Jump to content

सर्वनाम

सर्वनाम म्हणजे वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा शब्द. नाम वाक्यात वारंवार आले तर ते कानाला बरे वाटत नाही. नामाचा हा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्याऐवजी ‘मी, तू, तो, हा, जो, आपण, कोण, काय’ यांसारखे शब्द आपण वापरतो. या सर्वनामांना स्वतःचा अर्थ नसतो. ते ज्या नामांबद्दल येतात त्यांचाच अर्थ त्यांना प्राप्त होतो. वाक्यात एखादे नाम येऊन गेल्याशिवाय सर्वनाम येत नाही. नामाचा तो प्रतिनिधी असून नामाचे सर्व प्रकारचे कार्य सर्वनाम करते. 'तो' हा शब्द राम, वाडा, कळप, थवा, आळस अशा कोणत्याही प्रकारच्या नामाबद्दल वापरता येतो. अशा शब्दाचा उपयोग सर्व (प्रकारच्या )नामांसाठी होतो, म्हणून त्यास सर्वनाम असे म्हणतात.

व्याख्या

नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी येणाऱ्या विकारी शब्दाला ‘सर्वनाम’ असे म्हणतात.

सर्वनामांचे प्रकार

सर्वनामांचे एकंदर सहा प्रकार मानतात :

  1. पुरुषवाचक सर्वनाम
  2. दर्शक सर्वनाम
  3. संबंधी सर्वनाम
  4. प्रश्नार्थक सर्वनाम
  5. सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम
  6. आत्मवाचक सर्वनाम

१) पुरुषवाचक सर्वनाम

बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तीन वर्ग पडतात

  1. बोलणाऱ्यांची (प्रथम)
  2. ज्यांच्याशी आपण बोलतो किंवा लिहितो त्यांचा (द्वितीय)
  3. ज्यांच्याविषयी आपण बोलतो किंवा लिहितो त्या व्यक्तींचा वा वस्तूंचा (तृतीय)

व्याकरणात यांना पुरुष (यांत स्त्रियाही येतात.) असे म्हणतात. या तीनही वर्गांतील नामांबद्दल येणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात.

  1. बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथमपुरुषवाचक सर्वनामे .उदा ० मी, आम्ही, आपण, स्वतः
  2. ज्याच्याशी बोलावयाचे त्याचा उल्लेख करताना जी सर्वनामे आपण वापरतो ती द्वितीयपुरुषवाचक सर्वनामे उदा० तू, तुम्ही, आपण, स्वतः
  3. ज्यांच्याविषयी बोलायचे त्या व्यक्ती किंवा वस्तू यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती तृतीयपुरुषवाचक सर्वनामे उदा० तो, ती, ते, त्या

२) दर्शक सर्वनाम :

जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरीता जे सर्वनाम वापरले जाते. त्यास 'दर्शक सर्वनाम' म्हणतात.

दर्शक सर्वनाम व्याख्या दर्शक सर्वनाम उदाहरण– हा, ही, हे, तो, ती, ते.

ही माझी वही आहे

हा माझा भाऊ आहे. ते माझे घर आहे. तो आमचा बंगला आहे.

३) संबंधी सर्वनामे :

वाक्यात नंतर येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी (तो-ती-तें-ते-त्या) – जें, जे, ज्या. हिंदी-इंग्रजीत आधी 'तो-ती-तें-ते-त्या' येते आणि मग 'जो – जी – जें, जे, ज्या'. मराठीत तसे होत नाही.

४)प्रश्नार्थक सर्वनामे:

ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो, त्यांना ‘प्रश्नार्थक सर्वनामे’ म्हणतात. उदा० कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी.

५) सामान्य सर्वनामे किंवा अनिश्चित सर्वनामे :

कोण, काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामांबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे असे म्हणतात. उदा.

  • कोणी कोणास हसू नये.
  • त्या पेटीत काय आहे ते सांगा.

या सर्वनामांना ‘सामान्य सर्वनामे’ असेसुद्धा म्हणतात.

६)आत्मवाचक सर्वनामे

आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा ‘स्वतः’ असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते. यालाच ‘स्वतःवाचक सर्वनाम’ असेही म्हणतात. उदा.

  • मी स्वतः त्याला पाहिले.
  • तू स्वhghhhतः मोटार हाकशील का?
  • तो आपणहोऊन माझ्याकडे आला.
  • तुम्ही स्वतःला काय समजता?

आपण व स्वतः – पुरुषवाचक सर्वनाम व आत्मवाचक सर्वनाम यांतील फरक :-

आपण व स्वतः ही दोन्ही सर्वनामे पुरुषवाचकही असतात. तेव्हा या दोहोंमध्ये फरक इतकाच की, पुरुषवाचक ‘आपण ‘ हे ‘तुम्ही’ या अर्थाने येते, तेव्हा ते पुरुषवाचक असते व ‘स्वतः’ या अर्थाने येते तेव्हा ते आत्मवाचक असते.

सर्वनामांचा लिंगविचार

मराठीत मूळ सर्वनामे नऊ आहेत.ती पुढीलप्रमाणेः मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः यांतील लिंगानुसार बदलणारी तीनच : १) तो, २) हा, ३) जो. जसे, तो-ती–ते, हा– ही–हे , जो–जी–जे. याशिवाय इतर सर्व सर्वनामांची तीनही लिंगातील रूपे सारखीच राहतात; ती बदलत नाहीत,

सर्वनामांचा वचनविचार

मराठीतील मूळ नऊ सर्वनामांपैकी ‘मी ,तू, तो, हा ,जो’ ही पाच सर्वनामे वचनभेदाप्रमाणे बदलतात.जसे मी – आम्ही,तू – तुम्ही; तो ,ती,ते – ते ,त्या ,ती ; हा,ही ,हे – हे ,ह्या, ही; जो,जी ,जे – जे ,ज्या, जी

  • बाकीच्या सर्वनामांची (कोण,काय,आपण, स्वतः) रूपे दोन्ही वचनांत सारखीच राहतात.
  • सर्वनामाचे लिंग व वचन ते ज्या नामाकरिता आले असेल त्यावर अवलंबून असते.

सर्वनामांचा नाम विशेषण

हे सुद्धा पहा

  • शब्दांच्या जाती
  • मराठी व्याकरण विषयक लेख