सलीम अली
सलीम अली | |
सलीम अली (पक्षितज्ज्ञ) | |
जन्म | नोव्हेंबर १२, १८९६ |
मृत्यू | जून २०, १९८७ |
नागरिकत्व | भारत |
राष्ट्रीयत्व | भारत |
धर्म | इस्लाम (सुलेमानी बोहरा) |
डॉ. सलीम अली ( सलीम मोईझुद्दीन अली- जन्म १२ नोव्हेंबर इ.स. १८९६ ; मृत्यू- २० जून इ.स. १९८७) हे भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी होते. सलीम अली यांनी भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतातील पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, पक्ष्यांच्या विविध जाती आणि जातींमधील वैविध्य यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या ह्या कार्याने भारतात हौशी पक्षिनिरीक्षक बनण्याची परंपरा चालू झाली. भारतातील हे पक्षी निरीक्षक सलीम अली यांना आद्य गुरूमानतात. त्यांना birdman of India असे ही संबोधले जाते.
सुरुवातीचे दिवस
डॉ. सलीम अली आपण पक्षी निरीक्षणाकडे कसे वळलो याचे वर्णन आपल्या आत्मचरित्रात करतात. मुंबईच्या खेतवाडीमध्ये मुस्लिम कुटुंबात अली यांचा जन्म झाला. लहानपणी भेटवस्तू म्हणून दिलेल्या छर्ऱ्याच्या बंदुकीने लहान पक्षी टिपायचे हा त्यांचा छंद होता. एके दिवशी टिपलेल्या चिमण्यांमध्ये त्यांना वेगळी चिमणी मिळाली. हिच्या गळ्यापाशी पिवळा ठिपका होता. नेहेमीपेक्षा हा पक्षी वेगळा दिसल्याने त्यांची उत्सुकता चाळवली व त्यांनी त्यांच्या मामांकडे हा पक्षी कोणता याची विचारणा केली. मामा त्याला थॆट बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या संचालकांकडे घेऊन गेले. तेथे संचालकांनी छोट्या अलीला हा पक्षी कोणता हे सविस्तर सांगितले, तसेच भुसा भरलेल्या पक्ष्यांचा संग्रह दाखवला. भारावललेल्या सलीम अलींना पक्ष्यांची जी भुरळ पडली ती कायमचीच.
पक्षिशास्त्रज्ञाची घडण
यानंतरच्या काळात सलीम अलींचा पक्षिछंद त्यांना टिपणे व नोंदी करणे यांपुरता मर्यादित राहिला. शालेय शिक्षणानंतर त्यांना प्राणी शास्त्रात पदवी घ्यायची होती परंतु शास्त्रातील अनेक अवघड विषयांमुळे माघार घ्यावी लागली. दरम्यान ते ब्रम्हदेशातील आपल्या बंधूंच्या धंद्याला मदत म्हणून रंगूनला गेले. तेथे धंद्यात मदतीसोबत त्यांनी ब्रम्हदेशातील जंगले फिरून पक्ष्यांना टिपून त्यांच्या नोंदी ठेवायचा छंद चालू ठेवला. १९१८ मध्ये त्यांचा तेहमिना यांच्यांशी विवाह झाला. एका यशस्वी पुरुषामागे पत्नीचा हात असतो ही म्हण सलीम अलींच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. १९२४ मध्ये रंगून मधील धंद्यात अपयश आल्यानंतर अली भारतात परत आले. दरम्यान तेहमिना यांनी सलीम अलींचा पक्ष्यांबद्दलचा कल जाणून घेतला होता व ज्यात त्यांचा छंद जोपासला जाईल अशी नोकरी करण्यास त्यांना प्रोत्साहन दिले. परंतु सलीम अलींचे शिक्षण अशी नोकरी मिळवण्यास एकदम जुजबी होते. जवळच्या ओळखीने त्यांना बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी मध्ये गाईड लेक्चररची नोकरी मिळाली, परंतु अलींना ते पुरेसे नव्हते. त्यावेळेस भारतात पक्षिशास्त्र (ornithology) हा विषय अस्तित्वातच नव्हता. यासाठी त्यांनी जर्मनीमध्ये जाऊन पक्षिशास्त्राचे प्रशिक्षण घेतले व काही काळ इंग्लंडमध्ये काम केले.
