सियालदह राजधानी एक्सप्रेस
सियालदाह राजधानी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. राजधानी ह्या प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वेगाडी पश्चिम बंगालमधील कोलकात्याच्या सियालदाह रेल्वे स्थानक ते दिल्लीमधील नवी दिल्ली स्थानकांदरम्यान रोज धावते. पूर्व रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या ह्या राजधानी एक्सप्रेसला कोलकाता ते दिल्ली दरम्यानचे १,४५८ किमी अंतर पार करायला १७ तास लागतात. हावडा राजधानी एक्सप्रेस ह्या भारतातील सर्वात पहिल्या राजधानीला मिळालेल्या उत्फुर्त प्रतिसादानंतर सियालदाह राजधानी ही दुसरी राजधानी एक्सप्रेस चालू करण्यात आली.
सियालदाह राजधानी एक्सप्रेसला साधारणपणे पहिल्या वातानुकूलित श्रेणीचा १, द्वितीय वातानुकूलित श्रेणीचे ३ तर तृतीय वातानुकूलित श्रेणीचे १२ डबे असतात. प्रवासाच्या भाडेखर्चामध्ये संपूर्ण खानपान सेवा समाविष्ट असते.
स्थानके व मार्ग
- सियालदाह रेल्वे स्थानक
- दुर्गापूर
- आसनसोल
- धनबाद
- गया
- मुघलसराई
- कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानक
- नवी दिल्ली रेल्वे स्थानक