सर्पगंधा
सर्पगंधा ही वनस्पती भारतात हिमालयातील सिमल्यापासून आसाम, त्रिपुरापर्यंत तसेच गंगेचे खोरे, बिहार, बंगाल, ओरिसा, नेपाळ, सिक्कीम. भूतान, अंदमान इत्यादी भागांतील जंगलांत आणि महाराष्ट्रात कोकण, पश्चिम घाट व विदर्भात आढळते.
सर्पगंधाची विविध नावे
- इंग्रजी : Rauvolfia root; Serpentine; Serpentine root
- कानडी : चंद्रिका; शिवनाभी; हरूडपतल
- मराठी : हर्की; मुंगूसवेल; सर्पगंध; सर्पगंधा
- शास्त्रीय नाव : राऊलफिया सर्पेन्टिना (Rauvolfia serpentina); ऑफिओझायलॉन सर्पेन्टिनम (Ophioxylon serpentimum)
- संस्कृत : चंद्रिका; सर्पगंध; सर्पगंधा; सर्पाक्षी
- हिंदी : चंद्रभागा; छोटा चाँद; नाई; नाकुली चाँद; सरप गंधा; हरकाई चाँद;
सोळाव्या शतकात ‘लिओनॉई राऊल्फ’ या जर्मन शास्त्रज्ञाच्या नावामुळे राऊलफिया हे नाव पडले, तर सापासारख्या लांबच लांब मुळ्यांचा आकार म्हणून सर्पगंधेला ‘सर्पेन्टिना’ हे नाव पडले. ही वनस्पती अॅपोसायनेसी कुळातील असून भारतीयांना फार पूर्वीपासून माहीत आहे. भारतीय वैद्य जे ‘सर्पगंधा’ औषध वापरीत, त्यापासून सर्पासील हे आधुनिक औषध बनविण्यात आले आहे.
वनस्पतीचे वर्णन
सर्पगंधा ही वनस्पती वनौषधी झुडूप असून, साधारण ६० ते ९० सेंटिमीटरपर्यंत उंच वाढते.
या वनस्पतीच्या खोडावरील साल पिवळसर असते. पाने साधी, लांबट आकाराची, तीन तीनच्या समूहात असतात. पानांचा रंग वरून गर्द हिरवा, तर खालून फिक्कट हिरवा असतो. मुळे सापासारखी लांब, जाड असून, मुळाची साल फिक्कट उदी रंगाची असते. फुलांचा रंग तांबडट-पांढरा असून फुलांचा गुच्छ शेंड्यावर किंवा पानांच्या बेचक्यात येतो. फुले लहान, पांढरी किंवा तांबडटसर असतात. फुलाचे डेखे लालभडक असतात. फळे वाटाण्याएवढी, काळसर जांभळ्या रंगाची असून, मांसल व कठीण कवचाची असतात. बिया, खोड व मुळापासून हिची लागवड करता येते.
सर्पगंधेचे उपयोग
सर्पगंधा वनस्पतीच्या मुहीळापासून अजमालाईन, सर्पेन्टाईन, रॉऊलफाईन, रेसरपीन ही महत्त्वाची अल्कलॉईड्ज मिळवली जातात. यापैकी रेसरपीन हा औषधगट रक्तदाब कमी करण्यासाठी वापरला जातो. नव्र्हस सिस्टमवर ही औषधे गुणकारी आहेत. वेड्या, भ्रमिष्ट लोकांसाठी औषध म्हणून या वनस्पतीचा वापर होत असल्याने या वनस्पतीला ‘पागल की दवा’ असेही म्हणतात. तसेच मासिक पाळी वेळेवर व योग्य प्रमाणात येण्यास मुळांचा वापर करतात. सर्पदंश झाल्यास मुळाचा लेप जखमेवर लावतात. सर्पगंधेस जागतिक बाजारपेठेत भरपूर मागणी आहे.
सर्पगंधापासून बनवलेल्या औषधांत या वनस्पतीच्या सुकवलेल्या मुळ्यांचा उपयोग होतो. मुळ्यांपासून मिळवलेली अर्कद्रव्ये ही अपस्मार (epilepsy), चित्तविकृती (psychosis), निद्रानाश (insomnia), छिन्नमनस्कता (schizophrenia) आणि आंतड्यांच्या काही विकारांवर गुणकारी आहेत. पटकी, उदरशूल (colic) व ताप आदींवर सर्पगंधाच्या मुळांचा अर्क इतर वनस्पतींच्या अर्कांत मिसळून वापरतात. अर्भकाच्या जन्मावेळी मातेला वेणा येण्यासाठीही सर्पगंधा उपयोगी पडते. डोळ्यांच्या बुबुळावरील पारदर्शक पडदा अपारदर्शक होऊ लागल्यास सर्पगंधाच्या पानांच्या रसाचा उपाय करतात..