भारतात आल्यानंतर या विषयात नोकरी मिळणे कठीण काम होते. सलीम अली अजूनही हौशी पक्षी निरीक्षकांसारखेच गणले जात. आर्थिक परिस्थिती खालावल्याने त्यांनी आपल्या पत्नीच्या मदतीने अलिबागजवळ किहीमजवळ आपला मुक्काम हलवला. या मुक्कामात त्यांनी सुगरण पक्ष्याच्या वर्तनावर अतिशय बारकाईने अभ्यास केला व त्यावर 'बीएन्एच्एस'च्या जर्नलमध्ये त्यांनी प्रदीर्घ शोधनिबंध लिहिला. हा निंबध त्यांना पक्षीशास्त्रज्ञ म्हणून नावलौकिक मिळवून देण्यास जबाबदार ठरला. त्यांनी पक्ष्यांना केवळ टिपून त्यात भुसा भरून संग्रहालयात ठेवण्यासाठी पक्षिशास्त्र नाही हे जगाला दाखवून दिले व एकूणच पक्षिशास्त्रालाच वेगळी दिशा दिली.
या नंतर १९३० च्या सुरुवातीला सलीम अलींना ब्रिटिश सरकारपुरस्कृत तसेच संस्थाने पुरस्कृत पक्षी मोहिमांवर बोलवणे येऊ लागली. अलींनी या मोहिमांवर आपण नोंदी तसेच पक्ष्यांचा जीवनशैलींवर अभ्यास करणार असल्याचे स्पष्ट केले, केवळ पक्षी टिपून नोंदी ठेवण्यात आपल्याला रस नाही, ते काम कोणीही स्थानिक कामगार करू शकेल असे स्पष्ट केले. आता सलीम अली सर्वमान्य पक्षी शास्त्रज्ञ झाल्यामुळे तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मंजूरी दिली व सलीम अलींचे पक्ष्यांचे खरेखुरे काम सुरू झाले. या नंतरच्या काळात भारताच्या मोठ्या भूभागावर त्यांनी पक्षी निरीक्षण मोहिमा आखल्या. देशाच्या वायव्य सरहद्दीपासून ते केरळच्या जंगलांपर्यंत तसेच कच्छच्या दलदलीपासून पूर्वेकडे सिक्कीम व अरुणाचलपर्यंत जाऊन त्यांनी पक्ष्यांच्या नोंदी केल्या. पक्ष्यांचे वर्तन, त्याच्यांत हवामानानुसार होणारे बदल, स्थलांतराच्या सवयी, विणीचे हंगाम यावर मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा केली. सुरुवातीला या कामी त्यांची पत्नी तेहमिनाने खूप मदत केली. त्याच सलीम अलींच्या मोहिमांचे प्रोजेक्ट मॅनेजमेंट बघत. १९३९ मध्ये तेहमिनांचा मृत्यू झाल्यानंतर अली खूपच व्यथित झाले. त्यांच्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली. परंतु त्यातून सावरून पुन्हा लग्न न करता त्यांनी आपले आयुष्य पूर्णपणे पक्ष्यांना वाहून देण्याचे ठरवले. आपला मुक्काम मुंबईला बहिणीच्या घरी हलवला व तेथूनच आपले उर्वरित आयुष्य घालवून भारतीय पक्षिशास्त्रासाठी अजरामर ठेवा निर्माण केला.
