Jump to content

सार्वजनिक वाचनालय (राजगुरुनगर)

सार्वजनिक वाचनालय, राजगुरुनगर हे राजगुरुनगर शहरातील सार्वजनिक वाचनालय आहे. महाराष्ट्रातील १५० वर्षे पूर्ण केलेल्या मोजक्या ग्रंथालयांत याचा समावेश होतो. वाचनालयाला महाराष्ट्र शासनाचा 'अ' वर्ग दर्जा आहे.[]

सार्वजनिक वाचनालय, राजगुरुनगर

स्थापना

सन १८६२मध्ये खेड (नवीन नाव राजगुरुनगर)मधील काही ग्रंथप्रेमींनी एकत्र येऊन केवळ काही पोथ्या व ग्रंथांच्या साहाय्याने खेडमध्ये पहिली 'जनरल नेटिव्ह लायब्ररी, खेड' स्थापन केली. सन १९५२ च्या नोव्हेंबरमध्ये ही लायब्ररी 'सार्वजनिक वाचनालय, राजगुरुनगर' या नावाने नोंदली गेली.
मूळ लहान जागेवर, सन १९६५मध्ये स्वमालकीची नवीन दुमजली इमारत बांधण्यात आली. त्यासाठी डिबेंचर्स (कर्जाऊ रक्कम) विक्री करून पैसे जमवले गेले. नंतर यथावकाश सर्व डिबेंचर्स धारकांना व्याजासहित पैसे परत केले गेले. शतायू वाचनालय पुरस्कारासोबत रु. पाच लाखांचे अनुदान मिळाले. त्यात भर घालून ग्रंथसंग्रह व वाचक वाढल्याने शेजारची तेवढीच दुमजली इमारत सन २००६मध्ये खरेदी केली गेली.[]

वैशिष्ट्ये

ग्रंथालयाला कोलकाता येथील राजाराममोहन रॉय फाऊंडेशनकडून पुस्तके, ती ठेवण्यासाठी सुयोग्य फर्निचर, संगणक संच, प्रिंटर आणि वाचकांना हव्या असलेल्या महत्त्वाच्या पृष्ठांच्या प्रती देण्यासाठी झेरॉक्स मशीन मिळाले. विविध भागांतून येणारे संशोधक व अभ्यासक या सुविधांचा लाभ घेतात. ग्रंथालयाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेसाठी एक विशेष कक्ष अल्प मोबदल्यात सुरू केला आहे. अनेक लेखक, शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी या विभागास पुस्तकरूपांत देणग्या दिल्या आहेत.
खालील स्वतंत्र विभाग वाचनालयात आहेत -

  • वर्तमानपत्र वाचन कक्ष
  • पुस्तके देव-घेव कक्ष
  • महिला विभाग
  • बाल विभाग
  • संदर्भ ग्रंथ विभाग

संग्रह

वाचनालयांतील समृद्ध ग्रंथसंपदा २७ प्रकारच्या विविध विषयांनुरूप वर्गवारीत विभागली आहे. नोव्हेंबर २०१९मध्ये वाचनालयात एकूण ३८,११० पुस्तके, ११६ नियतकालिके, २० वर्तमानपत्रे, ४९ दुर्मिळ ग्रंथ आणि दोन हस्तलिखिते होती.

