Jump to content

साउथ एशियन फेमिनिझम

साउथ एशियन फेमिनिझम हे जुबान प्रकाशनाने २०१२ साली प्रसिद्ध केलेले पुस्तक असून यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि अफगाणिस्तान येथे गेल्या चार दशकात स्त्रीवादी सिद्धांकनाची पुर्नमांडणी करणाऱ्या परंपरेतील लेखांचे पुस्तक आहे. हे पुस्तक अनिया लुम्बा[] आणि रीट्टी अ. लुकोस यांनी संपादित केले आहे.

प्रस्तावना

वसाहत काळानंतर दक्षिण आशियामधील स्त्रीवादी विचार आणि चळवळी यामध्ये अनेक प्रश्न उभे राहिले. या प्रश्नांच्या चर्चेमधून अनेक दिशादर्शन झाले. अंतर्गत आणि सीमापार पसरत चाललेल्या धार्मिक मुलतत्त्ववादामुळे धोक्यात आलेले स्त्रियांचे स्वातंत्र्य, जागतिकीकरणामुळे स्त्रियांचे विस्थापन आणि त्यांच्या रोजगाराची झालेली विषमतापूर्ण पुर्नरचना आणि राष्ट्र आणि शासनाने वापरून बोथट केलेल्या स्त्रीवादी संज्ञा व संकल्पना अशा पर्यावरणातून स्त्रीवादी चळवळीने स्वतःला पुर्नघटीत केले. कायदाविषयक पुर्नरचनेच प्रचार – प्रसार आणि अधिकारांच्या लढाया या व अशा मुद्यांशी स्त्रीवादी चळवळीने थोड्या प्रमाणात अंतर निर्माण केले तर; वेश्या व्यवसाय, लैंगिक समानता, सैनिकीकरनाविरोधी व जागतिकीकरणामुळे निर्माण झलेल्या शोषक रोजगारांविरोधी अशा नव्या रचनांमुळे सिद्धांकन व चळवळी यामध्ये नवीन महत्त्वपूर्ण आंतरसंबंध निर्माण झाले. असाच आंतरसंबंध ‘दक्षिण आशिया’ आणि ‘पश्चिमी’/ ‘पाश्चिमात्य’ यातही निदर्शनास आला ज्यावर या पुस्तकात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

विभाग

या पुस्तकात १६ लेख असून ते ६ विभागांत विभागण्यात आले आहेत.

फेमिनिझम, रिलीजन अँड सेक्युलर

पहिल्या विभागात भारत आणि पाकिस्तानातील स्त्रीवादी सिद्धांकन व चळवळीपुढील धार्मिक मुलतत्त्ववाद आणि निधर्मीवाद (सेक्युलारीझम) यांच्या आव्हानांची चर्चा केली आहे. या विभागात फ्लेविया ॲग्नेस, अमिना जमाल आणि अमर्त्य सेन यांचे लेख आहेत.

फ्लेविया ॲग्नेस त्यांच्या फ्रॉम शाहबानू टू कौसरबानू या लेखात राज्याची संरचना आणि जमातीचे कायदेकानून यांना मुस्लिम स्त्रीस कसे तोंड देते? संस्कृती, धर्म, कायदा आणि राजकारणाचे तिच्या जीवनावर काय परिणाम होतात आणि अ सगळ्यांच्या विरोधाभासात ती कशी तगून राहते? राजकीय परिप्रेक्षात तिला नेहमी ‘बळी’ का समजले जाते? मुस्लिम स्त्रियांनी काही विरोध व स्वत्व दाखवले नाही का? आणि असल्यास ते का झाकले गेले? तिच्या जगण्या – तागण्याच्या लढाईत तिच्या सोबत आणि तिच्या विरोधात कोण आहेत? आणि मुख्यत: ‘जे’ व्यक्तिगत ते राजकीय या स्त्रीवादी चळवळीच्या घोषणेला तिचा प्रतिसाद काय आहे? या सर्व प्रश्नांवर चर्चा केली आहे.

