Jump to content

साह्यकारी छात्रसेना

भारतातील शालेय विद्यार्थ्यांकरिता भारत सरकारने १९५२ पासून साह्यकारी छात्रसेना सुरू केली. शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींमध्ये लष्करी प्रशिक्षणाची वाढती गरज लक्षात घेऊन ज्यांना एन्.सी.सी.मध्ये प्रवेश मिळू शकला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी ए.सी.सी. योजना सुरू करण्यात आली. माध्यमिक शाळांतील साधारणपणे तेरा ते सोळा वर्षे वयोगटातील मुलामुलींना त्यात प्रवेश देण्याची तरतूद होती. भारत सरकारने १९४८ पासून राष्ट्रीय छात्रसेना( एन्.सी.सी.) योजना सुरू केली. अल्पावधीतच ही सेना इतकी लोकप्रिय झाली, की त्या सेनेची व्याप्ती वाढवून बहुसंख्य विद्यार्थ्यांना त्या शिक्षणाचा लाभ मिळेल अशी व्यवस्था करावी, अशी शिक्षणसंस्थांकडून मागणी आली. ह्या मागणीनुसार केंद्र शासनाने १९५२ च्या जून महिन्यापासून साह्यकारी छात्रसेनेची योजना शाळांमधून सुरू केली. ही योजना राष्ट्रीय छात्रसेनेपेक्षा कमी खर्चिक होती. एन्.सी.सी. तसेच शालेयस्तरावरील कनिष्ठ विभाग ( ज्यूनिअर एन्.सी.सी.) ह्या योजनांना पूरक व साधारणत: त्याच धर्तीवर ही योजना सर्व शाळांमधून ऐच्छिक स्वरुपात राबविण्यात आली.

तेरा ते सोळा वर्षे वयोगटातील मुलामुलींना शारीरिक शिक्षण व तत्सम इतर विषयांचे शिक्षण देऊन ह्या युवकांची शारीरिक, बौद्घिक व नैतिक उन्नती घडवून आणणे त्यांच्यात चारित्र्य, शीलसंवर्धन, नेतृत्वगुण, संघभावना, शिस्तप्रियता, सहकार्य, राष्ट्रप्रेम, समाजसेवा आदी नागरी गुणांची जोपासना करून त्यांना उत्तम, शिस्तप्रिय व सुसंस्कृत नागरिक बनविणे, अशी बहुविध उद्दिष्टे ए.सी.सी.च्या स्थापनेागे होती.ह्या युवकयुवतींमध्ये आत्मविश्वास जागृत करणे, त्यांना समाजसेवेचे प्रशिक्षण देणे, श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व पटवून देणे हेही हेतू ह्या सेनेच्या स्थापणेमागे होते. त्या द्दष्टीने ए.सी.सी.च्या अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली. त्यात पुढील विषयांचा समावेश करण्यात आला :

  1. सामुदायिक शारीरिक शिक्षण
  2. सामुदायिक कवायत
  3. रस्त्यावरील संचलने
  4. सांघिक खेळ
  5. नागरिकत्वाचे शिक्षण
  6. प्रथमोपचार
  7. स्वच्छता व आरोग्य
  8. समाजसेवा व अंगमेहनतीची कामे
  9. आग विझविणे
  10. पोहणे व जीव वाचविणे
  11. गर्दी काबूत आणणे.

कालांतराने ह्या अभ्यासक्रमात फेरफार करण्यात येऊन त्याचे स्वरूप जास्त व्यावहारिक बनविण्यात आले. ह्या अभ्यासक्रमाचे दोन भाग पाडण्यात आले :

  1. सर्वांना सक्तीचे व आवश्यक असे मूलभूत प्रशिक्षण :

(१) व्यावहारिक नागरिकत्व, (२) शारीरिक शिक्षण, (३) सांघिक खेळ, (४) कवायत, (५) फील्ड क्राफ्ट ( रणक्षेत्रातील हालचालींचे प्रशिक्षण ), (६) प्रथमोपचार, आरोग्य व स्वच्छता हे विषय अंतर्भूत होते. गर्दीचा बंदोबस्त, आग विझविणे, पोहणे व जीव वाचविणे हे पूर्वी शिकविले जाणारे विषय नव्या अभ्यासक्रमातून वगळलेले दिसतात.

२. ऐच्छिक स्वरुपाचे पूरक प्रशिक्षण:

(१) हस्तकला, (२) समाजसेवा, (३) शिबिरे, (४) हत्यारांच्या वापराचे प्राथमिक शिक्षण व बंदुकीची नेमबाजी हे विषय अंतर्भूत होते. ह्या प्रशिक्षण-अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षांचा असून, त्यात एकूण २७५ कार्यतास ( वर्किंग अवर्स ) अभिप्रेत होते. ही सेना अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली. ३१ ऑक्टोबर १९६३ रोजी तिच्यातील छात्रसैनिकांची संख्या १३,८४,७०० होती.

भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयामार्फत ही योजना कार्यान्वित झाली. संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील एन्.सी.सी.च्या प्रमुख संचालकांच्या मार्गदर्शनाखाली ए.सी.सी.ची प्रशासकीय अंमलबजावणी करण्यात येत असे. मुलांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची निवड करून त्यांना एन्.सी.सी.च्या लष्करी अधिकाऱ्यांकडून रीतसर प्रशिक्षण दिले जाई. ह्या प्रशिक्षित शिक्षकांनी ही योजना आपापल्या शाळांमधून राबविली. यामध्ये विद्यार्थ्यांना विशिष्ट गणवेश व बिल्ले देण्यात येत असत.

१९६५-६६ पासून साह्यकारी छात्रसेना योजना शाळांमधून बंद करण्यात आली. त्याची जागा राष्ट्रीय स्वास्थ्यदल ( नॅशनल फिटनेस कोअर ) योजनेने घेतली. १९५५– ६० या काळात माध्यमिक शाळांत बालवीर संघटना  व वीरबाला छात्रसेना, राष्ट्रीय अनुशासन योजना, शारीरिक शिक्षण इ. अनेक योजना चालू करण्यात आल्या. या योजनांचे संघटन व सुसूत्रीकरण करण्याच्या उद्देशाने १९६५ मध्ये राष्ट्रीय अनुशासन योजनेचे रुपांतर राष्ट्रीय स्वास्थ्यदल योजनेत करण्यात आले. तसेच शालेय पातळीवरील एन्.सी.सी.च्या कनिष्ठ विभागाची योजना अद्यापही शाळांमधून राबवली जाते.