लेखन
सलीम अलींचे पक्षी शास्त्रज्ञ म्हणून मोठेपण कशात आहे तर त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तके. भारतभर फिरून त्यांनी जी तपशीलवार माहिती गोळा केली होती, त्याचे त्यांनी केवळ रेकॉर्ड्समध्ये स्थान न ठेवता ती माहिती सर्वसामान्यांना वापरता येईल अश्या शैलीत पुस्तके लिहिली. सुरुवातीच्या काळात त्यांचे लिखाण सुधारण्यातही त्यांना तेहमिनांनी मदत केली होती. १९४३ मध्ये लिहिलेले द बुक ऑफ इंडियन बर्ड्स हे पुस्तक आजही पक्षी ओळखण्यासाठी पहिल्या पसंतीचे आहे आज हे पुस्तक १३ व्या आवृतीत असून पुस्तकातील पक्ष्यांची फारच थोडी चित्रे बदलण्यात आली आहेत. यावरून त्यांनी केलेल्या सूक्ष्म निरीक्षणांची अचूकता लक्षात येते. त्यांनी लिहिलेल्या हँडबुक ऑफ बर्ड्स ऑफ इंडिया ॲन्ड पाकिस्तान (पिक्टोरियल गाईड) या दहा खंडी पुस्तकाने त्यांना खऱ्या अर्थाने अजरामर केले. डॉ. सिडने डिलन रिप्ली यांच्या साथीदारीत त्यांनी अपार परिश्रम घेऊन भारतीय पक्ष्यांच्या १२०० जातींच्या व २१०० उपजातींच्या नोंदी, त्यांच्या सवयी वगैरे सर्वांगीण शास्त्रशुद्ध माहिती चित्रांसहित एकाच ठिकाणी उपलब्ध केली.
लिहिलेली पुस्तके
- द बुक ऑफ इंडियन बर्ड्स - प्रथम आवृती १९४३ -सध्या १३वी आवृती[१]
- इंडियन हिल बर्ड्स
- हँन्डबुक ऑफ बर्ड्स ऑफ इंडिया ॲन्ड पाकिस्तान- खंड १ ते १०. सहलेखक - डॉ सिडने डिलन रिप्ली. ऑक्सफर्ड प्रेस (१९६४ ते ७४)
- खंड १ डायव्हर्स ते हॉक्स
- खंड २ मेगापोड्स ते क्रॅब प्लोव्हर
- खंड ३ स्टोन कर्ल्युझ ते आउल्स
- खंड ४ फ्रॉगमाउथ्स ते पिट्टाझ
- खंड ५ लार्क्स ते ग्रे हायपोकॉलियस
- खंड ६ कुकू-श्राइक्स ते बॅबेक्सेस
- खंड ७ लाफिंग थ्रुशेस ते मँग्रोव्ह व्हिसलर
- खंड ८ वार्बलर्स ते रेडस्टार्ट्स
- खंड ९ रॉबिन्स ते वॅगटेल्स
- खंड १० फ्लॉवरपेकर्स ते बंटिंग्स
- फॉल ऑफ स्पॅरो- आत्मचरित्र १९८५
- कॉमन बर्ड्स (सहलेखक लईक फतेहअली); नॅशनल बुक ट्रस्ट १९६७
- अ पिक्टोरियल गाइड टू द बर्ड्स ऑफ इन्डियन सबकाँटिनन्ट- सहलेखक सिडने डिलन रिप्ली. १९८३
- बर्ड स्टडी इन इंडिया, इट्स हिस्टरी ॲन्ड इंपॉर्टन्स १९७९
- द ग्रेट इंडियन बस्टर्ड भाग १ -२ सहलेखक - रहमानी; बीएन्एच्एस (१९८२ -८९)
प्रादेशिक मार्गदर्शिका
- Birds of Bhutan with Biswas, B. & Ripley, D., Calcutta: Zoological Survey of India (1996)
- The Birds of Bombay and Salsette with H. Abdulali, Bombay: Prince of Wales Museum (1941)
- The Birds of Kutch, London: OUP (1945)
- Indian Hill Birds Bombay: OUP (1949)
- The Birds of Travancore and Cochin Bombay: OUP (1953)
- The Birds of Gujarat Bombay: Gujarat Research Society (1956)
- A Picture Book of Sikkim Birds Gangtok: Government of Sikkim (1960)
- The Birds of Sikkim Delhi: OUP (1962)
- Birds of केरळ Madras: OUP (1969)
- Field Guide to the Birds of the Eastern Himalayas Bombay: OUP (1977)
- The Vernay Scientific Survey of the Eastern Ghat; Ornithological Section—Together with The Hyderabad State Ornithological Survey 1930-38 with Hugh Whistler, Norman Boyd Kinnear (undated)
तांत्रिक अभ्यास आणि अहवाल
- Studies on the Movement and Population of Indian Avifauna Annual Reports I-4. with Hussain, S.A., Bombay: BNHS (1980-86)