अमिना जमाल यांच्या ‘ग्लोबल डिस्कोर्सेस सिच्यूएटेड ट्रेडिशन्स ॲण्ड वुमेन्स एजन्सी इन पाकिस्तान’ या लेखात पाकिस्तानातील धर्मनिरपेक्ष आणि इस्लामी स्त्रीवादी यांच्या भूमिका आणि त्यांचे परिणाम यांची सखोल चर्चा केली आहे.इस्लामी स्त्रीवादी कुराणाच्या अंगाने आपले स्वतःचे म्हणणे मांडतात. सबा मेहमूद, तलाल असद अशा काही स्त्रीवादी अभ्यासकांनी धर्मनिरपेक्ष आणि इस्लामिक स्त्रीवादातील विरोधाभास मांडले आहेत. परंतु लेखिका हे मानक पाकिस्तानी स्त्रियांना लावू इच्छित नाही. ‘आधुनिक’ आणि ‘श्रद्धाळू’ मुस्लिम स्त्रीवाद्यांच्या वेगवेगळ्या परंतु ठाम असलेल्या भूमिकांची चर्चा आणि त्यांचे परिणाम या लेखात मांडले आहे.

तिसरा लेख ‘मार्शल टेल, राईट – विंग हिंदू वुमेन, ॲण्ड ‘’हिस्ट्री टेलिंग” इन द बॉम्बे स्लम्स’ हा लेख अमर्त्य सेन यांनी लिहिलेला असून या लेखात त्यांनी मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये शिवसेनेच्या महिला आघडीच्या कार्यकर्त्या ऐतिहासिक कथांचा आधार घेऊन त्याही लढवय्या असल्याचे कसे अधोरेखित करतात याचा अभ्यास मांडला आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये स्थानिक लोककथा. दंतकथा यातून स्त्रिया आपले सामुदायिक व्यक्तित्व कशा उभ्या करतात याचे दाखले देऊन कथाकथन हे हिंसा वाढवणारे कसे ठरते याचे विश्लेषण केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पारंपारिक हिंदू स्त्रीच्या चौकटीतून त्या बाहेर पडल्या आहेत.

फेमिनिझम, लेबर अँड ग्लोबलायझेशन

या दुसऱ्या विभागात भारत आणि श्रीलंकेतील नव्याने गठीत झालेल्या जागतिकीकरणामुळे स्त्रीवादासमोरील प्रश्नांचा उहापोह केला आहे. ‘ऑफ मोमेन्ट्स, नॉट मोमेन्ट्स: फेमिनिझम ॲण्ड लेबर ॲक्टीव्हीझम इन पोस्ट नॅशनल श्रीलंका’ या सोनाली परेरा लिखित लेखात श्रीलंकेतील वस्त्र उद्योगात असलेल्या स्त्रियांच्या लिखाणाबद्दल संशोधन केले आहे.१९७८ पासून श्रीलंकेमध्ये मुक्त व्यापारी झोन आहे, त्यामुळे तिथे व्यावसायिक संघटना बांधता येत नाहीत परंतू, या व्यावसायातील स्त्रियांची परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. या व्यावसायातील स्त्रियांचे म्हणणे मांडण्यासाठी काही एन.जी.ओ, सांस्कृतिक गट यांनी मिळून ‘द्बिंदू’ हे मुखपत्र सुरू केले त्यातील लिखाणातून या व्यावसायातील स्त्रिया आपले जीवन, व्यथा, संघर्ष शब्दांकित करतात. या लिखाणातून त्यांच्या श्रमाचा इतिहास हा त्यांच्या राष्ट्राच्या इतिहासापेक्षाही जुना आहे हे अधोरेखित करतात.

फेमिनिझम, मायग्रेशन ॲण्ड लेबर या अनन्या भट्टाचारजीच्या लेखात स्थलांतरीत कामगारांच्या विशेषतः स्त्री कामगारांच्या संघटना बांधताना निर्माण होणारे सैधान्तिक, राजकिय आणि प्रत्यक्ष प्रश्न मांडले आहेत. स्त्रीवादी सिद्धांकन आणि वैयक्तिक अनुभव या दोन मानकांच्या आधारे लेखिका विषयाची मांडणी करते. स्थलांतरीत कामगारांना स्वतःची अशी ओळख नसते, ते नागरिक, मतदार, योजनांचे लाभार्थी इतकेच काय तर नव्या समुहाचे सदस्यही नसतात हो मुद्दा या लिखाणात प्रकर्षाने पुढे येतो. एच – २ बी व्हिसावर अमेरिकेत काम करायला जाणाऱ्या माहिती तंत्रज्ञानातील उच्चशिक्षित कर्मचाऱ्यांनाही स्थलांतरीतांचे हे प्रश्न भेडसावत असतात.

