साळी
सामान्य विणकर जातींनां साळी हें नांव दिलें जातें. 'देवांग' या लेखांत विणकर जातीविषयीं माहिती आढळेल. या ठिकाणीं स्वकुळसाळी या साळी पोटजातीसंबंधीच त्या जातीकडून आलेली माहिती संक्षेपानें दिलेली आहे. यांची संख्या सुमारें ५० हजारांपेक्षा जास्त असून ते महाराष्ट्र, वऱ्हाड, नागपूर व कर्नाटक या भागांत राहतात. स्वकुळ साळ्यांत (१) अष्टेरे (अहेर), (२) शुद्ध (सूत), (३) टिकले, (४) बांगड, (५) गुजर व (६) पद्मसाळी अशा सहा पोटजाती आहेत. या जातींत परस्पर लग्न व्यवहार होत नाहींत. बहुधां देशस्थ ब्राह्मण यांची भिक्षुकी करतात. या जातीसंबंधीं आधारग्रंथ 'साळी माहात्म्यपुराण' होय. हें पुराण संस्कृत असून तें अत्रिॠषीनें रचलें आहे असें सांगण्यांत येतें. याचें प्राकृत रूपांतर 'मूळस्तंबसाळीमहात्म्यपुराण' नांवाचें आहे. तें भानुदासानें शके ११३५ पूर्वी लिहिलें आहे. या पुराणांत साळ्यांची उत्पत्तिकथा सांगितली आहे. पंडित मंडळीजवळ असलेल्या चोपड्यावरून या जातीचा इतिहास मिळूं शकेल. कांहीं साळी जानवीं घालतात, कांहीं वीरभद्राची पूजा करितात. सोयरिकी फार लहानपणीं होतात. या जातींत पंचायत आहे. पण तिचें फारसें महत्त्व राहिलेलें नाहीं. शिक्षणाच्या बाबतींत इतर ब्राह्मणेतरांप्रमाणेंच हेहि मागासलेले आहेत. तथापि मागील कांहीं वर्षांपासून आपली उन्नति करून घेण्याचे यांच्यांत प्रयत्न सुरू आहेत. याचें द्योतक म्हणजे स्वकुळसाळी हितचिंतक मंडळ (अहमदनगर), स्वकुळसाळीविजय (मासिक, कऱ्हाड), यांसारख्या संस्था होत.