्त १२५ चौरस अंशाचा भाग व्यापतो. हा ८८ तारकासमूहांमध्ये आकाराच्या क्रमवारीमध्ये ८१वा आहे. हा मुख्यत: दक्षिण आकाशामध्ये दक्षिण गोलार्धातील उन्हाळ्यामध्ये चांगला दिसतो आणि ४१° उत्तर अक्षांशाच्या दक्षिणेकडील सर्व निरीक्षकांना वर्षातील काही दिवस पाहता येऊ शकतो.[२][२]
सीलम हा तारकासमूह १२ भुजांचा बहुभुज असून याच्या सीमा युजिन डेलपोर्टे यांनी १९३० मध्ये निश्चित केल्या. सीमा विषुवांश ०४ता १९.५मि आणि ०५ता ०५.१मि, आणि क्रांति −२७.०२° आणि −४८.७४° यामध्ये आहेत.[१] इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने या तारकासमूहासाठी १९२२ मध्ये “Cae” या तीन अक्षरी लघुरूपाचा अवलंब केला.[३]
वैशिष्ट्ये
तारे
सीलममध्ये एकाही ताऱ्याची दृश्यप्रत ४ पेक्षा कमी नाही आणि फक्त दोन ताऱ्यांची दृश्यप्रत ५ पेक्षा कमी आहे. लाकायने १७५६ साली सहा ताऱ्यांना बायर नावे दिली होती. त्याने त्यांना एप्सिलॉन (ε ) वगळता अल्फा (α ) ते झीटा (ζ ) अशी नावे दिली होती.[४]
सीलममधील अल्फा सीली हा सर्वात तेजस्वी तारा एक द्वैती तारा आहे. त्यामध्ये एक एफ-प्रकारचा, ४.४५ दृश्यप्रतीचा मुख्य अनुक्रम तारा आणि दुसरा १२.५ दृश्यप्रतीचा लाल बटू तारा आहे. हे तारे पृथ्वीपासून २०.१७ पार्सेक (६५.८ प्रकाशवर्षे) अंतरावर आहेत.[५][६] या तारकासमूहात बीटा सीली हा आणखी एक एफ-प्रकारचा, ५.०५ दृश्यप्रतीचा तारा पृथ्वीपासून २८.६७ पार्सेक (९३.५ प्रकाशवर्ष) अंतरावर आहे.
समूहातील डेल्टा सीली हा आणखी एक ५.०५ दृश्यप्रतीचा तारा आहे. पण हा तारा पृथ्वीपासून २१६ पार्सेक (७०० प्रकाशवर्ष) अंतरावर आहे.[७]
आरआर सीली हा २०.१३ पार्सेक (६५.७ प्रकाशवर्ष) अंतरावरील द्वैती तारा सीलममधील पृथ्वीपासून सर्वात जवळील ताऱ्यांपैकी एक आहे.[८] या द्वैती प्रणालीमध्ये एक अंधुक लाल बटू आणि एक श्वेत बटू तारा आहे.[९] ही प्रणाली पृथ्वीपासून जवळ असूनसुद्धा याच्यातील घटक अंधुक असल्यामुळे याची दृश्यप्रत १४.४ आहे.[८] त्यामुळे लहान दुर्बिणीतून हे तारे दिसत नाहीत. सन २०१२ मध्ये यामध्ये एका भव्य ग्रहाचा शोध लागला आणि आणखी एक खस्थ वस्तू असल्याचा पुरावा मिळाला आहे.[१०] ही प्रणाली तिचा कोनीय संवेग गमावत आहे ज्यामुळे काही काळाने लाल बटू ताऱ्याकडून श्वेत बटू ताऱ्याकडे पदार्थ वहन होईल. यामुळे अंदाजे ९ ते २० अब्ज वर्षांनी याचे रूपांतर प्रलयंकारी चलताऱ्यामध्ये होईल.[११]
दूर अंतराळातील वस्तू
सीलमचा आकार कमी असल्याने व तो आकाशगंगेच्या प्रतलापासून लांब असल्याने त्याच्यामध्ये दूर अंतराळातील वस्तूंचा अभाव आहे. त्याच्यामध्ये एकही मेसिए वस्तू नाही.