फेमिनिझम, वॉर अँड पीस

या पुस्तकाच्या तिसऱ्या विभागात वांशिक लढयांमुळे अस्थिर असलेल्या भूप्रदेशातील स्त्रिया, स्त्रीवाद, स्त्रीवादाची राजकीय व सामाजिक रूपे यांचा आढावा घेतला आहे. दक्षिण आशियातील असे दोन महत्त्वाचे भूप्रदेश म्हणजे श्रीलंका आणि काश्मीर. संयुक्त राष्ट्र संघाने २००० साली स्त्रिया, युद्ध आणि शांतता या विषयावर ठराव क्रमांक १३२५ मान्य केला. या विभागातील पहिल्या लेखात वासूकी नेसीह यांनी श्रीलंकेमध्ये चालू असलेल्या नागरी युद्धामध्ये तामिळ आणि सिंहली या दोन्हीही युद्धावर असलेल्या समुदायांमधील स्त्रियांची अवस्था आणि त्यांनी घेतलेले पुढाकार या विषयी विस्ताराने लेहिले आहे. ठराव १३२५ वेगवेगळ्या स्थानांवर वेगवेगळ्या समुदायांमध्ये कसा राबवला जाती, त्याची राजकीय अंगे कोणती असतात आणि त्यासाठी अनेक नको असलेल्या तडजोडी कराव्या लागतात याचा गोषवारा या लेखात आहे.

श्रीलंकेवरील दुसऱ्या लेखात मालथी – दे- अल्विस यांनी नागरी युद्धाच्या काळात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तसेच पक्षिय राजकारणासाठी स्त्रियांच्या मातृत्वाचे राजकारण कसे केले गेले याचा आढावा घेतला. या आढाव्यात एल.टी.टी.ई आणि इतर राजकीय पक्षांनी मातृत्वाच्या प्रश्नावर उभे केलेले अस्मितेचे राजकारण ठळकपणाने दिसून येते. अंगना चटर्जी काश्मीर बद्दल तिसऱ्या लेखात लिहिताना काश्मीरमध्ये काम करताना प्रत्यक्ष आलेले अनुभव लिहितात. काश्मीरमध्ये चाललेल्या दहशतवादी आणि भारतीय सैन्य पुरस्कृत हिंसाचाराचे भयाण चित्र तिच्या अनुभवातून उभे राहते. काश्मीरमधील जनता आणि विशेषतः स्त्रिया यांच्यावर या सतत चालू असलेल्या हिंसेचा सामाजिक व मानसिक परिणाम लेखिका स्वानुभवातून मांडते.

फेमिनिझम, फिगरेशन ॲण्ड पॉलिटिक्स ऑफ रिडींग ॲण्ड रायटिंग

या चौथ्या विभागात वाङ्मयीन व ऐतिहासिक अवकाशात स्त्रीवादासमोर लमिया करीम ‘ट्रान्सनॅशनल पॉलिटिक्स ऑफ रिडींग ॲण्ड द (अन) मेकिंग ऑफ तस्लिमा नसरीन या लेखात तस्लिमा नसरीन यांच्याकडे स्त्रीवादाचे प्रतिक म्हणून आणि त्याचवेळी धर्म बुडवी म्हणून पाहिले जाते या विषयी लिहिले आहे. तस्लिमा नसरीन यांना आणि त्यांच्या लिखाणाला त्यांच्या देशातील स्त्रीवाद्यांचा पाठिंबा नाही आणि भारतात मात्र त्यांच्याविषयी आदराची भावना आहे, हे असे का आहे याचा शोध या लेखात घेण्यात आला आहे.

