Jump to content

साहित्याची भाषाशैली


साहित्याची भाषाशैली

साहित्य कोणत्याही भाषेतील असो. साहित्याची भाषा आणि शैली ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. साहित्यातील शैली ही एखाद्या साहित्यकृतीला, एखाद्या साहित्यप्रकाराला, एखाद्या कालखंडातील साहित्याला किंवा एखाद्या प्रदेशातील साहित्याला आणि विशेष म्हणजे एखाद्या लेखकाला वेगळेपणा प्राप्त करून देणारा घटक आहे. म्हणूनच म.द. हातकणंगलेकर म्हणतात त्याप्रमाणे “आधुनिक साहित्यात शैलीचे महत्त्व सापेक्ष आहे. शैलीची जाणीव अधिक जागृत झालेली आहे. शैलीचा स्वतंत्रपणे विचार करता येतो. शैली ही केवळ भाषेशी संबंधित नाही. शैली म्हणजे केवळ अलंकरण नव्हे. शैलीचा संबंध अनुभवाचे संकलन, विषयाचे आकलन, कलाकृतीची रचना, आकृतिबंध, आविष्काराची रीत, आस्वादाचीही रीत यांच्याशी लावता येतो..."[] इत्यादी घटकांचा संबंध शैलीशी येतो. आधीच्या काळात शैली म्हणजे साहित्यातील बरेच बाह्य घटक मानले जायचे. अलंकार, रीती, उपमा, रूपके किंवा रचनाबंध यांचा संबंध शैलीशी जोडला जायचा, आता शैली ही लेखकाच्या जाणिवेशी संबंधित गोष्ट मानली जाते.

एकूणच कलाकृतीला प्राप्त होणारे वेगळेपण म्हणजे रूप, भाषारचना, आकृतीबंध, संरचना अशा घटकांचे वेगळेपण साहित्यकृतीला शैलीमुळे प्राप्त होते. म्हणून "कोणत्याही कलाकृतीत आविष्कार द्रव्याची जी विशिष्ट रचना झालेली असते त्या विशिष्ट रचनेला शैली म्हणावे."[] अशी शैलीची व्याख्या स.शि. भावे करतात. म्हणजे शैलीचा संबंध साहित्यातील आविष्कारद्रव्य म्हणजे अनुभवांशी, विषयरूपाशी येतो असे त्यांना म्हणावयाचे आहे. म्हणूनच ते 'आविष्कारद्रव्याची रचना म्हणजे शैली' असे म्हणतात. म्हणूनच 'शैली केवळ भाषायोजना नव्हे. कलावंताची कल्पनीय अनुभव घेण्याची पद्धती म्हणजे शैली होय.' अशी शैलीची व्यापक भूमिका भावे घेतात. म्हणजे कलाकृतीला अस्तित्व, वेगळी ओळख शैलीमुळे प्राप्त होते असे मानले जाते.

म्हणजे एका लेखकाची, एका काळाची, एका प्रवाहाची स्वतंत्र शैली निर्माण होऊ शकते. सुधीर रसाळ यांनी शैलीचा संबंध जाणिवेशी लावला आहे. वेगळ्या जाणिवा वेगळी शैली निर्माण करतात. जाणिवा बदलल्या की शैली बदलते. आणि त्यामुळेच कलाकृतीतून शैली काही प्रमाणात अलग काढता येते असेही त्यांनी मानलेले आहे. म्हणजेच शैलीचा संबंध भाषातंत्राशी नाही, तर ती त्याच्या जाणिवप्रकृतीचा भाग आहे; म्हणून साहित्यकृतीला स्वतंत्र रूप देणाऱ्या जाणिवा महत्त्वाच्या असतात. त्यांच्या मते "साहित्यातून शैली ही काही प्रमाणात बाजूला काढता येते. साहित्यकृतीत रचनेच्या काही समान बाबी आढळून येतात. त्यांना आपण 'शैली' म्हणतो त्याच्या आधारे आपण साहित्य परंपरा निश्चित करतो.

लेखक-कवी हा त्याच्या विशिष्ट साहित्यपरंपरेमध्ये, तिच्या शैलीमध्ये लेखन करीत असतो. लेखकाच्या असाधारण जाणिवा आणि त्याला भावणारी विशिष्ट, पूर्वनिश्चित शैली यांच्या तणावातून त्याची साहित्यकृती घडत असते... लेखकाच्या जाणिवा शैलीला वाकविण्यात यशस्वी झाल्यास निर्माण होणारी साहित्यकृती ही त्या शैलीचा विकास घडवून आणते. अशावेळी तिला काही नवी परिमाणे, नव्या कक्षा प्राप्त होतात. त्यांनाच आपण प्रयोग म्हणतो."[] त्यांनी साहित्यकृतीला शैली कशी प्राप्त होते. नवी शैली कशी तयार होते, साहित्यकृतीच्या घडणीत शैलीचा वाटा कोणता, शैली परंपरेतून घेतली जाते, त्यांच्या जाणिवा बदलाशी शैली बदलाचा संबंध कसा येतो, त्याची नवी स्वतःची शैली आकाराला कशी येते इत्यादी घटकांचा संबंध आणि तंत्र किंवा प्रयोगाशी शैलीचा संबंध कसा नसतो याविषयी चर्चा केलेली आहे.

कथनात्म भाषाशैली म्हणजे काय

नाट्यात्म भाषाशैली

काव्यात्म भाषाभैली

संदर्भग्रंथ

{संदर्भयादी}

  1. ^ हातकणंगलेकर, म. द. मराठी साहित्य : तंत्र आणि शैली, संपा. हातकणंगलेकर, म. द., कोल्हापूर- अभिजात प्रकाशन, १९८१, पृ. ३
  2. ^ भावे, स. शि. मराठी साहित्य :तंत्र आणि शैली, संपा. हातकणंगलेकर, म. द., कोल्हापूर- अभिजात प्रकाशन, १९८१, पृ. ३०
  3. ^ रसाळ, सुधीर, मराठी साहित्य :तंत्र आणि शैली, संपा. हातकणंगलेकर, म. द., कोल्हापूर- अभिजात प्रकाशन, १९८१, पृ. ४१