- Ecological Reconnaissance of Vedaranyam Swamp, Thanjavur District, Tamil Nadu Bombay: BNHS (1980)
- Harike Lake Avifauna Project (co-author) Bombay: BNHS (1981)
- Ecological Study of Bird Hazard at Indian Aerodromes (Vols. I & 2). with Grubh, R. Bombay: BNHS (1981-89)
- Potential Problem Birds at Indian Aerodromes with Grubh, R. Bombay: BNHS
- The Lesser Florican in Sailana with Rahmani et al. Bombay: BNHS (1984)
- Strategy for Conservation of Bustards in Maharashtra (co-author) Bombay: BNHS (1984)
- The Great Indian Bustard in Gujarat (co-author) Bombay: BNHS (1985)
- Keoladeo National Park Ecology Study with Vijayan, S., Bombay: BNHS (1986)
- A.Study of Ecology of Some Endangered Species of Wildlife and Their Habitat. The Floricans with Daniel J.C. & Rahmani, Bombay: BNHS (1986)
- Status and Ecology of the Lesser and Bengal Floricans with Reports on Jerdon’s Courser and Mountain Quail Bombay: BNHS (1990)
पर्यावरण चळवळीचे प्रणेते
१९५० व ६० च्या दशकात जेव्हा भारतात पर्यावरण हा शब्द अस्तित्वातच नव्हता त्यावेळेस भरतपूरच्या केवलदेव घाना राष्ट्रीय उद्यान तसेच केरळमधील सायलंट व्हॅली राष्ट्रीय उद्यानात तत्कालिन होणारे पर्यावरणास हानीकारक प्रकल्पांना विरोध दर्शावला. त्यांचे वाक्य तत्कालीन पंतप्रधान चरणसिंग यांना चांगलेच झोंबले होते. " ताजमहाल नष्ट झाला तर पुन्हा बांधता येईल परंतु सायलंट व्हली सारखे जंगल एकदा नष्ट झाल्यावर पुन्हा उभारता येणार नाही" . त्यांनी केलेल्या शास्त्रीय वादावर सरकारने नमते घेउन इंदिरा गांधी सरकारने हे प्रकल्प स्थगित केले तसेच अंततः त्यांना राष्ट्रीय उद्यानांचा दर्जा देउन कायमचे संरक्षित केले. तसेच अनेक दुर्मिळ प्राणी व पक्षी यांबाबत आपल्या पुस्तकांद्वारे, संस्थेद्वारे, शिष्यांमार्फत केलेले सरकार तसेच सामान्य नागरिकांमध्ये केलेले प्रबोधन भारतातील पर्यावरण चळवळीचा पाया ठरले. त्यामुळेच भारतातील आद्य पर्यावरणवाद्यांमध्ये डॉ. सलीम अली यांचा समावेश होतो.
पुरस्कार
- पद्मभूषण, (१९५८)
- ब्रिटिश पक्षितज्ज्ञ संघाचे (British Ornithologists Union) राष्ट्रीय पदक, (१९६७)
- द जॉन सी. फिलिप्स मेडल फोर डिस्टिंग्विश्ड सर्विस इन इंटरनाशनाल कनजर्वेशन, वर्लड कनजर्वेशन युनियनकडून, (१९६९) (जागतिक संवर्धन संघाकडून आंतरराष्ट्रीय संवर्धनात प्रतिष्ठीत सेवेसाठी दिले गेलेले द जॉन सी. फिलिप्स पदक)
- पद्मविभूषण, (१९७६)
- हॉलंड सरकारचा ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क, (१९८६)
सलीम अलींचा १२ नोव्हेंबर हा जन्मदिवस पक्षी दिन म्हणून जाहीर करण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरवले होते. [ संदर्भ हवा ]
चरित्र
वीणा गवाणकर यांनी मराठीत सलीम अलींच्या आयुष्यावर पुस्तक लिहिले आहे.
संदर्भ
- ^ This book was reviewed by Ernst Mayr commending it but noting that the illustrations were not to the standard of American books Ernst Mayr (1943) Review: Birds of India. The Auk 60(2):287
- द फॉल ऑफ अ स्पॅरो- लेखक: सलीम अली (मराठीत: एका चिमणीचे कोसळणे)
- सलीम अली - वीणा गवाणकर