Jump to content

सर्वंकष शिक्षण

शिक्षण-प्रणालीचे प्रणेते

श्रीअरविंद ऊर्फ अरविंद घोष आणि श्रीमाताजी ऊर्फ मीरा अल्फासा हे समग्र शिक्षण या शिक्षण-प्रणालीचे प्रणेते आहेत.

श्रीमाताजींनी त्याची सैद्धांतिक मांडणी केली आणि या विचारांना मूर्त रूप देण्याच्या हेतुने दि. २ डिसेंबर १९४३ रोजी श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन या सेंटरची पुडुचेरी येथे स्थापना केली. येथील शिक्षणपद्धतीचा गाभा समग्र शिक्षण (Integral Education) हा आहे. या पद्धतीस Free Progress Education असेही संबोधले जाते.

मूलभूत संकल्पना

या शिक्षण-प्रणालीमध्ये मानवी अस्तित्वाच्या पाच अंगांचा विचार केला जातो. व्यक्तीच्या अस्तित्वामध्ये शरीर, प्राण, मन, अंतरात्मा आणि आत्मा या पाच अंगांचा समावेश असतो. शिक्षण समग्र व्हायचे तर या पाचही अंगांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे, हे या प्रणालीत लक्षात घेतले जाते. शारीरिक, प्राणिक, मानसिक, आंतरात्मिक व आध्यात्मिक शिक्षण हे समग्र शिक्षणाचे (integral education चे) पाच भाग आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत -

शारीरिक शिक्षण (Physical Education)

यामध्ये १) शरीरावरील नियंत्रण, २) शरीराच्या विविध अंगांचा विकास आणि ३) काही दोष असल्यास, व्यंग असल्यास त्याच्यात सुधारणा घडवून आणणे या तीन गोष्टींचा समावेश होतो.

प्राणिक शिक्षण (Vital Education)

यामध्ये १) ज्ञानेद्रियांचे विकसन २) सौंदर्यदृष्टीचा विकास आणि ३) स्वभाव परिवर्तन यांचा समावेश होतो.

मानसिक शिक्षण (Mental Education)

यामध्ये १) एकाग्रतेची शक्ती वाढविणे २) जाणीव विशाल, व्यापक करणे, तिची समृद्धी वाढविणे ३) सर्व संकल्पना, कल्पना व विचार यांची मध्यवर्ती संकल्पनेभोवती गुंफण करणे ४) विचारांवरील नियंत्रण ५) मानसिक शांती, स्थिरता आणि ग्रहणशीलता यांचे विकसन या गोष्टींचा समावेश होतो.

आंतरात्मिक शिक्षण (Psychic Education)

यामध्ये स्वतःच्या अंतरंगात डोकावून तेथे अंतरात्म्याचा शोध घेणे यास महत्त्व आहे.

आध्यात्मिक शिक्षण (Spiritual Education)

ईश्वराप्रत आत्म-समर्पण आणि त्याच्याशी तादात्म्य पावण्याची आस या गोष्टींचा आध्यात्मिक शिक्षणात समावेश होतो.

संदर्भ

  • Collected works of The Mother, Published by Sri Aurobindo Ashram., Vol : 12 : Pg 01-38