सिद्धांतसूत्रपाठ
रचना इ.स. १२९०. कर्ता केशिराजबास. या ग्रंथास महानुभावांमध्ये “शास्त्ररूप परमेश्वर” म्हणले जाते. सूत्रपाठ हे प्रकरण तात्त्विक असून महानुभाव पंथाच्या तत्त्वज्ञानाचा तो पाया आहे. साहजिकच पंथियांना तो श्रुतिकल्प वाटतो व त्याची जपणूक फार मोठ्या कसोशीने ते करतात. यामुळेच त्याची रचना होऊन सातशे वर्षे लोटली तरी त्याचे मूळ स्वरूप कायम आहे.
परिचय
नागदेवाचार्यांच्या संमतीने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली केशिराजबासांनी लीळाचरित्रातील श्रीचक्रधरमुखीची वचने निवडून, त्यांचे वर्गीकरण करून व त्यांचा परस्परांशी अन्वय लावून चक्रधरोक्त सूत्रपाठ सिद्ध केला. सूत्रपाठातील सूत्रांची संख्या साडेबाराशे असून ती सोळा प्रकरणांमध्ये विभागलेली आहेत - पूर्वी, पंचकृष्ण, पंचनाम, अनन्यावृत्ती, युगधर्म, विद्यामार्ग, संहार, संसरण, उद्धरण, असतीपरी, महावाक्य, निर्वचन, आचार, आचारमालिका, विचार व विचारमालिका.
शब्दयोजनेतील मितव्यय (अल्पाक्षरता) आणि आशयघनता हे सूत्रपाठाचे खास वैशिष्ट्य. सूत्रपाठाचे मराठीतील स्थान अनन्यसाधारण, अद्वितीय आहे. अथपासून इतिपर्यंत सूत्रबद्ध असा हा एकच ग्रंथ आहे. सूत्रपाठ ही महानुभावांची गीता ठरली.
काही उल्लेखनीय सूत्रे
- भक्त वियोगीं नुरे (ईश्वरवियोगाने भक्त जिवंत राहू शकत नाही)
- जवं जवं जाणता : तवं तवं नेणता (जसजशी ज्ञानप्राप्ती तसतसे आपण काहीच जाणत नाही अशी जाणीव, ज्ञान अगाध)
- हाती गुढरिला निका दिसे : जोगी मुंडिला निका दिसे (शृंगारलेला हत्ती सुंदर, मुंडण केलेला योगी सुंदर)
- आचारे तेयाचा धर्म
- जन्मजीवित परमेश्वरा देयावे