साउथ हॉलंड (इलिनॉय)
साउथ हॉलंड हे अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील शहर आहे. शिकागोचे उपनगर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २२,०३० होती.
१८४६ च्या सुमारास नेदरलँड्सच्या झुइडहॉलंड भागातून आलेल्या लोकांनी येथे वसाहत केली व त्यास आपल्या मूळ प्रदेशाचे नाव दिले. १८९४ साली १,००० लोकवस्तीसह येथील नगरपालिकेची स्थापना झाली.
अमेरिकेतील आय-९४, आय-९० आणि आय-८० या महामार्गांचा तिठा या शहरात आहे.
धार्मिक प्रभाव
साउथ हॉलंडने आपल्या स्थापनेच्यावेळी असलेले धार्मिक कायदे आजतगायत बाळगलेले आहेत. या शहराचे घोषवाक्य चर्चांचे शहर असे आहे. येथील सगळी दुकाने व उद्योगधंदे रविवारी बंद ठेवण्यात येतात. फक्त उपाहारगृहे, पेट्रोलपंप, हॉटेल, इ.ना रविवारी धंदा करण्यास मुभा आहे. साउथ हॉलंड कोरडे शहर असून संपूर्ण शहरात मद्यविक्रीस मनाई आहे. शहरात रतिचित्रण असलेले चित्रपट व इतर साहित्य विकण्यास किंवा भाड्याने देण्यास मनाई आहे. दूरचित्रवाणीसेवा पुरविणाऱ्या कंपन्यांना या अटीवरच शहरात प्रसारण करण्यास परवानगी दिली जाते. शहरात कोठेही बहुमजली इमारती बांधण्यास मनाई असून सगळी नवीन घरटी एककुटुंबीयच असली पाहिजेत असा नियम आहे.
वस्तीविभागणी
सुरुवातीस जरी डच लोकांनी हे शहर वसवले असले तरी २०१० च्या सुमारास येथील बहुसंख्य वस्ती कृष्णवर्णीय अमेरिकनांची (७३.८%) होती. १८.३% श्वेतवर्णीय लोक असून उरलेले इतरवंशीय होते.