खगोलशास्त्रज्ञांचे लक्ष वेधणारी सीलम मधील एक गोष्ट म्हणजे एचई ०४५०-२९५८ ही असामान्य सेफर्ट दीर्घिका. सुरुवातीला फवारे निर्माण करणारी यजमान दीर्घिका सापडत नसल्याने फवारे आपोआप निर्माण होत आहेत असे वाटले.[१२] आता ती वस्तू प्रचंड वस्तुमानाचे कृष्णविवर आहे असे मानले जाते,[१३] आणि यजमान दीर्घिका एक लहान दीर्घिका असून फवाऱ्याच्या आणि शेजारील स्टार बर्स्ट दीर्घिकेच्या प्रकाशामुळे ती दिसणे कठीण आहे यावर मतैक्य झाले आहे.[१४]
संदर्भ
- ^ a b c "Caelum, Constellation Boundary". The Constellations. International Astronomical Union. 14 January 2014 रोजी पाहिले.
- ^ a b Ridpath, Ian. "Constellations: Andromeda–Indus". Star Tales. self-published. 1 April 2014 रोजी पाहिले.
- ^ Russell, H. N. (1922). "The New International Symbols for the Constellations". Popular Astronomy. 30: 469–71. Bibcode:1922PA.....30..469R.
- ^ Kaler, J. B. "Star Names". University of Illinois at Urbana–Champaign. 11 May 2014 रोजी पाहिले.
- ^ "* Alpha Caeli – Star in double system". SIMBAD. 13 January 2013 रोजी पाहिले.
- ^ "GJ 174.1 B – Flare star". SIMBAD. 13 January 2013 रोजी पाहिले.
- ^ "* Delta Caeli – Star". SIMBAD. 13 January 2013 रोजी पाहिले.
- ^ a b "V* RR Caeli – Eclipsing binary of Algol type (detached)". SIMBAD. 15 January 2013 रोजी पाहिले.
- ^ Bruch, A.; Diaz, M. P. (1998). "The Eclipsing Precataclysmic Binary RR Caeli". The Astronomical Journal. 116 (2): 908. Bibcode:1998AJ....116..908B. doi:10.1086/300471.
- ^ Qian, S. B.; Liu, L.; Zhu, L. Y.; Dai, Z. B.; Fernández Lajús, E.; Baume, G. L. (2012). "A circumbinary planet in orbit around the short-period white dwarf eclipsing binary RR Cae". Monthly Notices of the Royal Astronomical Society: Letters. 422: L24. arXiv:1201.4205. Bibcode:2012MNRAS.422L..24Q. doi:10.1111/j.1745-3933.2012.01228.x.
- ^ Maxted, P. F. L.; O'Donoghue, D.; Morales-Rueda, L.; Napiwotzki, R.; Smalley, B. (2007). "The mass and radius of the M-dwarf in the short-period eclipsing binary RR Caeli". Monthly Notices of the Royal Astronomical Society. 376 (2): 919–928. arXiv:astro-ph/0702005. Bibcode:2007MNRAS.376..919M. doi:10.1111/j.1365-2966.2007.11564.x.
- ^ Magain, P.; Letawe, G. R.; Courbin, F. D. R.; Jablonka, P.; Jahnke, K.; Meylan, G.; Wisotzki, L. (2005). "Discovery of a bright quasar without a massive host galaxy". Nature. 437 (7057): 381–384. arXiv:astro-ph/0509433. Bibcode:2005Natur.437..381M. doi:10.1038/nature04013. PMID 16163349.
- ^ Haehnelt, M. G.; Davies, M. B.; Rees, M. J. (2006). "Possible evidence for the ejection of a supermassive black hole from an ongoing merger of galaxies". Monthly Notices of the Royal Astronomical Society: Letters. 366: L22. arXiv:astro-ph/0511245. Bibcode:2006MNRAS.366L..22H. doi:10.1111/j.1745-3933.2005.00124.x.
- ^ Feain, I. J.; Papadopoulos, P. P.; Ekers, R. D.; Middelberg, E. (2007). "Dressing a Naked Quasar: Star Formation and Active Galactic Nucleus Feedback in HE 0450−2958". The Astrophysical Journal. 662 (2): 872. arXiv:astro-ph/0703101. Bibcode:2007ApJ...662..872F. doi:10.1086/518027.