‘ॲट द इंटरसेक्शन ऑफ जेंडर ॲण्ड कास्ट’ या दुसऱ्या लेखात लॉरा ब्रुक या साहित्यातील विशेषतः हिंदी कथांमधील ‘बलात्कार’ कसा लिहिला जातो आणि त्यच्या भाषेतून काय सांगितले जाते याचे विश्लेषण करतात. या विषयावर साहित्यिक आणि स्त्रीवादी यांच्यामध्ये झालेल्या चर्चांचा सारांशही त्या देतात. पुढे दलित महिलांच्या निवेदनातून मात्र वेगळा आशय पुढे आल्याचे निरीक्षण त्या नमूद करतात यासाठी त्या मंगली, अंगारा अशा कथांचे उदाहरण देतात. या विभागातील तिसऱ्या लेखात ‘सब्जेक्ट टू सेक्स’ हा लेख अंजली आरोंदेकर यांनी लिहिला असून १९२७ साली स्थापन झालेल्या गोमंतक मराठा समाज या देवदासींच्या धर्मादाय न्यासाच्या अनुशंगाने या लेखात लेखिकेने १९१८ सालापासून माहित असलेल्या आणि स्वातंत्र्यपुर्व काळापासून अस्तित्वात असलेल्या देवदासी प्रथा आणि समाजाबद्दल तौलानिक अभ्यास मांडला आहे.

फेमिनिझम, सेक्स वर्क अँड द पॉलिटिक्स ऑफ सेक्शुआलीटी

या पाचव्या विभागात वेश्या व्यवसायातील स्त्रियांचे संघटन बांधताना उभे राहिलेले प्रश्न आणि घडामोडींचा इतिहास विचारात घेतला आहे. यातील पहिला लेख ‘किपिंग सेक्शुआलीटी ऑन द अजेंडा’ हा फिरदोस अजीम यांनी लिहिला आहे. १९९० साली बांग्लादेशात वेश्या व्यवसायाला लैंगिक श्रमाचा दर्जा देण्यासाठी झालेल्या चळवळीचे यश – अपयश आणि त्या अनुशंगाने निर्माण झालेले मानवाधिकार व नागरिकत्वाचे अधिकार या घडामोडींचा आढावा या लेखात घेतला आहे.

‘पॉलिटिसायझिंग पॉलिटिकल सोसायटी’ हा कलकत्यातील सोनागाची परिसरात असलेल्या वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीयाच्या ‘दुरबार’ या संघटनेविषयी तुरजो घोष यांनी लिहिलेला लेख आहे. दुरबार या संघटनेमुळे एक व्यवस्थित, टिकाऊ आणि मोठे प्रभाव क्षेत्र असलेली संघटना राजकीय दृष्ट्या कार्यान्वित आहे. याचे फायदे सभासदांना मिळतात परंतू, अशा प्रकारच्या रचनांमध्ये काही धोकेही असतात. उदा. योग्य प्रतिनिधित्व न मिळणे, जाणिव – जागृती झाल्याचा आभास असणे ई. शिवाय अशा प्रकारची संस्था सहजतेने शासकीय किंवा राजकीय व्यवस्थेचा भाग होऊ शकते या सर्व प्रश्नांचा मागोवा या लेखात घेण्यात आला आहे.

‘क्विरिंग अप्रोचेस टू सेक्स’ हा अश्विनी सुखटनकर यांनी लिहिलेला असून वेश्या व्यवसायातील कामगार संघटना उभारणे, त्या उभारताना अधिकारांचे, श्रमाचे सिद्धांकन करणे या अवकाशात उभ्या राहिलेल्या प्रश्नांची चर्चा केली आहे. मुंबईतील भारतीय बार गर्ल असोशिएशन, कलकत्यातील सोनागाची, बंगलोरमधील हिजडे आणि कोती यांची संगमा ही संघटना यांची उदाहरणे घेऊन विविध प्रश्नांना कसे हाताळले गेले आणि वेश्या व्यवसाय निर्मुलन करू इच्छीणाऱ्या दबाव गटांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाची नोंद यात घेतली आहे.

फेमिनिझम, क्राईसिस अँड फ्युचर

या सहाव्या विभागात स्त्रीवादी सैद्धांतिक काम उभे करण्यासाठी दक्षिण आशिया हा विभाग निवडल्यामुळे निर्माण झालेल्या शक्यता आणि मर्यादा यांची चर्चा केली आहे.हेक्लर्स टू पॉवर: द वानिंग ऑफ लिबरल राईट्स ॲण्ड चॅलेंजेस टू फेमिनिझम इन इंडिया या लेखात रत्ना कपूर भारतातील स्त्रिवादापुढील आव्हानांची चर्चा करतात.

संदर्भ सूची