Jump to content

सावित्री विक्रम खानोलकर

सावित्रीबाई विक्रम खानोलकर यांचे पूर्वाश्रमीचे नाव ईव्हा ईव्हॉन लिंडा माडे-डी-मारोस(Eva Yvonne Linda Maday-de-Maros-माता रशियन, पिता हंगेरियन) जन्म : स्वित्झर्लंड, २० जुलै, १९१३. यांनी रॉयल ॲकेडमी सँडहर्स्टचे कॅडेट असलेले विक्रम खानोलकर ह्यांच्याशी हिंदू धर्म स्वीकारून प्रेमविवाह केला. त्यांनी नुसती मराठी, संस्कृत, हिंदी भाषा, कथकली नृत्यशैली आणि भारतीय संस्कृतीच आत्मसात केली नाही तर, स्वतंत्र भारताच्या परमवीरचक्राच्या पदकावरील चित्राच्या निर्मितीचे श्रेय सावित्रीबाई विक्रम खानोलकर यांनाच जाते.

परमवीर चक्र हे भारताच्या लष्करातील सर्वात मोठे मानचिन्ह आहे. देशाच्या रक्षणार्थ सदैव झटणाऱ्या सैनिकांना हा सन्मान दिला जातो.

विक्रम खानोलकर हे भारतीय लष्करामध्ये एक अधिकारी होते. ते इंग्लंडमध्ये रॉयल मिलिटरी ॲकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत होते. त्यावेळी १६ वर्षे वयाच्या ईव्हा यांची विक्रम यांच्याशी भेट झाली. पुढे काही भेटींमध्येच ईव्हा आणि विक्रम यांचे संबंध जुळले. परंतु, त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली नाही, कारण त्यांच्या वयांमध्ये आणि संस्कृतींमध्ये खूपच फरक होता. मात्र १९३२मध्ये ईव्हा भारतामध्ये आल्या आणि त्यांनी विक्रम खानोलकर यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर सावित्री खानोलकर हे मराठमोळे नाव त्यांनी स्वीकारले.

ईव्हा युरोपियन पार्श्वभूमीतून आल्या असूनही त्यांनी भारतीय संस्कृतींशी जुळवून घेतले. त्या हिंदू प्रथा पाळू लागल्या. लोकसाहित्य, नृत्य, चित्रकला आणि संगीत यांसारख्या शास्त्रीय कलांमध्ये त्यांनी नैपुण्य मिळवले. एवढेच नाही, तर त्या अस्खलित हिंदी, मराठी आणि संस्कृत बोलू शकतं. हिंदू पौराणिक ग्रंथांचे आणि भारताच्या इतिहासाचे त्यांनी सखोल ज्ञान घेतले होते.

परमवीर चक्र बनवण्याची जबाबदारी

परमवीर चक्र बनवून घेण्याची जबाबदारी मेजर जनरल हिरालाल अटल यांच्याकडे होती. ते सावित्री खानोलकर यांच्याकडील ज्ञानाने व कलाकुसरीने प्रभावित झाले होते. यामुळेच त्यांनी परमवीर चक्राचे डिझाईन बनवण्याची जबाबदारी सावित्री यांच्याकडे सोपवली. त्यानुसार सावित्री यांनी हिंदू पुराणांतील ऋषी दधीचीच्या कथेपासून प्रेरणा घेऊन परमवीर चक्राचे डिझाईन तयार केले.

सावित्री यांनी बनविलेल्या डिझाईनमध्ये पदकाला जोडण्यासाठी एक जांभळी रिबीन आहे. पदकावर इंद्राच्या वज्राच्या ज्या चार प्रतिकृती आहेत, त्या दधीची ऋषींनी केलेल्या समर्पणाची प्रतीके आहेत. पदकाच्या मध्यभागी अशोकस्तंभ आहे.