Jump to content

सर्पिलाकार दीर्घिका


मेसिए १०१ (Messier 101) किंवा एनजीसी ५४५७ (NGC 5457) दीर्घिका - सर्पिलाकार दीर्घिकेचे उदाहरण

ज्या दीर्घिकांचा आकार चपटा, फिरणाऱ्या तबकडी सारखा असतो, ज्यामध्ये तारे, वायू आणि धूळ असते, केंद्रभागी अनेक ताऱ्यांच्या केंद्रीकरणाने[श १] तयार झालेला तेजोगोल[श २] व त्याच्याभोवती सर्पिलाकार फाटे दिसतात अशा दीर्घिकांना सर्पिलाकार दीर्घिका (इंग्रजी: Spiral Galaxy - स्पायरल गॅलॅक्सी) म्हणतात. या दीर्घिका एडविन हबलने इ.स. १९३६ साली त्याच्या द रेल्म ऑफ द नेब्यूला या कामामध्ये वर्णन केलेल्या दीर्घिकांच्या संरचनेवर आधारित तीन मुख्य गटांपैकी एक गट आहेत.[]

सर्पिलाकार दीर्घिकांना त्यांचे नाव त्यांच्या केंद्रापासून सुरू होऊन दीर्घिकेच्या तबकडीमध्ये विस्तारणाऱ्या सर्पिल आकाराच्या फाट्यांमुळे पडले. या फाट्यांमध्ये नवीन ताऱ्यांची उत्पत्ती होत असते आणि ते त्यांच्यातील तेजस्वी ओबी ताऱ्यांमुळे भोवतालच्या तबकडीपेक्षा जास्त प्रकाशमान दिसतात.

एनजीसी १३०० (NGC1300) या ६.१ कोटी प्रकाशवर्ष अंतरावरील भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिकेचे हबल दुर्बिणीने घेतलेले छायाचित्र

अंदाजे दोन तृतीयांश सर्पिलाकार दीर्घिकांमध्ये मधल्या केंद्रापासून दोन सरळ भुजा[श ३] फुटून त्यांच्यापासून सर्पिल फाटे फुटलेले दिसतात.[] भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिकांचे[श ४] प्रमाण साध्या सर्पिलाकार दीर्घिकांच्या तुलनेत बदलत गेले आहे. सुमारे ८ अब्ज वर्षांपूर्वी ते १०% होते, २.५ अब्ज वर्षांपूर्वी ते २५% झाले व आता ते सुमारे दोन तृतीयांश (६६%) आहे.[]

अलिकडे (१९९० च्या दशकात) आपली स्वतःची आकाशगंगा दीर्घिका भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिका आहे असा शोध लागला आहे. पण आपण आपल्या दीर्घिकेच्या आतमध्ये असल्यामुळे तिची भुजा आपल्याला दिसणे अवघड आहे.[] याचा सर्वात ठोस पुरावा अलिकडे स्पिट्झर अवकाश दुर्बिणीने केलेल्या आकाशगंगेच्या केंद्राजवळच्या ताऱ्यांच्या सर्वेक्षणातून मिळाला आहे.[]

जवळच्या विश्वातील ६०% दीर्घिका या सर्पिलाकर आणि आकारहीन दीर्घिका आहेत.[]

पारिभाषिक शब्दसूची

  1. ^ केंद्रीकरण (इंग्लिश: Concentration - काँसंट्रेशन)
  2. ^ तेजोगोल (इंग्लिश: Bulge - बल्ज)
  3. ^ भुजा (इंग्लिश: Bar - बार)
  4. ^ भुजायुक्त सर्पिलाकार दीर्घिका (इंग्लिश: Barred Spiral Galaxy - बार्ड स्पायरल गॅलॅक्सी)

संदर्भ

  1. ^ हबल, एडविन. द रेल्म ऑफ द नेब्यूला (इंग्रजी भाषेत). pp. १२४-१५१.
  2. ^ डी. मिहालास. गॅलॅक्टीक ॲस्ट्रॉनॉमी (इंग्रजी भाषेत).
  3. ^ "हबल अँड गॅलॅक्सी झू फाइंड बार्स अँड बेबी गॅलॅक्सीज डोन्ट मिक्स" (इंग्रजी भाषेत).
  4. ^ "रिपल्स इन अ गॅलॅक्टिक पाँड" (इंग्रजी भाषेत).
  5. ^ R. A. Benjamin; E. Churchwell; B. L. Babler; R. Indebetouw; M. R. Meade; B. A. Whitney; C. Watson; M. G. Wolfire; M. J. Wolff; R. Ignace; T. M. Bania; S. Bracker; D. P. Clemens; L. Chomiuk; M. Cohen; J. M. Dickey; J. M. Jackson; H. A. Kobulnicky; E. P. Mercer; J. S. Mathis; S. R. Stolovy; B. Uzpen (September 2005). "First GLIMPSE Results on the Stellar Structure of the Galaxy". The Astrophysical Journal Letters (इंग्रजी भाषेत). 630 (2): L149–L152. arXiv:astro-ph/0508325. Bibcode:2005ApJ...630L.149B. doi:10.1086/491785.
  6. ^ Loveday, J. (February 1996). "The APM Bright Galaxy Catalogue". Monthly Notices of the Royal Astronomical Society (इंग्रजी भाषेत). 278 (4): 1025–1048. arXiv:astro-ph/9603040. Bibcode:1996MNRAS.278.1025L. doi:10.1093/mnras/278.4.1025.