काही दुर्मिळ ग्रंथ

  1. द तलीसमन (इंग्रजी) १८३२ साल, ले. सर वॉल्टर स्कॉट
  2. शंकुछेद (१८५६) - शास्त्रीय, ले. दाजी निळकंठ नगरकर
  3. इंग्लंड देशाची बखर भाग १ व २ (१८५७) - ले. केशव सखाराम शास्त्री
  4. मराठ्यांची बखर (१८५७) - ले. कॅप्टन डेविड केपन
  5. प्रसन्न राघव (१८५९) - ले. शिवरामशास्त्री
  6. न्याय रत्न (१८६३) - ले. गणेश बाबाजी माटे
  7. घाशीराम कोतवाल (१८६३) - ले. मोरोबा कान्होबा
  8. अनेक कवी कृत कविता (१८८३) - ले. जनार्दन बाळाजी मोडक
  9. धर्मशास्त्र (१८९१) - ले. नारायण मोरेश्वर केळकर
  10. बालबोध मेवा (१८९२) मासिक संग्रह
  11. सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास (१८९१) - ले. लोकहितवादी
  12. काव्यदोष विवेचन
  13. श्री रामदासस्वामी कृत रामायण
  14. देशी हुन्नर
  15. मराठ्यांच्या इतिहासाची साधने
  16. केतकी ग्रह गणितंम
  17. जनाबाई गायकवाड
  18. बाळबोध मेवा
  19. धर्मशास्त्र
  20. हिंदुस्थानची राज्यव्यवस्था व लोकस्थिती
  21. संगीत शिवलीलामृत
  22. ज्योतिर्विलास
  23. केरळ कोकीळ
  24. न्यायरत्न
  25. प्रमाणशास्त्र
  26. विधवाविवाह
  27. पवित्र शास्त्रातील इतिहास

उपक्रम

महाराष्ट्र शासनाचे अनुदान, वर्गणी व देणग्या यावर सर्व कामकाज चालते. तसेच तालुक्यातील शासनमान्य वाचनालयांसाठी साखळी योजना चालविली जाते. नवीन खरेदी केलेल्या पुस्तकांचे वाचकांसाठी वर्षातून चार वेळेस प्रदर्शन भरविले जाते. वर्षातून दोनदा 'लेखक आपल्या भेटीसाठी' हा मुलाखत कार्यक्रम आयोजित केला जातो. तसेच नियमितपणे थोर व्यक्तींचे जयंती व पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित केले जातात.

मुक्त ज्ञानस्रोत प्रकल्प

वाचनालयात १०० वर्षाहून अधिक जुनी दुर्मिळ पुस्तके आहेत. यांचे संदर्भमूल्य लक्षात घेऊन हे ग्रंथ संगणकीकृत करून मुक्त ज्ञानस्रोतात आणण्याचा प्रकल्प राज्य मराठी विकास संस्थेच्या आर्थिक सहकार्याने पूर्ण झाला आहे. ऑगस्ट २०२० अखेर यापैकी २५ ग्रंथ विज्ञान आश्रम, पाबळ येथे स्कॅन होऊन विकिमिडिया कॉमन्स आणि मराठी विकिस्रोत या प्रकल्पात उपलब्ध केले गेले आहेत.[]

मान्यता व पुरस्कार

  • मार्च १९९८ मध्ये पुणे जिल्हा ग्रंथालय संघ याजकडून ‘आदर्श ग्रंथालय' पुरस्कार प्राप्त
  • एप्रिल २००५ मध्ये शासनाकडून 'अ' दर्जा व तालुका वाचनालय मान्यता
  • सन २००६ मध्ये शासनाकडून 'शतायू वाचनालय'मान्यता व विशेष अनुदान प्राप्त
  • ऑक्टोबर २०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाचा 'ग्रामीण विभाग अ वर्गामधून' सर्वोत्कृष्ट ग्रंथालयाचा 'डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार'

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ "महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय" (PDF). dol.maharashtra.gov.in. ४ सप्टेंबर २०२० रोजी पाहिले.
  2. ^ सुतार, राजेंद्र (२०१६). शतायू ग्रंथालय : सार्वजनिक वाचनालय, राजगुरुनगर. पुणे: जडण-घडण मासिक, संपा. सागर देशपांडे. pp. ४२-४४.
  3. ^ "Category:Books with Public Library, Rajgurunagar published before 1900 - Wikimedia Commons". commons.wikimedia.org (इंग्रजी भाषेत). 2020-09-04 रोजी पाहिले.