सिम
सिम (SIM) अर्थात सबस्क्रायबर आयडेंटिफिकेशन मॉड्यूल हे एक प्रकारचे ओळखपत्र आहे. आंतरराष्ट्रीय मोबाईल फोनच्या वर्गणीदाराचा परिचय (IMSI) आणि मोबाईल फोनवर किंवा संगणकासारख्या साधनांवर वर्गणीदारांची ओळख आणि अधिकृतता पटविण्याच्या कळा त्यावर सुरक्षितपणे नोंदलेल्या असतात. फोनमधून काढता घालता येण्याजोग्या सिम कार्डवर हा सिम परिपथ आरूढ झालेला असतो. हे कार्ड वेगवेगळ्या मोबाईल फोनवर वापरता येते. ही कार्डे सुरुवातीला क्रेडिट कार्डाइतक्या आकारमानाची बनली. मोबाईल फोने आकारमान जेव्हा लहान झाले तेव्हा छोटी मिनी- सिमकार्ड तयार करणे भाग पडले. त्यांची जाडी पूर्वीच्या कार्डाइतकीच राहिली, मात्र त्यांची लांबी २५ मिलीमीटर आणि रुंदी १५ मिलीमीटर इतकी कमी करण्यात आली. जागातील तमाम मोबाईल फोनमध्ये या आकाराची सिम कार्डे वापरली जातात. (२०१९ साल)
कार्डाचा एकमेव अनुक्रमांक (ICCID), आंतरराष्ट्रीय मोबाईल वर्गणीदार परिचय (IMSI), सुरक्षा अधिकृतता आणि सांकेतिक माहिती, स्थानिक नेटवर्कबाबत तात्पुरती साठवलेली माहिती, वापरकर्त्याला मुभा असलेल्या सेवांची माहिती इत्यादी अनेक प्रकारची माहिती सिम कार्डावर नोंदलेली असते. याशिवाय दोन संकेतशब्दही नोंदलेले असतात. एक, सामान्य वापरासाठीचा वैयक्तिक ओळख क्रमांक (पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर किंवा PIN) आणि दुसरा, वैयक्तिक अवरोधक संकेतांक (पर्सनल अनब्लॉकिंग कोड) किंवा (PUK). हा दुसरा पिन क्रमांकाच्या कुलुपासारखे काम करतो.
आकारमानानुसार वर्गीकरण
सिम कार्डांचा आकार अनेक वर्षांत लहान होत गेला आहे. सामान्य आकाराच्या सिम पाठोपाठ आकारविल्हे मिनी सिम, मायक्रोसिम आणि नॅनो सिम अशी कार्डेही अस्तित्वात आली आहेत.